Tuesday, 11 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.05.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यानंतर पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी आता ईडीनेही गुन्हा दाखल केला असून, शंभर कोटी वसुली प्रकरण तसंच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर या पैशाचं नेमकं झालं काय याचा तपास ईडी करणार आहे. 

****

आपल्या वैज्ञानिकांनी कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत महत्वपूर्ण कार्य केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, गेल्या वर्षभरात कोविड-19 च्या लढ्यात काम केलेल्या वैज्ञानिकांची प्रशंसा केली आहे. शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमांना आणि तंत्रज्ञानाविषयी उत्साही असलेल्यांनाही नमन करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ११ मे १९९८ रोजी भारतानं पोखरण अणू चाचणी यशस्वी केली होती, त्यानंतर हा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

****

कोरोना संसर्गाच्या संकटामुळे हॉटेल मॅनेजमेंटची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. १२ जून रोजी नियोजित असलेली ‘एन सी एच एम जेईई ही परीक्षा आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आयोजित केली जाईल, असं नॅशनल टेस्टिंग एजन्सी - एनटीएनं कळवलं आहे.

****

फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा, देशांत कोविड-१९ चा संसर्ग वाढण्याशी काहीही संबंध नाही असा खुलासा, दूरसंवाद मंत्रालयानं केला आहे. फाईव्ह जी मोबाईल टॉवर्सच्या चाचण्यांमुळे देशांत कोरोनाची दुसरी लाट आली असल्याच्या अफवा, काही समाजमाध्यमांवर पसरवल्या जात आहेत. याबाबतची चुकीची माहिती आणि अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

कोरोना संकटकाळात संसर्ग रोखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आगामी इद-उल-फित्र निमित्त होणाऱ्या प्रार्थना आपापल्या घरातूनच कराव्यात, असं आवाहन दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी केलं आहे. तसंच फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनीही, नागरिकांना कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत, आणि संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचं पालन करावं, असं आवाहन केलं आहे.

****

मराठावाडा विभागातल्या २४ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल आढावा घेतला. यातील संथ गतीनं सुरू असलेल्या कामांविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रखडलेल्या कामांबाबत त्यांनी संबंधित कंत्राटदारांना कामं तातडीनं काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या औरंगाबाद मंडळाचा सन २०२०-२१ यावर्षाच्या वार्षिक आराखड्याचाही आढावा घेण्यात आला. 

****

लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करत असून, या संदर्भातील सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. काल मुंबईत कलावंतांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यातल्या लोककलावंतांचं सर्वेक्षण करण्यात येणार असून, शासनानं मंजूर केलेलं अर्थसहाय्य, थेट या लोककलावंतांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती, यावेळी देण्यात आली.

****

कोविन-अ‍ॅपमधल्या तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे, त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरण अ‍ॅपचं संपूर्ण विकेंद्रीकरण करावं, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. महत्त्वपूर्ण अशा लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून, त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत, असंही पाटील यांनी नमूद केलं आहे. 

****

बुलडाणा जिल्ह्यात कालपासून २० मे पर्यंत कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. आज जिल्ह्यात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्हाधिकारी रामामूर्ती यांनी स्वतः रस्त्यावर उतरून टाळेबंदीची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही, याची पाहणी केली.

****

नांदेड रेल्वे विभागातल्या नगरसोल इथून काल एकशे पन्नासावी किसान रेल्वे २४६ टन कांदा घेऊन पश्चिम बंगाल राज्यातल्या मालडा शहराकडे रवाना झाली. नांदेड रेल्वे विभागानं या वर्षी ५ जानेवारी पासून १२६ दिवसात १५० किसान रेल्वेच्या माध्यमातून नगरसूल स्थानकावरून देशाच्या विविध भागात कांदा, द्राक्षे आणि टरबूज असा सुमारे ४७ हजार ९५७ टन शेतमाल पोहोचवला आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर ऑनलाईन सुरु आहेत. काल ४५ हजार २२९ जणांनी ही ऑनलाईन परिक्षा दिली.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर शहरात काल विधिज्ञ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड केंद्र, ग्रामीण रूग्णालय, तहसील, पंचायत समिती, पोलीस ठाणे, भटक्या वस्ती इथं फळे, सनिटायझर, मास्कचं वाटप करण्यात आलं.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...