Tuesday, 11 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.05.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणात हस्तक्षेप करु नये - केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र.

·      कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या ११ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू.

·      औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालयं तत्काळ सुरु होणार.

·      राज्य परीक्षा परिषदेची इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय.

·      राज्यात ३७ हजार ३२६ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १०४ जणांचा मृत्यू तर चार हजार ८८९ बाधित.

आणि

·      राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार.

****

केंद्र सरकारचं लसीकरण धोरण तज्ज्ञांशी चर्चा करून बनवलं असून, त्यामध्ये फारसा फेरबदल करण्याची संधी नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं यात हस्तक्षेप करू नये, अशा आशयाचं शपथपत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठापुढे केंद्राच्या लसीकरण धोरणाची सुनावणी सुरु असताना, वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या किमती बाबत तसंच अन्य बाबींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हरकत घेतली होती, आणि या धोरणाचा फेरआढावा घेण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती.  वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या विनंतीनंतर १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाचं धोरण निश्चित करण्यात आलं, त्यानुसार केंद्र सरकारने लस उत्पादक कंपन्यांना राज्यांसाठी सवलतीचे दर आकारण्याची सूचना केली. देशातल्या सर्व राज्यांसाठी ही लस एकाच किमतीत वितरीत करण्यात यावी, असे निर्देशही केंद्राने लस उत्पादक कंपन्यांना दिल्याचं, या शपथपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

****

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या ११ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात कोविड नियंत्रणासाठी येत्या बुधवारी १२ मे पासून २२ मे पर्यंत, कडक टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सुविधांची आणि किराणा दुकानं दुपारी बारा वाजेपर्यंत खुली राहणार असून, खाजगी आस्थापना आणि सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत कठोर टाळेबंदी लागू केली जाईल, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यात असलेले कठोर निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात सहा दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. अमरावती, यवतमाळ, वाशिम, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यात १५ मे पर्यंत, सातारा जिल्ह्यात १४ मे पर्यंत, वर्धा जिल्ह्यात १३ मे पर्यंत, तर बुलडाणा जिल्ह्यात २३ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत.

****

लातूर जिल्ह्यात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कडक टाळेबंदीत काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. आज मंगळवार आणि उद्या बुधवारी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत, नागरिकांना किराणा, सुका मेवा, मांस, भाजीपाला तसंच फळांची खरेदी विक्री करता येणार आहे. उद्या सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत या सर्व साहित्याची हातगाडीवरून घरोघर विक्री करता येईल. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

****

कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, कृती दल गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार, महिला आणि बाल विकास विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला. या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची, बालकामगार किंवा तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असल्यानं, त्यांचं सरंक्षण आणि संगोपनाच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

****

औरंगाबाद आणि अमरावती इथली भारतीय खाद्य महामंडळ - एफसीआयची दोन विभागीय कार्यालयं, तत्काळ प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद विभागीय कार्यालयाचं कार्यक्षेत्र, हे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांसाठी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकरी, पीडीएस लाभार्थी, स्वयंसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचं, दानवे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

****

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा, पुढे ढकलण्यात आली आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेतल्याची माहिती, परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली. परीक्षेच्या पुढच्या तारखा यथावकाश कळवण्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे. दरवर्षी फेब्रुवारीत होणारी ही शिष्यवृत्ती परीक्षा यंदा प्रथम एप्रिलमध्ये, आणि त्यानंतर २३ मे रोजी घेण्याचा निर्णय झाला होता, आता मात्र या परीक्षा पुढे ढकलत असल्याचं काल जाहीर करण्यात आलं.

****

दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शाळा तसंच विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा असावी का, यावर अभिप्राय मागवला जात आहे. आज रात्री बारा वाजेपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. रविवारपर्यंत राज्यातल्या जवळपास १४ हजार ३७९ शाळांनी, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची माहिती भरून दिली, तर दोन लाख १४ हजार १६६ विद्यार्थ्यांनी, अकरावी सीईटी परीक्षेबाबत अभिप्राय दिला असल्याचं, शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

राज्यात काल ३७ हजार ३२६ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५१ लाख ३८ हजार ९७३ झाली आहे. काल ५४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७६ हजार ३९८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ६१ हजार ६०७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८६ पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख ९० हजार ८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल चार हजार ८८९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०४ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २४, लातूर १८, बीड १५, उस्मानाबाद १४, नांदेड १२, जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी आठ, तर हिंगोली जिल्ह्यातल्या पाच रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार २९५ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ८३३, जालना ६९७, लातूर ६९६, औरंगाबाद ६५५, परभणी ३७४, नांदेड २९४, तर हिंगोली जिल्ह्यात काल ४५ नवे कोविड बाधित आढळले.

****

राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या, एक हजार रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या कोविड रुग्णांचा मधुमेह नियंत्रित नाही, त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लक्षणं आढळून येत असून, नागरिकांमध्ये याबाबत जागृती करण्यात येईल, तसंच या आजारावरील इंजेक्शनची किंमत निश्चित करून त्यावर नियंत्रण आणलं जाईल, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.

