आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन आज उत्साहात पण कोविड
प्रतिबंधात्मक नियम पाळून साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात
ध्वजारोहण केलं, त्यानंतर हुतात्मा स्मारकास भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय आयुक्त
सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते,
उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक, लातूर
इथं पालकमंत्री अमित देशमुख, हिंगोली इथं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, नांदेड इथं पालकमंत्री
अशोक चव्हाण, तर जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
कामगार दिनही आज साजरा होत आहे. कामगारांचा सन्मान करण्यासाठी जगभरात
हा दिवस साजरा केला जातो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, राष्ट्र निर्माणात महत्वपूर्ण
योगदान देणाऱ्या सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
शिखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर यांची ४०० वी जयंती प्रकाश पर्व म्हणून
आज सर्वत्र साजरी होत आहे. गुरु तेग बहादुर यांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा दिला,
त्यांच्या सर्वोच्च बलिदानातून लोकांना प्रेरणा मिळाली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरु
तेग बहादुर यांना अभिवादन केलं आहे.
****
गुजरात मधल्या भरुच इथं पटेल कोविड रुग्णालयाला मध्यरात्री लागलेल्या
आगीत दोन कर्मचाऱ्यांसह १४ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं
नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
१८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांसाठी आजपासून कोविड लसीकरण सुरू होत
आहे. राज्यात आज प्रतिकात्मक स्वरूपात छोट्या प्रमाणावर लसीकरण केलं जाईल, केंद्र सरकारकडून
कोविड लसींच्या जास्तीत जास्त मात्रा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरळीत होईल, असं आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं
****
राज्यातल्या सर्व शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयांना आजपासून उन्हाळी सुटी
जाहीर करण्यात आली आहे. १४ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
****
No comments:
Post a Comment