Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०४ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी,
नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं.
नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने
धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित
रहा.
****
·
कोरोना विषाणू प्रतिबंधक लस किंमत धोरणाचा फेरआढावा घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या
केंद्र सरकारला सूचना.
·
कोविड-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता
केंद्र सरकारचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय, पदव्युत्तर राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश
परीक्षा चार महिन्यासाठी स्थगित; १०० दिवस कोविड रुग्ण सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना,
पंतप्रधान विशिष्ट कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कारानं गौरवणार.
·
शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकचे दर आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयांविरुध्द
कारवाई करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश.
·
राज्यात ४८ हजार ६२१ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १३५ जणांचा मृत्यू
तर सहा हजार ६४९ बाधित.
·
ग्रामीण महाआवास अभियानाला पाच जूनपर्यंत मुदतवाढ.
आणि
·
औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या नियमभंग प्रकरणी त्यांच्याविरुद्ध
कोणता गुन्हा नोंदवण्यात आला, याची माहिती देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे पोलिसांना आदेश.
****
केंद्र सरकारनं कोरोना विषाणू प्रतिबंधक लस किंमत धोरणाचा फेरआढावा घ्यावा,
असा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. प्रथमदर्शनी हे धोरण लोकांच्या आरोग्याला
हानीकारक असल्याचं दिसून येतं, या धोरणाचा १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या लसीकरण मोहिमेला
फटका बसू शकतो, अशी भीती न्यायालयानं व्यक्त केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीचा
विचार व्हावा, आर्थिक बाबींचा विचार व्हावा, सरकारी रुग्णालयातल्या उपचारांबाबत धोरण
बनवावं, अशा सूचनाही न्यायालयानं केंद्र सरकारला केल्या आहेत.
****
देशात कोविड-19 च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध
व्हावं यादृष्टीनं, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण
निर्णय घेतले. यामुळे कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी, वैद्यकीय व्यावसायिकांची वाढ
होण्यास मदत होणार आहे. बैठकीत राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा- नीट पदव्युत्तर
परीक्षा, किमान चार महिने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोविडच्या रुग्णांवर
उपचार करण्यासाठी, प्रशिक्षित डॉक्टर्सची उपलब्धता वाढेल.
वरीष्ठ डॉक्टर्स आणि प्राध्यापकांच्या निगराणीखाली, वैद्यकीय आंतरवसिता करत
असलेल्या विद्यार्थ्यांना कोविड व्यवस्थापनाच्या कामात सहभागी करुन घेण्यासही, या बैठकीत
मान्यता देण्यात आली. दूरध्वनीवरुन सल्ला देण्यासाठी, तसंच सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांची
देखरेख करण्याच्या कामामध्ये, एम बी बी एसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची सेवा
घेण्यात येणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची निवासी वैद्यकीय
अधिकारी म्हणून घेण्यात येत असलेली सेवा कायम ठेवण्यात आली आहे. वरिष्ठ डॉक्टर्स आणि
नर्सच्या मार्गदर्शनाखाली, बी एस्सी, जनरल नर्सिंग और मिड वाइफरी नर्सची सेवा घेण्यासही
मान्यता देण्यात आली. किमान १०० दिवस कोविड व्यवस्थापन कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना,
आगामी कायम सरकारी नोकर भरतीच्यावेळी प्राधान्य दिलं जाईल. याशिवाय १०० दिवस कोविड
रुग्ण सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, पंतप्रधान विशिष्ट कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार
दिला जाईल.
****
देशात कोविड मृत्यूदर हा एक टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याची माहिती, केंद्रीय
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. सध्या देशात १२ राज्यात एक लाखाहून
अधिक, तर सात राज्यात ५० हजार ते एक लाखापर्यंत रुग्ण असल्याचं त्यांनी काल वार्ताहरांशी
बोलतांना सांगितलं. देशाच्या विविध भागांत रेल्वेमार्फत प्राणवायूचा पुरवठा केला जात
आहे. यापुढे प्राणवायुच्या साठ्याजवळच कोविड रुग्णालय उभारणार असून, प्राणवायुच्या
उत्पादन आणि पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे. देशात १४ नायट्रोजन प्रकल्प निवडले गेले
असून, त्याठिकाणी नियोजन करुन प्राणवायू बनवला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी
दिली. प्राणवायूचा काळाबाजार न करण्याचं आवाहनही, अग्रवाल यांनी नागरिकांना केलं आहे.
