Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
उच्च न्यायालयं
लोकशाहीचा महत्वपूर्ण आधारस्तंभ असून, त्यांचं मनोबल कमी करु शकत नाही, असं सर्वोच्च
न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीविरोधात निवडणूक आयोगानं
दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोरोना विषाणूची दुसरी
लाट आलेली असतानाही निवडणूक आयोगानं प्रचारसभा घेण्यास परवानगी दिली, त्यामुळे दुसऱ्या
लाटेला एकटा निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं सांगत, खूनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,
अशा शब्दात मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलं होतं. न्यायालयाचं मत
माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं, खूनाचा गुन्हा दाखल करण्याच्या
विधानाला, सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्याचबरोबर सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून
व्यक्त केली जाणारी तोंडी मतं प्रसिद्ध करण्यापासून, माध्यमांना रोखण्याची विनंती केली
होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर
सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं, सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून मांडल्या जाणाऱ्या
तोंडी मतांना वार्तांकनात प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना थांबवू शकत नाही, असं स्पष्ट
केलं. आणि फक्त टिप्पणीच्या आधारे कोणत्याही न्यायालयावर गुन्हा दाखल करता येत नाही,
असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची ही याचिका फेटाळून लावली.
****
जागतिक वृत्तपत्र
स्वातंत्र्य दिन आज साजरा होत आहे. सामान्य नागरिकांच्य़ा सार्वजनिक सौख्याची माहिती
देणं ही यावर्षीची वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाची संकल्पना आहे. सर्व राष्ट्रांनी स्वतंत्र,
निष्पक्ष माध्यमांना समर्थन देण्याचा प्रयत्न करावा, असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव
अंतोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी वृत्तपत्र
स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमांना शुभेच्छा दिल्या आहेत. माध्यमांनी वस्तुनिष्ठता, अचूकता,
निष्पक्षता आणि चांगुलपणासारख्या पत्रकारीतेच्या सिद्धांतासाठी कटीबद्ध राहावं, असं
उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
****
देशात काल तीन
लाख ६८ हजार १४७ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर तीन हजार ४१७ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी ९९ लाख २५
हजार ६०४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत दोन लाख १८ हजार ९५९ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. तर काल तीन लाख सात हजार ३२ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी ६२
लाख ९३ हजार तीन रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ३४ लाख १३ हजार ६४२ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
राज्यात कोरोनाचा
विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि लसीकरणामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची
शक्यता, गेल्या महिन्यात वर्तवण्यात आल्यानंतर, सरकारकडून नागरिकांना रक्तदान करण्याचं
आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत, अवघ्या एका
महिन्यात, ३० हजार युनिट रक्त संकलन केल्यानं, राज्यातला रक्तसाठा ५० हजारांवर पोहोचला
आहे. या रक्तदानामुळे दैनंदिन रक्ताची गरज भागून, सध्या राज्यामध्ये, ५० हजार युनिट
रक्त साठा उपलब्ध झाला आहे. हा रक्तसाठा जवळपास महिनाभर पुरण्याची शक्यता असल्याची
माहिती, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक, डॉक्टर अरुण थोरात यांनी दिली.
****
केंद्रीय माध्यमिक
शिक्षण मंडळ इयत्ता दहावी च्या परीक्षांचे निकाल २० जून रोजी जाहीर करणार आहे. मंडळाने
गुणांकन पद्धती आणि वेळाचं नियोजन कसं असेल, यासंदर्भात एक परिपत्रक काढलं आहे. कोरोना
विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यानंतर मंडळानं
अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुण देण्याचं निश्चित केलं आहे.
****
परभणी शहरातल्या
विविध रुग्णालयांमधल्या कोविड बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्व हिंदू परिषदेच्या
स्थानिक शाखेनं, ‘निवारा’ या केंद्राद्वारे, निवास आणि भोजनाची सेवा उपलब्ध केली आहे.
या केंद्राचा आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
****
दक्षिण मध्य
रेल्वेनं कमी प्रवासी संख्येमुळे पुढचे काही दिवस काही रेल्वे गाड्या अंशत:, तर काही
रेल्वे गाड्या पूर्णत: रद्द केल्या आहेत. औरंगाबाद नांदेड औरंगाबाद, नांदेड आदिलाबाद
नांदेड, सिकंदराबाद शिर्डी सिकंदराबाद, औरंगाबाद रेणीगुंठा औरंगाबाद तर परभणी नांदेड
या गाड्या, पुढचे काही दिवस धावणार नाहीत. नांदेड तांदूर परभणी ही गाडी अंशत: रद्द
करण्यात आली असल्याचं, रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
स्वातंत्र्यवीर
विनायक सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश उपाख्य बाबाराव सावरकर, यांची अंदमानातील
काळ्या पाण्याच्या शिक्षेतून, दोन मे १९२१ रोजी मुक्तता झाली होती. या घटनेच्या शताब्दी
वर्षानिमित्त मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाद्वारे, सोळा मे पर्यंत
ऑनलाइन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. फेसबुकवरील सावरकर स्मारक याद्वारे
रोज संध्याकाळी सात वाजता, देशातील नामांकित सावरकर अभ्यासक, हिंदी भाषेतून व्याख्यानं
सादर करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment