Monday, 15 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशभरात काल पर्यंत ८२ लाख ६३ हजार जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घेतला आहे. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ३१ शतांश टक्के झाला असून आतापर्यंत १ कोटी ६ लाख ११ हजार जण या आजारातून बरे झाले आहेत. देशभरात सध्या १ लाख ३७ हजार जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

दरम्यान, राज्यातली दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या काल वाढली. काल राज्यात ४ हजार ९२ नवीन रुग्णांचं निदान झालं. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्ण संख्येतही वाढ होऊन ती ३६ हजार ६५ वर पोहोचली आहे.

****

परभणी तालुक्यात पोखर्णी नृसिंह इथं स्वच्छ सुंदर स्मृती उद्यानासाठी पंचायत समिती. सदस्य सविता माणिकराव वाघ यांनी अडीच लाख रुपये निधी दिला असून, या विकास कामांना काल माणिकराव वाघ यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. संकल्प फाउंडेशन आणि पोखर्णी गावकऱ्यांच्या सहकार्यातून मागील दोन वर्षांपासून स्वच्छ सुंदर स्मृती उद्यानाची चळवळ सुरू आहे. या निधीतीतून स्मशानभूमीत शवदाहिनी, पाण्याची टाकी तसंच इतर सुशोभीकरण केलं जाणार आहे.

****

राज्यभरात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं येत्या मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज असल्याचं, हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे

****

जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातल्या किनगावजवळ पपई भरून येणारं मेटेडोर उलटलं असून यात १५ मजूरांचा जागीच मृत्यू झाला. वाहनात एकूण २१ मजूर होते. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री ही दुर्घटना झाली.

जखमी मजुरांना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा डाव गडगडला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सहा गडी बाद १०६ धावा झाल्या आहेत. विराट कोहली २२ तर रविचंद्रन अश्विन सात धावांवर खेळत आहेत. रोहित शर्मा २६, रहाणे १०, पंत आठ तर पुजारा आणि अक्षर पटेल प्रत्येकी सात धावा काढून बाद झाले. भारतानं एकूण ३०८ धावांची आघाडी घेतली आहे.

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...