****
खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांच्या उपचारासाठी, शासनानं ठरवून दिलेल्या
दरापेक्षा अधिकचे दर आकारणाऱ्या रुग्णालयांविरुध्द कारवाई करण्याचे निर्देश, आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी दिले आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात काल कोविड उपाय योजनांसंदर्भात
आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. नागरिकांनी कोविडचं कोणतंही लक्षण आढळल्यास, त्वरित
लाळेच्या नमुन्याची चाचणी करून उपचार घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं. तसंच बाधित
रुग्णांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देऊन रुग्णांचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता
घेण्याचे निर्देशही, टोपे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
रेमडेसिवीर इंजेक्शनच नाव कोविप्री असल्याची बातमी सामाजिक माध्यमांवर प्रसारित
होत असून, या बातमीचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. कोविप्री नावाचं कोणतंही रेमडेसिवीर
इंजेक्शन नसल्याचं, पत्र सूचना कार्यालय - पीआयबीनं सांगितलं. नकली औषध आणि इंजेक्शन
पासून सावध राहण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे.
****
राज्यात काल ४८ हजार ६२१ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या ४७ लाख ७१ हजार ०२२ झाली आहे. काल ५६७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७० हजार ८५१
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ५९ हजार ५०० रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४० लाख ४१ हजार १५८ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८४ पूर्णांक सात दशांश टक्के झाला आहे.
सध्या राज्यभरात सहा लाख ५६ हजार ८७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा हजार ६४९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
१३५ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३१, लातूर
३७, नांदेड २५, उस्मानाबाद १३, परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी ११, जालना पाच
तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ८०१ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात एक हजार २५६, लातूर
१ हजार २७, परभणी ९१७, जालना ८९८, उस्मानाबाद ८१४, नांदेड ७०२, तर हिंगोली जिल्ह्यात
२३४ नवे रुग्ण आढळून आले
****
राज्य शासनाच्या सेवेतल्या दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित
राहण्यापासून सूट देण्याचा, तसंच वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याचा निर्णय, सामाजिक न्याय
आणि विशेष सहाय्य मंत्रालयानं घेतला आहे. वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देतांना,
कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होणार नाही, याकडेही लक्ष देण्याच्या सूचना मंत्रालयानं
दिल्या आहेत. दिव्यांगांबद्दल हा दिलासादायक निर्णय घेतल्याबद्दल, विविध दिव्यांग संघटना,
दिव्यांग कर्मचारी संघटना तसंच सामाजिक संस्थांनी मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
****
राज्यातल्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, आणि राज्य पुरस्कृत सर्व आवास
योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी, आणि त्यात गुणवत्ता आणण्यासाठी राबवल्या जात
असलेल्या ग्रामीण महाआवास अभियानाला, राज्य शासनानं येत्या पाच जूनपर्यंत मुदतवाढ दिली
आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या पात्र लाभार्थ्यांना
पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा, तसंच घरकुलासोबतच शासनाच्या इतर योजनांचा लाभ
देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी, हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असताना, शिवसेनेचे
आमदार संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी वाळूज परिसरात गर्दी जमवून, जलवाहिनीच्या
कामाचं भूमिपूजन केल्याप्रकरणी, त्यांच्याविरुद्ध कोणता गुन्हा नोंदवण्यात आला, याची
माहिती देण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. कोविड
रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधांबाबत दाखल सुमोटो याचिकेवरच्या
सुनावणीदरम्यान, न्यायालयानं हे निर्देश दिले. हेल्मेट घालणं, मास्क लावणं, तसंच आधार
कार्ड सोबत ठेवण्याबाबतच्या आदेशाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचं नमूद करुन, यासंदर्भात
किती गुन्हे दाखल केले, याचीही माहिती खंडपीठानं मागितली आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये
कुठेही विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी नाही, यासंदर्भात काय कार्यवाही केली, अशी
विचारणाही खंडपीठानं प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात पुढची सुनावणी सहा मे रोजी होणार
आहे.
****
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात खासदार इम्तियाज़
जलील यांच्या वतीनं, तीन रुग्णवाहिकांची मोफत सेवा कालपासून सुरु करण्यात आली. या रुग्ण
वाहिका सेवेचं उद्घाटन, शासकीय वैद्यकिय रुग्णालयातील कोविड केंद्रामध्ये अहोरात्र
सेवा देणाऱ्या परिचारीका, वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर उपस्थित होत्या.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरातल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात नवीन बांधकाम असलेल्या
मुलींच्या वस्तीगृहात, शंभर खाटांचं कोविड रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय काल घेण्यात
आला. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे
मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मान्यता दिली असून,
जिल्हा शल्यचिकित्सक यांना, संबंधित कोविड सुश्रूषा केंद्राला वैद्यकीय सेवा सुविधा
पुरविण्याचे आदेश दिले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या ३० हजार ६९३ बांधकाम कामगारांना, शासनाकडून आतापर्यंत चार
कोटी ६० लाख ३९ हजार रूपये प्राप्त झाले आहेत. संचारबंदीच्या काळात प्रत्येकी पंधराशे
रुपयांची मदत न विसरण्यासारखी असून, यातून किमान औषध, तसंच इतर खर्चासाठी मदत होणार
असल्याचं, बीड तालुक्यातल्या साक्षाळपिंप्रीच्या बांधकाम कामगारांनी सांगितलं.
