आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
११ मे २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
देशातल्या कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १७ कोटी २७ लाख दहा हजार ६६ मात्रांचा टप्पा गाठला आहे.
काल लसीकरणाच्या ११५ व्या दिवशी, २५ लाख तीन हजार ७५६ जणांना कोरोना प्रतिबंधक लशीची
मात्रा देण्यात आली. यापैकी पाच लाख १८ हजारांहून अधिक जण १८ ते ४४ या वयोगटातले होते.
****
केंद्र सरकारचं
लसीकरण धोरण तज्ज्ञांशी चर्चा करून बनवलं असून, त्यामध्ये फारसा फेरबदल करण्याची संधी
नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं यात हस्तक्षेप करू नये, अशा आशयाचं शपथपत्र केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या
पीठापुढे केंद्राच्या लसीकरण धोरणाची सुनावणी सुरु असताना, वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या
किमती बाबत तसंच अन्य बाबींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं
हरकत घेतली होती आणि या धोरणाचा फेरआढावा घेण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती.
****
लातूर जिल्ह्यात
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कडक टाळेबंदीत काही अंशी शिथिलता देण्यात आली आहे. आज मंगळवार
आणि उद्या बुधवारी सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत, नागरिकांना किराणा, सुका मेवा,
मांस, भाजीपाला तसंच फळांची खरेदी विक्री करता येणार आहे.
****
जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते आणि सोलापूर जिल्ह्यातले शिक्षक रणजितसिंह
डिसले यांची जागतिक विद्यार्थ्यी पुरस्कार संस्थेच्या
निवड समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. डिसले यांनी मागील वर्षी १ अब्ज अमेरिकी डॉलरचा
वैश्विक शिक्षक पुरस्कार जिंकला होता.
****
राज्य शासनानं मागासवर्गीय प्रवर्गातल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील
आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ, काल औरंगाबाद इथं आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती
समितीच्या वतीनं, सामुहिक मुंडण आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या
निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा निर्णय तत्काळ मागे न घेतल्यास, आंदोलन
अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा, कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.
****
अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी
काल चार जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत सहा
इंजेक्शन सह चार मोबाईल, दोन वाहनं आणि रोख रक्कम, असा एकूण ११ लाख ७० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment