Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०२ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी,
नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं.
नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने
धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित
रहा.
****
** राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्यांना आठ
हजार ८७३ कोटी रुपयांचा निधी; ५० टक्के रक्कम कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी
वापरण्याची सूचना
** कोरोना विषाणू संसर्गानं बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत एकसमान धोरण
आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र
सरकारला निर्देश
** राज्यातल्या सर्व महानगरपालिकांनी
प्राणवायू क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावं
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अपेक्षा
** १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांच्या कोविड
लसीकरणाला प्रारंभ
** राज्यात ६३ हजार २८२ नविन कोविड
रुग्णांची नोंद, मराठवाड्यात १३२ जणांचा मृत्यू तर ६ हजार ९८४ बाधित
** राज्यातील
पंढरपूर विधासभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसह पाच राज्यातील विधानसभा
निवडणुकीच्या मतदानाची आज मोजणी
आणि
** महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन राज्यभर
उत्साहात साजरा
****
केंद्र सरकारनं राज्य आपत्ती प्रतिसाद निधी - एसडीआरएफ चा पहिला भाग
म्हणून आठ हजार ८७३ कोटी ६० लाख रुपये निधी राज्य सरकारांना आगाऊ दिला आहे. या
रकमेच्या ५० टक्के रक्कम राज्य सरकारांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी
वापरता येणार आहे. या अंतर्गत रुग्णालयांमध्ये प्राणवायू निर्मिती आणि साठवणूक
प्रकल्प सुरु करणं, कृत्रिम जीवरक्षक प्रणाली तसंच हवा शुद्ध
करणारी उपकरणं बसवणं, रुग्णवाहिका व्यवस्था बळकट करणं,
कोविड रुग्णालयं, चाचणी प्रयोगशाळा, इत्यादी सोयी सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात.
****
कोरोना विषाणू संसर्गानं बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत एकसमान धोरण आखण्यात
यावं तसंच
प्राणवायू पुरवठ्यासंदर्भात
अद्ययावत माहिती प्रदर्शित करावी यावी, असे
निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. सध्या उद्भवलेली
आरोग्यासंदर्भातली आपत्कालिन परिस्थिती हाताळण्याबाबत फेरविचार करावा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या
अध्यक्षतेखालील पीठाने, कोविड प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर, प्राणवायूचे सिलिंडर आणि सदर परिस्थितीत
सुधारणा करण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे, ते स्पष्ट
करण्यास सांगितलं आहे. लस उत्पादन सुविधा वाढवाव्यात, जेनेरिक
औषधांच्या निर्मितीसाठी परवाना अनिवार्य करावा, पेटंट
असलेल्या औषधांच्या उत्पादनासाठी त्रयस्थ पक्षाला परवानगी द्यावी असे निर्देश
सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत.
****
राज्यातल्या सर्व महानगरपालिकांनी प्राणवायू क्षेत्रात स्वयंपूर्ण झालं
पाहिजे, प्राणवायू सुविधेसाठी पालिकांना कुणावरही
अवलंबून राहण्याची गरज पडू नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबई, मुंबई महानगर क्षेत्रातल्या
सर्व महानगरपालिका, तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवड
महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत बोलत होते.
सौम्य लक्षणांच्या गृह विलगीकरणातल्या रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी एक स्वतंत्र
नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ तसंच निवृत्त डॉक्टरांकडे रुग्णांच्या
संपर्काची जबाबदारी द्यावी. कोविडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही
मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली
असून, प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवण्याच्या
सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
****
१८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या कोविड लसीकरणाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात
अनेक ठिकाणी १८ वर्षावरील तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करून लसीकरण करून घेतलं. काल २६
जिल्ह्यात एकूण १३२ लसीकरण सत्रांमध्ये १८ ते ४४ वयोगटातल्या ११ हजार ४९२ जणांचं
लसीकरण करण्यात आल्याचं, आरोग्य विभागाकडून कळवण्यात आलं. उर्वरीत
जिल्हयांमध्ये आज दोन मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध
असलेल्या साठ्यानुसार राज्याने १८ ते ४४ वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीच्या तीन लाख मात्रा खरेदी केल्याची
माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
औरंगाबाद इथं महापालिकेच्या मुकुंदवाडी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर काल
दुपारी दोन वाजता १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला. दरम्यान, आज या केंद्रावर लसीकरण बंद राहणार आहे.
लातूर इथं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पालकमंत्री अमित
देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.
