Friday, 19 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये शनिवार, रविवार संचारबंदी लागू; औरंगाबाद शहरात दहावी-बारावी वगळता अन्य वर्गातील विद्यार्थांना २८ फेब्रुवारीपर्यंत शाळेमध्ये अनुपस्थित राहायला परवानगी.

·      आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोना विषाणूची लागण.

·      राज्यात पाच हजार ४२७ नव्या कोविड रुग्णांची नोंद तर मराठवाड्यात सात बाधितांचा मृत्यू.

·      अजिंठ्याजवळ दहा एकर जागेवर ‘भीमपार्क’ उभारताना अभ्यासकांच्या सूचनांचा विचार करण्याचं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचं आश्वासन.

·      राज्य विधीमंडळाचं एक मार्चपासून अधिवेशन, आठ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार.

आणि

·      राज्याच्या अनेक भागांत काल पाऊस; मराठवाड्यात काही भागात गारांचा वर्षाव; अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर आठवड्याला शनिवार रात्रीपासून, सोमवार सकाळपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही शनिवार, रविवार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रूग्ण वाढत असून, प्रशासनानं सर्व यंत्रणांना आवश्यक प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असल्याचं, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. हा संसर्ग वेळीच रोखण्याच्या दृष्टीनं जनतेने अधिक खबरदारीपुर्वक मास्कसह सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं असून, सर्दी, ताप, खोकला या कोविड सदृश्य लक्षणांच्या रूग्णांना तातडीनं कोरोना चाचणी करण्याबाबत सूचित करण्याचं, खासगी डॉक्टरांना निर्देशित केलं असल्याचं ते म्हणाले. त्याचप्रमाणे लग्न समारंभ, इतर कार्यक्रमामध्ये मास्क, सॅनिटायजरचा वापर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करण्याबाबत खबरदारी घेण्याचं निर्देशित केलं असून, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार दंडात्मक कार्यवाही देखील केली जाणार असल्याचं गव्हाणे यांनी सांगितलं.

****

दरम्यान, महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी बोलताना, औरंगाबाद शहरातल्या विद्यार्थांना आजपासून येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत शाळेमध्ये अनुपस्थित राहायला परवानगी असल्याचं सांगितलं. या काळात ज्या विद्यार्थ्यांना शाळेत यायचं आहे त्यांना येता येईल. तसंच दहावी आणि बारावीचे वर्ग मात्र सुरु राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

****

लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू सुरक्षा नियमांचं सक्तीनं पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये शंभर व्यक्तींची मर्यादा पाळली जात नसेल तर महापालिका, नगर परिषद, पोलीस प्रशासनामार्फत तपासणी करुन दंडात्मक कारवाई करावी, आणि तरीही नियमांचं पालन होत नसल्याचं आढळून आलं, तर संबंधित मंगल कार्यालय चालकाविरुध्द गुन्हे दाखल करुन त्यांना टाळं ठोकावं, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

परभणी जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहील. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग संशयित रुग्णांचा शोध घेऊन वेळेत योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल तत्काळ तपासणी पथकं आणि त्यावर नियंत्रणाकरता समन्वयक नियुक्त केले आहेत.

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी प्रशासनाकडून सूचना जारी करण्यात आल्या.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवात केली, या याबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी म्हणाले –

लोकं मास्कचा वापर करत नाहीत आणि सार्वजनिक ठिकाणी सुध्दा मास्कचा वापर होत नाहीये. त्यामुळे आता आम्ही जिल्ह्यामधे मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तींना पहिल्यांदा सापडल्यास पाचशे रूपये दंड, दुसऱ्यांदा सापडल्यास हजार रूपये दंड आणि त्यांनतरही जर लोकांनी ऐकलं नाही तर अशा विवक्षित प्रकरणांमधे गुन्हा दाखल करण्याची सुध्दा आता प्रक्रिया होणार आहे. लोकांनी मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या तिन्ही अटींचं पालन कसोशीने करावं अशी मी सूचना या माध्यमातून करतो आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दररोजच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या घटवण्यात आली आहे. आता दररोज फक्त दहा हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे.

 

जालना जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. १६ मार्च पर्यंत जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयात विविध संघटना, व्यक्ती यांना निवेदन सादर करतांना पाच व्यक्तींपेक्षा अधिक असणार नाही, तसंच उपोषण, मोर्चे, निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

बीड जिल्ह्यात कोविड विषयक नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालय आणि कोचिंग क्लासेसवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संख्येमुळे जनतेला काळजी घेण्याचं आवाहन करतानाच जनतेने मास्कचा वापर, हात धुणं आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावा, असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र-पाटील यड्रावकर यांनी काल मुंबईत केलं.

****

आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ तपासणी करुन घ्यावी, असं टोपे यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनीही, आपल्या संपर्कात आलेल्यांनाही या संसर्गाची चाचणी करण्याची विनंती केली असून, प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं आहे.

****

राज्यात काल पाच हजार ४२७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ८१ हजार ५२० झाली आहे. काल ३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगाववेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ६६९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४८ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ५४३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ८७ हजार ८०४ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक पाच टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ४० हजार ८५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४०९ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये लातूरमधल्या चार, तर जालना, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १५६ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ५८, जालना ४८, परभणी ४१, लातूर ३१, बीड ३७, उस्मानाबाद १५ तर हिंगोली जिल्ह्यात काल १३ नवे रुग्ण आढळून आले.

