Tuesday, 16 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      जनतेनं कोरोना विषाणू प्रतिबंधा संदर्भातले नियम न पाळल्यास, कठोर निर्णय घेण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा.

·      मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांच्या नियोजन प्रारूप आराखड्याला मंजुरी.

·      कबाकी वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिलं भरलीच पाहिजेत- अजित पवार.

·      बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्येची नियमानुसार चौकशी - गृहमंत्री अनिल देशमुख.

·      सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं निधन.

·      जळगाव जिल्ह्यात मोटार अपघातात रावेर तालुक्यातल्या १५ मजुरांचा मृत्यू.

·      राज्यात तीन हजार ३६५ तर मराठवाड्यात १५४ नव्या कोविड रुग्णांची नोंद.

णि

·      चेन्नई क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित.

****

नागरिकांनी कोविड संदर्भातले नियम न पाळल्यास, कठोर निर्णय घेण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले –

एका कार्यक्रमाच्याकरता फुलंब्रीला गेलो होतो. जातांना बघितलं ग्रामस्थ, नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाहीत. हे अतिशय घातक आहे. आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही सगळे चर्चा करू, त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील.

****

दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल औरंगाबाद इथं मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांच्या आगामी वित्त वर्षासाठी नियोजनाच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठका झाल्या. औरंगाबाद जिल्हा नियोजन आणि विकास आराखड्यासाठी ३६५ कोटी रुपये, जालना जिल्ह्यासाठी २६० कोटी, उस्मानाबाद २८० कोटी, बीड ३४० कोटी, हिंगोली १६० कोटी, परभणी २२५ कोटी, लातूर २७५ कोटी, तर नांदेड जिल्ह्यासाठी ३५५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला कालच्या विभागीय बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती पवार यांनी, या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, अडचणीत असलेल्या महावितरण कंपनीला टिकवायचं असेल तर शेतकऱ्यांनी वीजबिलं भरलीच पाहिजेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केलं आहे. राज्यात कृषि पंपधारकांकडे ४५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी राज्य शासनातर्फे १५ हजार कोटी रुपयांचं व्याज तसंच दंड माफ केला जाणार आहे. उर्वरित ३० हजार कोटी थकबाकीपैकी १५ हजार कोटींच्या बिलाचा भार राज्य सरकारने उचलला आहे. मराठवाड्यात १० हजार कोटींपैकी ५ हजार कोटींच्या वीजबिलाचा भार राज्य सरकारनं उचलला आहे. आता राहिलेलं वीजबिल शेतकऱ्यांनी तातडीनं टप्प्याटप्प्यानं भरलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

****

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्याची गरज असून राज्य शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात सहा ते सात टक्के भरीव तरतूद, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणासाठी झाली पाहिजे अशी मागणी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतल्या क्ष-किरणशास्त्र विभागाला श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं देण्यात आलेल्या थ्री टी - एम आर आय यंत्राचं लोकार्पण देशमुख यांच्या हस्ते काल झालं. त्यानंतर कोविड योद्धांचा सन्मान देशमुख यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. कोविड वर मात करण्यासाठी सरकारनं दमदार पावलं उचलली आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीचं संशोधन पुण्यामध्ये होणं ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्येची नियमानुसार चौकशी केली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप, गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला. याप्रकरणात राज्य सरकारमधले मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडलं जात आहे, त्यांचीही नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशी अहवालातून सत्य समोर येईल, त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

शेतकरी आंदोलनासंदर्भात देशाच्या समर्थनात ट्वीट केल्याप्रकरणी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशीची भाषा आपण कधीही केली नव्हती. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असं आपल्या म्हणण्याचा उद्देश होता, असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगाव इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्याची विनंती, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी काल साष्ट पिंपळगाव इथं आंदोलकांची भेट घेऊन, चर्चा केली. मराठा आरक्षणाची लढाई आता न्यायालयात पोहोचली आहे. मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन पाठपुरावा करण्याचं आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिलं. आंदोलकांनी मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही, असा ठाम निर्धार चव्हाण यांच्याशी बोलताना व्यक्त केला.

****

सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं काल सकाळी पुण्यात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या महिनाभरापासून ते आजारी होते. प्रारंभी मुंबई आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर १९७३ मध्ये त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, त्यानंतर १९८९ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले. १९९५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची भारतीय वृत्तपत्र परिषद - प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया वर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर जागतिक वृत्तपत्र परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. राजकीय आणि सामाजिक कार्यातही न्यायमूर्ती सावंत आघाडीवर होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज मंगळवारी पुण्यात बाणेरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यायमूर्ती सावंत यांना श्रद्धांजली अर्पण केली. न्यायदानाच्या क्षेत्रातील आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील न्यायमूर्ती सावंत यांचं कार्य सदैव स्मरणात राहील, असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावंत यांना श्रद्धांजली अर्पण करताना, पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली.

****

जळगाव जिल्ह्यात भीषण अपघातात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी २ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. यावल तालुक्यात परवा मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात रावेर तालुक्यातल्या १५ मजुरांचा मृत्यू झाला. यामध्ये सहा महिला तर ९ पुरुषांचा समावेश आहे. अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

****

राज्यात काल तीन हजार ३६५ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ६७ हजार ६४३ झाली आहे. काल तीन हजार १०५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ७८ हजार ७०८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७ दशांश टक्के इतका झाला आहे. काल २३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५१४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३६ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १५४ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात काल ७७ नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात २२, लातूर १६, नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात प्रत्येकी २७, बीड १६, तर हिंगोली जिल्ह्यात काल सात नवे रुग्ण आढळून आले.