ते म्हणाले –
माझं नाव पुजा नवनाथ काशे. मी साक्षाळपिंप्री येथील रहिवासी
आहे. ता.जि.बीड. मला या लॉकडाऊनच्या काळात जे दीड हजार रूपये सरकारने मला मदत केली
त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
माझं नाव जाधव भागवत बबन. पहिल्या लॉकडाऊनमधे शासनाने तीन
हजार रूपये दिले. परत दुसरा हप्ता दोन हजारचा आला होता. परत डबल लॉकडाऊन लागलंय. या
लॉकडाऊनमधे परत पंधराशे रुपयाची मदत शासनाने केली. आमच्या घरात सगळे सात जणं आहेत.
पंधराशे रूपये मदत आमच्या कुटुंबाला काही पुरत नाही.
रंजना नवनाथ न्ननवरे. राहणार साक्षाळपिंप्री. पंधराशे रुपये
मदत मिळाली. आणखी शासनाने आम्हाला थोडी मदत करावी.
मी वाल्मिक वसंत क्षीरसागर. शासनाने २०२० मधे आम्हाला तीन
हजार रूपये टाकले होते. तर आता पंधराशे रुपये टाकलेत. धन्यवाद.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधासाठी लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात
नियमांच उल्लंघन करणाऱ्या ८० दुकानं, विनामास्क फिरणाऱ्या तीन हजार ३३१ नागरिक, तसंच
एक हजार १७७ आस्थापनांवर, काल दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती, जिल्हाधिकारी
कौस्तुभ दिवेगांवकर यांनी दिली. परभणी शहरातही संचारबंदीच्या काळात नियमांचं उल्लंघन
करण्याऱ्यांविरुद्ध आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार, महापालिकेच्या पथकानं
काल कारवाई केली. यावेळी १७ दुकानांवर तसंच विनामास्क फिरणाऱ्या २३ नागरिकांविरुद्ध
कारवाई करण्यात आली.
****
रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी महानगरपालिकेच्या दोन
कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. औषधी भंडार प्रमुख विष्णू रगडे आणि कंत्राटी सहायक फार्मासिस्ट
प्रणाली कोल्हे अशी त्यांची नावं असून त्यांच्याविरुद्ध ४८ इंजेक्शन चोरल्याचा आरोप
आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, काल परभणी इथं जिल्हा
सामान्य रूग्णालय, तसंच जिल्हा परिषद इमारत इथं उभारण्यात आलेल्या कोविड केंद्राला
भेट देऊन, कोविड बाधित रूग्णांशी संवाद साधला. जिल्हा सामान्य रूग्णालयाला एका रूग्णवाहिकेची
नितांत आवश्यकता असल्याचं निदर्शनास आल्यानंतर, चव्हाण यांनी आमदार निधीतून दहा दिवसात
रूग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या सास्तूर इथं, स्पर्श ग्रामीण
रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय आणि निवासी अपंग शाळेच्या वतीनं, कोविड संबंधित नियमांचं
पालन करत, काल कोविड विषयी जनजागृती फेरी काढण्यात आली. बेफिकीरपणा आणि बिनधास्तपणाला
मुरड घातल्यास कोविडवर मात करता येईल, असं प्रतिपादन स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प
अधिकारी रमाकांत जोशी यांनी केलं. अफवांना बळी न पडता सर्वांनी कोविड लस घेण्याचं आवाहन,
जिल्हा परिषद सदस्या शीतल पाटील यांनी यावेळी केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या सात रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधीतून शंभर
कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी
काल दिली. या कामांमध्ये जालना, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर आणि परतूर तालुक्यातल्या
दोन नवीन रस्त्यांसह, पाच रस्त्यांच्या नूतनीकरण आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांचा समावेश
आहे. जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल दानवे यांनी, केंद्रीय रस्ते वाहतूक
मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीत, काल
जवळपास दोन हजार क्विंटल हळदीची आवक झाली. पंधरा दिवसाच्या बंद नंतर कृषी उत्पन्न बाजार
समिती सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानं, काल हळदीची आवक झाली असून,
सरासरी साडे सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. खरीप हंगाम सुरू होत असल्यानं
हळदीची आवक वाढली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्र’,
महिनाभरात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.
सामाजिक दायित्व निधी अंतर्गत दीड कोटीचा निधी, हे केंद्र उभारण्यासाठी मिळणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. विद्यापीठात ‘उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्र’ सुरु करण्यासंदर्भातला
प्रस्ताव, औरंगाबाद इलेक्ट्रीकल्सला देण्यात आला होता. या कंपनीचे उपाध्यक्ष सोमेन
मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली असून, हा प्रस्ताव
मंजूर करण्यात आला असल्याचं कुलगुरु म्हणाले.
****
No comments:
Post a Comment