****

शिवजयंती आज साजरी होत आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना खबरदारी घेत नियमांचं पालन करत जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. दुसऱ्या संसर्गाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफील न राहता सतर्कता बाळगावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

लातूर इथं कोरोना विषाणू प्रतिबंधाचे सर्व नियम पाळत आपण शिवजंयती साजरी करणार असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. निलंग्यात पाच हजार लोकांना भगवे मास्क दिले जातील, असं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याजवळ फर्दापूर इथं दहा एकर जागेवर ‘भीमपार्क’ उभारताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर, इतिहास, पालीभाषा, बौद्ध धम्म आणि पर्यटन या विषयांच्या अभ्यासकांच्या सूचनांचा विचार करण्यात येईल. असं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. ‘भीमपार्क’ उभारण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्यातील मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक पातळीवर पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारं, अभ्यासकांसाठी महत्वाचं आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करणारं हे भीमपार्क असेल, असं ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहणार आहे. यासाठी तीन वर्षाचा कालावधी आणि सुमारे पंचवीस कोटी रुपये लागणार असल्याचं सत्तार यांनी यावेळी सांगितलं.

****

नागपूरजवळ चिंचोळी इथल्या शांतीवन या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयासाठी केंद्र शासनाने चार कोटी २५ लाख रूपयांचा निधी वितरीत केला आहे. शांतीवनमधल्या संग्रहालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आहेत. याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत जवळपास ४०० पेक्षा अधिक वस्तू आहेत.

****

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपासून सुरु होणार आहे. आठ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधीवेशनाचा आठ दिवसांचा कार्यक्रम ठरवण्यात आला असून, २५ मार्च रोजी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, पुढील कालावधी निश्चित केला जाईल, असं संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

****

कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं राज्यात किमान तापमानात वाढ झाली. परिणामी राज्याच्या अनेक भागांत काल जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि नांदेडसहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला तर काही भागात गारांचा वर्षाव झाला. उस्मानाबाद शहरात आज पहाटेपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यातल्या मुठाड, इब्राहीपूर, तांदुळवाडी, नांजा, क्षीरसागर, मासनपूर, जोमाळा, मालखेडा, सुभानपूर या भागात काल दुपारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह गारपीट झाली. भोकरदन तालुक्यातल्या तडेगाववाडी इथं दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज कोसळून राहुल रायसिंग सुंदरडे या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर सुंदरडे शेतात मका जमा करण्याचं काम करत असताना ही दुर्घटना घडली. या भागात पाऊण तास झालेल्या पावसात काही वेळ बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. या गारपीटीमुळे गहू, हरभरा, कांदा बियाणं या पिकांसह फळबागांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या जरंडी गाव इथंही काल गारपीट झाली तर सिल्लोड तालुक्यातल्या आमसरी इथं पाऊस झाला. नांदेड जिल्ह्याच्या नायगांव तालुक्यातल्या सुजलेगाव शिवारात हरभरा पिकांची काढणी करत असलेल्या ५० वर्षीय शेतमजूर माधव दिगंबर वाघमारे यांचा दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीज पडल्यानं मृत्यू झाला तर पाच महिला यात जखमी झाल्या. मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून पुणे वेधशाळेनं मराठवाड्यात काही ठिकाणी आणखी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

****

पश्चिम महाराष्ट्रातले नेते मराठवाड्यावर अन्याय करत नसून, मराठवाड्यातले सत्ताधारी नेते निष्क्रीय आहेत, बैठकांत गप्प बसतात असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मराठवाड्याला, लातूर जिल्ह्याला किती निधी मिळाला, त्याचा फायदा किती होणार आहे याची माहिती देण्यासाठी काल लातूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय अर्थसंकल्पात लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यासाठी ४५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, जलशक्ती अभियानाचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यात लातूर जिल्ह्याला होणार असून जिल्ह्यातल्या १६३ गावांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी यावेळी दिली. 

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काल ३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित आणि जयदत्त धस यांच्या अर्जांचा समावेश आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बँकेचे माजी अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह ३५ जणांनी अर्ज दाखल केले.

****

रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून औरंगाबाद जिल्हा रोजगार निर्मितीतील मॉडेल तयार करण्याच्या दृष्टीनं प्रत्येक गावात महिना निहाय नियोजन करून रोजगार निर्मिती करावी, अशी सूचना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी केली आहे. औरंगाबाद इथं काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. वर्षभरात जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेंतर्गत कमीत कमी दोन सार्वजनिक कामं सुरू करावी, तसंच किमान पाच वैयक्तिक लाभाची कामं सुरू राहिली पाहिजेत, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही भुमरे यांनी सांगितलं.

****

कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र किसान सभा, लाल बावटा शेतकरी शेतमजूर युनियनच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर स्थानकावर काल रेल्वे अडवून आंदोलन करण्यात आलं. रेल्वे अडवणाऱ्या सुमारे ४९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतल्याची माहिती आंदोलकांचे नेते प्रा राम बाहेती यांनी दिली.

****

हिंगोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काल नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर वारंगा फाटा इथं केलेल्या ‘रस्ता बंद’ आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक एक तास ठप्प होती. शेतीचा वीज पुरवठा सुरळीत करावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन होतं. शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा वीज बिलासाठी खंडित करण्याचं काम थांबवलं नाही तर ‘जेलभरो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार गजानन घुगे यांनी यावेळी दिला.

****

बीड जिल्ह्यातल्या माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना अवैध वाळूच्या गाड्या सुरू ठेवण्यासाठी आपल्या चालकामार्फत ६५ हजार रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...