Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18
February 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१८ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
· वाढत्या कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुन्हा कडक कारवाईस प्रारंभ; नियमाचं
उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्याचे आदेश.
· राज्यात चार हजार
७८७ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात पाच बाधितांचा मृत्यू.
· सुरक्षित पर्यटनासाठी
कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबवण्यास तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास
राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
· औरंगाबाद जिल्ह्यात
अनेक ठिकाणी काल गारपीटीसह अवकाळी पाऊस.
· ‘प्रधानमंत्री
आदर्श ग्राम योजने’अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन गावांची निवड.
आणि
· इंग्लंडविरुद्धच्या
उर्वरित दोन कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, उमेश यादवचा संघात समावेश.
****
आरोग्य विषयक नियमांचं उल्लंघन होत असल्यानं राज्यात
पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पुन्हा
कडक कारवाईचे फास आवळण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद, जालना, अकोला, बुलडाणा आणि
वाशिम इथं जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक
कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.
औरंगाबाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वाढत्या
रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी काल मराठवाड्यातले जिल्हाधिकारी, आरोग्य,
पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे चर्चा केली. प्रशासनाच्या
कामकाजावर नाराजी व्यक्त करत केंद्रेकर यांनी, कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मास्क न वापरणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करा, अशी सूचना केंद्रेकर यांनी
केली. मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेसवर लक्ष ठेवा, नियम न पाळल्यास आधी दंडात्मक कारवाई,
नंतर गुन्हे दाखल करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. औरंगाबाद शहरात कोचिंग क्लासेसची
तपासणी करण्यासाठी पाच स्वतंत्र गट तयार केले असल्याचं, महानगरपालिका प्रशासक आस्तिक
कुमार पांडेय यांनी सांगितलं. रुग्ण आढळलेली इमारत किंवा घर पुन्हा सील केलं जाणार
असून, संपर्कातल्या व्यक्तींची चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. याशिवाय
संबंधित रुग्णाच्या घरावर रुग्ण असल्याचं स्टिकरही लावण्यात येणार असल्याचं औरंगाबाद
महापालिका प्रशासक पांडेय यांनी सांगितलं.
****
नागरिकांनी कोविडविषयीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं
काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले
आहेत. नागरिकांनी देखील सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, गाफीलपणा दाखवू नये, मास्कशिवाय
घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर राखावे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं या परिपत्रकात
म्हटलं आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी
कठोर पावले उचलावीत, नियमांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याची सूचनाही
जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
****
कोविड पार्श्वभूमीवर यंदा छत्रपती शिवजी महाराज जयंती
उत्सव साध्या पध्दतीनं साजरा करण्याची सूचना बीडचे जिल्हाधिकारी आर.एस.जगताप यांनी
केली आहे. यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक,
इत्यादींचं सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये, त्याऐवजी
सदर कार्यक्रमाच्या केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपणाची व्यवस्था करावी. प्रभात
फेरी, दुचाकीफेरी, मिरवणूक काढू नये. फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्याची
परवानगी देण्यात येत असल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पत्रक
जारी करुन, शिवजयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई केली
आहे. सार्वजनिक ठिकाणी जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, तसंच पोवाडे, व्याख्यान,
सांस्कृतिक कार्यक्रम करता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. रक्तदान शिबिर घेताना
सामाजिक अंतराचा नियम पाळला जावा, असं गुप्ता यांनी सांगितलं आहे.
****
राज्यात काल चार हजार ७८७ नव्या कोविड रुग्णांची नोंद
झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ७६ हजार ९३ झाली आहे.
काल ४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या ५१ हजार ६३१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे.
काल तीन हजार ८५३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ८५ हजार
२६१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ६२ टक्के
इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ३८ हजार १३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा
मृत्यू झाला, तर विभागात नव्या २३७ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या
तीन, तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १३७ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात
६६, लातूर ३१, बीड २८, परभणी २७, नांदेड २४, उस्मानाबाद १७, तर हिंगोली जिल्ह्यात सात
नवे रुग्ण आढळून आले.