नांदेड शहरात महानगरपालिकेच्या हैदरबाग
इथल्या रूग्णालयात या
मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
****
लसीकरणाला गती देण्यावर राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी सांगितलं आहे. पुण्यात विधानभवनात काल
झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांचं मोफत लसीकरण
करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधीची तरतूदही केलेली आहे.
परंतु लसीची उपलब्धता मर्यादित असल्याने नागरिकांनी लगेच लसीकरण केंद्रांवर गर्दी
करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि
वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असं आवाहन पवार यांनी
केलं.
****
रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप काल हैद्राबाद
इथं पोहोचली. रशियाच्या लसीमुळे भारताच्या लसीकरण मोहिमेला वेग येईल, आणि कोविड विरोधातल्या लढ्याला बळ मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयाचे
प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे. पहिल्या खेपेत रशियाकडून स्पुटनिक
लसींच्या दीड लाख कुप्या मिळाल्या आहेत, लसींचा आणखी मोठा
साठा लवकरच भारतात पोहोचणार असल्याचं बागची यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारनं माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यासह
विविध मागण्यांसाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल कामगार
दिनी मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. मुंबई, नवी
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात १६ रेल्वे स्थानकांबाहेर मागण्यांचे फलक झळकावत
कामगारांनी निदर्शनं केली. या कामगारांना
रेल्वे, तसंच बस प्रवासाची परवानगी द्यावी तसंच विमा
संरक्षण कवच देण्यात यावं अशी मागणी कामगारांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास
पुढील आठवड्यात रोज सकाळ संध्याकाळ राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल
असा इशारा यावेळी नरेंद्र पाटील यांनी दिला.
****
राज्यात काल ६३ हजार २८२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ६५ हजार ७५४
झाली आहे. काल ८०२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६९ हजार ६१५
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे.
काल ६१ हजार ३२६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३९ लाख ३०
हजार ३०२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ८४ पूर्णांक २४ शतांश टक्के झाला आहे. सध्या
राज्यभरात सहा लाख ६३ हजार ७५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ६ हजार ९८४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३२
जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या १७, लातूर २९, बीड १४, नांदेड २२, उस्मानाबाद १९, परभणी १९, जालना
२५, तर हिंगोली जिल्ह्यातल्या सहा रुग्णांचा समावेश
आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार १३४ रुग्ण
आढळले. बीड जिल्ह्यात एक हजार ५१२, लातूर १ हजार २९०, परभणी एक हजार ७२, उस्मानाबाद ६६७, जालना ५३४, नांदेड
५८४, तर हिंगोली जिल्ह्यात १९१ नवे
रुग्ण आढळून आले
****
पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू,
केरळ, आणि पुद्दुचेरी या चार राज्यं आणि एका
केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची आज मोजणी होणार
आहे. त्यासोबतच देशभरातल्या चार लोकसभा मतदार संघातल्या आणि १३ राज्यातल्या १३
विधानसभा मतदार संघातल्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचीही आज मतमोजणी होणार
आहे. यामध्ये पंढरपूर इथल्या जागेचाही समावेश आहे. सकाळी आठ वाजेपासून या
मतमोजणीला सुरवात होईल. सर्व मतमोजणी केंद्रांवर कोविड नियमांचं कटाक्षानं पालन
करण्याचे निर्देश देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिले आहेत.
****
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन काल सर्व राज्यभर उत्साहात
पण कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून साजरा झाला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवनात तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं, त्यानंतर त्यांनी
हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केलं.
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय आयुक्त सुनील
केंद्रेकर यांच्या हस्ते, ध्वजारोहण करण्यात आलं. जालना इथं
पालकमंत्री राजेश टोपे, लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख,
नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण, परभणी इथं
पालकमंत्री नवाब मलिक, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे,
धुळे इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार, यवतमाळ
इथं पालकमंत्री संदिपान भुमरे, हिंगोली इथं जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी, उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कौस्तुभ
दिवेगावकर यांच्या हस्ते, तर औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं उद्या सोमवार पासून सात
मे पर्यंत बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश काल जारी
केले. या कालावधीत, अत्यावश्यक सेवेतील तसंच कोविड संबंधी
उपायोजना करणारी कार्यालयं सुरू राहणार असल्याचं या आदेशात स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोविड लसीकरणाची गती
वाढवण्यासाठी बुथनिहाय नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले
आहेत. ते काल नियोजन समिती सभागृहात कोविड परिस्थिती आढावा बैठकीत बोलत होते.