****

पंतप्रधान निधीतून औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आलेले १५० व्हेंटिलेटर, हे बोगस असल्याची माहिती, खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. कोविड प्रादुर्भावासंदर्भात औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची काल आढावा बैठक झाली, त्यानंतर खासदार जलील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातली काही खाजगी रुग्णालयं जास्तीची देयकं आकारत असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली असल्याचं, त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं रिक्षा चालकांसाठी घोषित केलेली मदत, अजूनही मिळाली नसून, ती देण्याची मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली.

****

लसीकरणाबाबत राज्य सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही, असं खासदार भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. केवळ मुंबई आणि ठराविक मतदारसंघांपुरतंच लसीकरण पूर्ण करण्यात येत असून, इतरत्र मात्र गोंधळ सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. रेमडेसीविर इंजेक्शनच्या काळाबाजारावरही सरकारला नियंत्रण आणता आलं नाही, असं ते म्हणाले.

औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांनीही काल वार्ताहरांशी बोलताना, महाआघाडी सरकार हे जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. सरकार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, कोविड लसीकरणाची सर्वाधिक केंद्र मुंबईत देऊन, फक्त मुंबईत लसीकरण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जालना जिल्ह्याला सर्वाधिक लसींचा कोटा दिला जात आहे, मात्र औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय का, असा प्रश्न आमदार सावे यांनी यावेळी उपस्थित केला.

****

जालना जिल्ह्यासाठी काल कोविशिल्ड या कोविड प्रतिबंधक लसीच्या २२ हजार २०० मात्रा, तर कोव्हॅक्सिन लसीच्या ५५० मात्रा प्राप्त झाल्या. जिल्ह्यातल्या ४१ लसीकरण केंद्रावर या मात्रा देण्याचं नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यातल्या दोन लाख ३३ हजार ४७५ नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कालपर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७५ नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांकरिता कोविड लसीकरण सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. परवा १३ मे रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कोविड सुश्रुषा केंद्राचं, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते काल ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते फित कापून या केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. या केंद्रात सर्व सोयींनी सुसज्ज १०० रुग्णखाटांची व्यवस्था आहे.

****

उस्मानाबाद इथं कोविड उपाययोजनांच्या संदर्भात, राज्याचे स्वच्छता-पर्यावरण आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे अध्यक्षतेखाली, काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. रुग्ण तसंच संपर्कात आलेल्यांचा माग काढावा, तपासणी वाढवावी, लहान मुलांसाठी कोविड सुश्रूषा केंद्र सुरु करावं, तसंच लसीकरण मोहीम सुनियोजित पद्धतीनं राबवण्याच्या सूचना, राज्यमंत्री बनसोडे यांनी या बैठकीत केल्या.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय वैद्यकीय केंद्रासाठी, विशेषज्ञ डॉक्टर्स तसंच अन्य कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी राज्यमंत्री बनसोडे यांच्याकडे केली. या मागणीचं निवेदन त्यांनी बनसोडे यांना सादर केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन केल्यानं जिल्ह्यात रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी म्हटलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम करुन, कोविडबाधित रुग्ण उपचारासाठी शहरात येण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी, आरोग्य यंत्रणेनं समन्वयाने काम करण्याची सूचना गव्हाणे यांनी केली.

****

पत्रकारांना ओळखपत्रावर ऑफलाईन पध्दतीनं लसीकरणात प्राधान्य देण्यात यावं, अशी मागणी परभणी महापालिकेचे गटनेते चंद्रकांत शिंदे यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. पत्रकार हे फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत असून, समाजप्रबोधनाचंही कार्य करतात, त्यामुळे त्यांना लसीकरणात प्रथम प्राधान्य देण्यात यावं, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

****

बीड जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी प्रकरणी रहमान खान लिखायत खान नावाच्या इसमाला, अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून एक इंजेक्शन आणि काही रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

****

परभणी शहरात संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणारे ११ दुकानदार आणि विनामास्क फिरणाऱ्या ४३ नागरिकांविरुध्द कारवाई करत करण्यात आली. दरम्यान मागील दोन दिवसांत ६९ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आशा कार्यकर्त्यांद्वारे घरोघरी प्रत्यक्ष सर्वेक्षणाची कालपासून सुरुवात करण्यात आली. या सर्वेक्षणाचा अहवाल उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे दररोज देण्यात येईल. या सर्वेक्षणाला जनतेनं सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी दिली आहे.

****

गेल्या वर्षभरापासून पेट्रोलच्या दरात सातत्यानं वाढ होत असून, परभणी आणि नांदेड मध्ये पेट्रोलच्या दरानं शंभरचा आकडा पार केला आहे. हिंगोलीत ९८ रुपये ८४ पैसे, जालना ९९ रुपये, लातूर ९८ रुपये ८१ पैसे, तर बीड इथं ९८ रुपये ७१ पैसे पेट्रोलचा दर आहे.

****

लातूर शहर बस सेवेत महिलांसाठी मोफत प्रवासाची योजना तपासून, पंधरा दिवसात निर्णय जाहीर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. काल दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह अन्य विकास कामांचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. लातूर महापालिकेने दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पाची त्वरीत उभारणी करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं, माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातुन मनपाच्या कामकाजात सुलभता आणावी, सरकारी-खाजगी भागीदारीतील प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून कामकाजाला गती द्यावी, अशा अनेक सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...