****
सुरक्षित पयर्टनासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबवण्यास
राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली
काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या धोरणांतर्गत पर्यटकांना कॅरॅव्हॅन
तसंच कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा दिल्या जाणार आहेत. बिछाना, स्वच्छतागृह आणि स्वयंपाकाची
सुविधा असलेल्या कॅरॅव्हॅन, मुलभूत सोयी सुविधानी युक्त अशा जागेवर उभी करून पर्यटकांना
मुक्काम करता येईल. हे धोरण राबवताना, कॅरॅव्हॅन पर्यटनाला मुद्रांक शुल्कामध्ये सूट,
राज्य वस्तु आणि सेवा कर, विद्युत शुल्कामध्ये सूट इत्यादी प्रोत्साहनं लागू असतील.
पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन तसंच कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक राहील. कॅरॅव्हॅन
तसंच कॅरॅव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत मार्केटिंग, स्वच्छता
आणि व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास
कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातल्या उद्योगांच्या मागणीनुसार
तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावं, हा या कौशल्य विद्यापीठ
स्थापनेचा उद्देश आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राज्यात ६
विभागीय ठिकाणी कौशल्य केंद्रं उभारण्याचंही प्रस्तावित आहे. ही ६ केंद्रं राज्य कौशल्य
विद्यापीठाची विभागीय केंद्रं म्हणून काम पाहतील. या विद्यापीठाने मान्य केलेले अभ्यासक्रम
सुरु करण्यासाठी राज्यात असणाऱ्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसंच सर्व कौशल्य
प्रशिक्षण संस्था या कौशल्य विद्यापीठाशी संलग्न होऊ शकतील. कौशल्य विद्यापीठ प्रशासन
आणि इमारतीच्या खर्चापोटी दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासही
काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या रेबीज मुक्त अभियान २०२५
या उपक्रमास राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असून संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात
येणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. जीव-जंतु कल्याण दिन
२०२१ निमित्त मुंबईत रेबीज मुक्ती अभियानाचा शुभारंभ केदार यांच्या हस्ते काल झाला,
त्यावेळी ते बोलत होते. केदार यांच्या उपस्थितीत यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात श्वानाला
रेबीज लसीकरण करण्यात आलं.
दरम्यान, राज्यामध्ये बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात
आला असल्याची माहिती केदार यांनी काल दिली. सर्व कोंबडी पालकांनी जैव सुरक्षा उपाय
योजनांचं तंतोतंत पालन करावं. स्वच्छता आणि सामाजिक अंतराचं काटेकोरपणे पालन करावं,
अशी सूचना केदार यांनी केली आहे. व्यवस्थित शिजवलेलं कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली
अंडी खाणं, पूर्णपणे सुरक्षित असून, बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले
गैरसमज पसरवण्यांत येऊ नयेत, असं आवाहनही पशुसंवर्धन मंत्र्यांनी केलं आहे.
****
दूरसंचार क्षेत्रातल्या उत्पादनांशी निगडित प्रोत्साहन
योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या
योजनेसाठी एकशे २१ अब्ज ९५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, या योजनेमुळे ४० हजारांवर
प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती प्रसाद यांनी दिली.
किशोरवयीन न्याय देखभाल तसंच बाल संरक्षण कायद्यात
सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास
मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं. त्या काल पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या सुधारणेनंतर
आता जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रत्येक जिल्ह्यात किशोर न्याय
देखभाल कायद्यान्वये कार्यरत संस्थांवर देखरेख ठेवता येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल गारपीटीसह अवकाळी
पाऊस झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री, खुलताबाद तालुक्यात
जोरदार पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यात धामणगाव परिसरात गारपीटही झाली. लाडसावंगी, चारठा,
सेलूद, आडगाव, सरक, हातमाळी, औरंगपूर, पिंपळखुंटा या परिसरात गारपीट झाली. सोंगणीस
आलेला आणि सोंगणी करुन ठेवलेला गहू, ज्वारी, हरभरा भिजला, तसंच आंब्याचा मोहोर गळून
पडला. सांगली, सोलापूर सातारा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात येत्या दोन ते तीन
दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
सरपंचांनी शासन निर्णयाचा अभ्यास करून गावाचा विकास
साधावा, तसंच शेत शिवाराबरोबर गावाचा शिवार देखील स्वच्छ आणि सुंदर कसा होईल यासाठी
प्रयत्न करावेत, असं परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे
यांनी म्हटलं आहे. परभणी पंचायत समितीच्या वतीनं ‘आमचा गाव आमचा विकास’ कार्यक्रमांतर्गत
गाव विकास आराखडा संबंधीच्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी
टाकसाळे यांनी सरपंचांशी संवाद साधला. गावाच्या सन्मानासाठी प्रत्येकानं शौचालयाचा
नियमित वापर कसा होईल यासाठी सरपंच मंडळींनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी
केलं.