****

कोविड काळात बंद झालेले महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग कालपासून सुरू झाले. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर्व विभागात, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचं गुलाब पुष्प उधळून, साखर वाटप करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. शहरातल्या विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचं साखर वाटप करून स्वागत करण्यात आलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी तसंच प्राध्यापकांचं स्वागत करण्यात आलं.

परभणी जिल्ह्यातली महाविद्यालयं ५० टक्के क्षमतेनं कालपासून सुरू झाली. कित्येक महिन्यानंतर महाविद्यालयात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुष्पवृष्टी करत तसंच ढोलताशांच्या गजरात, आतिषबाजीत स्वागत करण्यात आलं.

****

कोरोना विरुद्धच्या लढाईत लोककला पथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती महत्त्वाची ठरणार असल्याचं, औरंगाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी म्हटलं आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोच्या आत्मनिर्भर भारत आणि कोविड - १९ लसीकरण जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन गव्हाणे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्यात पुढचे दहा दिवस या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

****

लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात चित्ररथ तसंच एलईडी व्हॅनव्दारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या जनजागृती मोहिमेला काल प्रारंभ झाला. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हे चित्ररथ रवाना करण्यात आले. १२० गावांत हे चित्ररथ जनजागृती करणार आहेत.

****

यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज असल्याचं, खासदार डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे, ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यात डिझेल, पेट्रोलचा एकही डेपो नसल्यानं, इंडियन ऑईल कंपनीच्या व्यवस्थापकांनी नुकतीच औरंगाबाद, बीड किंवा परभणी यापैकी एका ठिकाणी नवीन डेपो उभारण्यासंदर्भात पाहणी केली असल्याची माहिती खासदार कराड यांनी दिली. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांवर सर्वच पक्षातील खासदार, आमदारांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या पूर्ववत सुरु ठेवण्याची मागणी खासदार राजीव सातव यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रबी हंगामातील गहू, हरभरा, भूईमुगाची पेरणी केली आहे. यावेळी वीज जोडण्या खंडीत केल्यास, शेतकऱ्यांचे रबी हंगामाचं नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता, वीज जोडण्या सुरु ठेवण्याची मागणी सातव यांनी केली आहे. खासदार हेमंत पाटील यांनीही महावितरणचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्याशी चर्चा करून कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या २१ मार्चला मतदान होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली. काल पहिल्याच दिवशी शेती मतदारसंघातून एक अर्ज दाखल झाला. बँकेच्या २१ जागासांठी हे मतदान होत असून २४ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत आहे. मतमोजणी २२ मार्चला होणार आहे. दरम्यान, परभणी आणि हिंगोली कार्यक्षेत्र असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकची प्रक्रियाही कालपासून सुरु झाली. बँकेच्या २१ संचालकांच्या निवडीसाठी मतदान होणार असून २३ मार्चला निकाल घोषित होणार आहेत.

****

चेन्नईत सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. यामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इंग्लंड आज कालच्या तीन बाद ५३ धावांवरुन पुढे खेळ सुरु करेल. इंग्लंडला जिंकण्यासाठी ४८२ धावांचं उद्दिष्ट मिळालं असून त्यांना आणखी ४२९ धावांची गरज आहे.

दरम्यान, काल तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. रविचंद्रन अश्विनने १०६ धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहली ६२ धावांवर बाद झाला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातल्या पाल इथं हनुमंतराव सदाशिव जाधव क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल सकाळी झालं. या मैदानामुळे ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले.

****

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ परभणी शहरात जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीनं काल सायकल रिक्षा चालवून आंदोलन करण्यात आलं. युवक जिल्हाध्यक्ष अकबर जागीरदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातले सैनिक मेजर सागर तोडकरी यांचं पठाणकोट छावणीत अपघाती मृत्यू झाला. त्यांचा पार्थिव देह आज, परांडा तालुक्यात सोनारी या त्यांच्या गावी आणला जाणार आहे.

****

अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा भरपाई द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कालपासून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं. हे आंदोलन साखळी पद्धतीने २२ फेब्रुवारी पर्यंत चालवलं जाणार असल्याचं, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितलं.

****

तीर्थक्षेत्र यात्रा विशेष रेल्वेचा परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या गाडीच्या विस्ताराला मंजुरी दिली. दक्षिण मध्य रेल्वेच्या या विशेष रेल्वे गाडीनं गुजरातमधल्या राजकोटहून सोमवारी प्रस्थान केलं आहे, ही गाडी उद्या संध्याकाळी साडे सात वाजता औरंगाबादला मुक्कामी पोहोचेल, परवा गुरुवारी पहाटे परळी ही रेल्वे इथं पोहोचेल. परळीत नऊ तास थांबून ही रेल्वे दुपारी १ वाजता रामेश्वरमकडे रवाना होईल.

****

कोल्हापूर - धनबाद - कोल्हापूर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवार १९ फेब्रुवारीपासून धावणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी कोल्हापूरहून सकाळी चार वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून पंढरपूर, लातूर, नांदेड, नागपूर मार्गे धनबादला दुसऱ्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी दर सोमवारी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

बंजारा समाजाचे गुरू सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिवादन सभा घेण्यात आली. औरंगाबाद इथं दुचाकी फेरी काढून सेवालाल महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यात कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यावतीने काल पालम तालुक्यातल्या आठ गावात शेत-शिवार दौरा काढून पीक पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना, मागेल त्याला योजना असल्यामुळे शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी केलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...