जिल्ह्यात प्राणवायू तसंच रेमडेसिविर औषधीचा मुबलक साठा उपलब्ध असून, रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असं मलिक म्हणाले. महापालिका क्षेत्रात कोविड-19
चाचण्यांची गती वाढवावी. भाजीपाला तसंच फळ विक्रेते, फेरीवाले
यांना चाचणी बंधनकारक करावी, यांच्यासह नागरिकांच्या
लसीकरणावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही मलिक यांनी केल्या.
****
अहमदनगर शहरामध्ये मध्य
रात्री बारा वाजल्यापासून सात
दिवसांची कडक टाळेबंदी लागू
झाली आहे. ती १० मे पर्यंत कायम राहील.
यामध्ये आरोग्य सुविधा वगळता फक्त दुधाचा सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान पुरवठा केला
जाईल. अन्य सर्व वस्तुंची विक्री बंद राहणार आहे, असं
पालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातली कोरोना बाधितांची रुग्णवाढ धोकादायक असल्याची प्रतिक्रिया
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी काल
जिल्ह्यातली कोविड परिस्थितीशी संबंधीत आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातली रुग्णवाढ थांबवण्यासाठी सर्व यंत्रणा अधिक सक्षमपणानी काम करण्यावर लक्ष केंद्रीत
करत असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले.....
बैठकीमध्ये
कंम्प्लीट लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये पुर्णपणाने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य
कार्यकारी अधिकारी यांना स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन असला
पाहीजे. संचारबदीमध्ये कसल्याही प्रकारचा संचार याठिकाणी होणे हे आपल्याला दिसलं नाही
पाहीजे. हे पूर्णपणाने थांबलं पाहिजे. अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला
दिल्या आहेत. आणि यात पेशंटची जर वाढ झाली, तर कुठे तरी लॉकडाऊन करण्यामध्ये संचारबंदी
करण्यामध्ये आणि पोलिस प्रशासनाचा आवश्यक असणारा बळ तो तिथं कमी पडतं आहे. हे पण आम्ही त्यांना स्पष्टपणाने सांगितलं आहे.
****
लातूर महानगरपालिकेच्या वतीने ग्रामदैवत सिद्धेश्वर - रत्नेश्वर देवस्थान
परिसरात उभारलेल्या जम्बो कोविड केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री देशमुख यांच्या
हस्ते काल करण्यात आलं. या कोविड केंद्रात १०० रुग्णखाटा असून, यापैकी ६० रुग्णखाटांना प्राणवायू सुविधा उपलब्ध आहे, तर लवकरच २० रुग्णखाटांना व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्याला राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ५२ अद्ययावत रूग्णवाहिका
मिळाल्या आहेत. त्यापैकी काही रूग्णवाहिकाचं पालकमंत्री अशोक चव्हाण हस्ते काल
लोकार्पण करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यात कालपासून कोविड मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आलं. राज्यसभेच्या
खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्या पुढाकारातून कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन अॅन्ड
वेलफेअर संस्थेच्या माध्यमातून हे केंद्र सुरु करण्यात आलं आहे. जिल्ह्यात
नागरिकांना कोविड उपचार वेळेवर मिळत नसल्यास, प्राणवायू
किंवा रेमडीसीव्हीर इंजेक्शन मिळण्यात अडचण असल्यास, किंवा
रुग्णालयात दाखल करण्याबाबत समस्या येत असल्यास या केंद्राद्वारे मदत केली जाणार
आहे.
****
नाशिक शहरातील कोरोना विषाणू संसर्ग स्थितीचा आढावा घेण्यासाठी
गेलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा बिटको रूग्णालयात व्हिडीओ काढून सामाजिक प्रसार माध्यमावर बदनामी केल्या
प्रकरणी नाशिक पोलिसांनी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला
आहे. या प्रकरणी हेमंत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
****
नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वारे सुटल्यामुळं फळबागांचं मोठ्या
प्रमाणात नुकसान झालं. यात केळी, आंबा, जांभूळ आदी पिकांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात
काही ठिकाणी काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरात घाटी रुग्णालयात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न
आयटक तर्फे काल कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे नेते
विकास गायकवाड यांनी रशियन क्रांती पासून सुरु झालेल्या कामगार चळवळीबद्दल
मार्गदर्शन केलं.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त
समारंभ येत्या चार मे रोजी होणार आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी
यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या
सभारंभाचं, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर थेट प्रसारण
होणार आहे.
//*************//
No comments:
Post a Comment