****
केद्र शासनाच्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या बोरी, उमरगा तालुक्यात बोर्डेवाडी
आणि धाकटीवाडी या तीन गावांची निवड झाली आहे. या तीनही गावांमध्ये मुलभूत सोयी सुविधा
उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचं अनुदान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाकडून
मिळणार आहे. त्यामुळे या गावातली सर्व कामं उत्तम गुणवत्तेची करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी
कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते.
दरम्यान, माजी मंत्री दिवंगत ‘आर. आर. पाटील सुंदर
गाव पुरस्कार योजने’अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याचे २०१९-२० चे तालुका तसंच जिल्हास्तरीय
पुरस्कार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गोपाळवाडी,
काटी, जेवळी, तुरोरी, हसेगाव, बागलवाडी, पारा, जवळा, आदी गावांना ‘आर. आर. पाटील जिल्हा
सुंदर गाव’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
लातूर जिल्हा परिषदेतले जे कर्मचारी पालकांचा सांभाळ
करत नाहीत, असे कर्मचारी आणि त्यांचे पालक यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे
यांनी बैठक घेऊन समुपदेशन केलं. यासंदर्भात १३ पालकांच्या तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी
तीन तक्रारी निकाली काढल्या असून, उर्वरित प्रकरणी कर्मचारी आणि पालकांमध्ये समेट घडवून
आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं, केंद्रे यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या
निवडणुकीत आतापर्यंत १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी
कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार बाबाजानी दुर्राणी, भारतीय जनता पक्षाचे आमदार
तानाजी मुटकुळे यांचाही समावेश आहे.
****
इंग्लंडसोबत सुरू असलेल्या चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतल्या उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाला. शार्दुल ठाकूर ऐवजी
उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. विजय हजारे चषक स्पर्धेसाठी शार्दुलला वगळल्याचं
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सांगितलं आहे. २४ फेब्रुवारी आणि ४ मार्चला नियोजित
दोन्ही कसोटी सामने अहमदाबाद इथं होणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद इथंच पाच टी ट्वेंटी
सामन्यांची मालिका होणार असून, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यात खेळवली जाणार
आहे.
****
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या
प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोच्या वतीने कोव्हिड-१९ लसीकण तसंच आत्मनिर्भर भारत अभियान
या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबवण्यात येत आहे. काल
हिंगोली इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या उपस्थितीत या अभियानाला प्रारंभ
झाला. या बहुमाध्यम चित्ररथामध्ये बीडचे शाहीर विठ्ठल काटे आणि संचाकडून गीत तसंच नाटक
सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, आणि उपक्रमांची जनजागृती
करण्यात येणार आहे. पुढचे दहा दिवस जिल्ह्यात हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत तसंच
औंढा नाथनाथ या तालुक्यात हा चित्ररथ फिरणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा आणि बीड इथले गट विकास अधिकारी
नारायण मिसाळ याला ३७ हजार रुपयांची लाच घरताना काल पकडण्यात आलं. विहिरीच्या कामाचं
बील मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला काल
अडीच लाख रुपये लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. नरसिंह पैठणकर असं त्याचं नाव
आहे. मृत जनावरं दाहिनी प्रकल्पातल्या त्रुटी दूर करून देयक काढण्यासाठी या अधिकाऱ्याने
पाच लाख रुपये लाच मागितली होती. तडजोडी अंती ठरलेली अडीच लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं.
****
कृषी कायद्याविरोधातल्या आंदोलनात आज औरंगाबाद तसंच
लातूर जिल्ह्यात रेल रोको आंदोलन केलं जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्थानकावर
सकाळी ९ वाजेची पॅसेंजर रेल्वे अडवण्यात येणार आहे. किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन
आयटक तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं होणाऱ्या या आंदोलनात कन्नड, सिल्लोड,
फुलंब्री आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment