Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
मुंबई राज्य
राखीव पोलीस बलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी, आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील
करून, १२ वर्षे करण्याचा, आणि प्रतिनियुक्तीच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय,
राज्य सरकारनं घेतला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत
झालेल्या बैठकीत, हा निर्णय घेण्यात आला. तसंच सध्या बदली झाल्यानंतर पहिली पाच वर्षे
जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्तव्य करावं लागत आहे, त्यामध्ये बदल करुन, सदरचा कालावधी
हा दोन वर्षे करण्याचा निर्णयही, या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, कोविडचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं,
सद्यस्थितीचा आढावा गृहमंत्र्यांनी आज पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. राज्यातली
कायदा-सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना, त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
****
राज्यातल्या
पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. देशातल्या काही राज्य सरकारांनी
पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर घोषित केलं असून, राज्यात अनेक स्तरातून ही मागणी होत
असल्याचं, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
जागतिक परिचारिका
दिन आज साजरा होत आहे. कोविड-19 च्या लढ्यात पहिल्या फळीत काम करणाऱ्या परिचारिकांना,
धन्यवाद देण्याचा हा दिवस असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देश
निरोगी राहण्यासाठी परिचारिका बजावत असलेलं कर्तव्य, आणि त्यांची कामाप्रती बांधिलकी
अनुकरणीय असल्याचं, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री
डॉ. हर्षवर्धन यांनीही, परिचारिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
कोरोना विषाणुचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी, राज्य सरकारनं विभागीय आयुक्तांना,
१७६ कोटी २९ लाख पाच हजार रुपये निधी वितरित केला आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन तसंच
आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. कोकण,
पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर इथल्या विभागीय आयुक्तांना, हा निधी उपलब्ध
करून देण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबादसाठी सहा हजार १५४ लाख रूपये, कोकणासाठी एक
हजार ६१४ लाख रुपये, पुण्यासाठी दोन हजार ८१० लाख रूपये, नाशिक साठी चार हजार १९९ लाख
रूपये, अमरावतीसाठी दोन हजार ९१ लाख रूपये, तर नागपूरसाठी, ७५९ लाख रुपये वितरीत करण्यात
आले आहेत.
****
शासनाच्या महा
डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना, शेतीशी निगडीत सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्याच्या
दृष्टीने, अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली
विकसित करण्यात आली आहे. तसंच या पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत, “बियाणे”
या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत
लाभार्थीना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेतील, सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका,
बाजरी इत्यादी बियाणं अनुदानावर उपलब्ध होणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी येत्या १५
मे पर्यंत अर्ज करणं बंधनकारक आहे.
****
देशभरात नुकत्याच
झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने, राज्याचे
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्यीय समिती स्थापन
जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार, काँग्रेसचे
राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. देशात नुकत्याच
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा
निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती, या पाचही राज्यांच्या
निकालाचे विवेचन करून, पुढील १५ दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर
करेल. या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी
आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात
कोविड बधितांची संख्या कमी होत असली, तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी जिल्ह्यात आज दुपारपासून
२३ मे पर्यंत कडक टाळेबंदी लागू केली आहे. या काळात नागरिकांना केवळ वैद्यकीय कारण
असेल तरच बाहेर पडता येणार आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सोमवारी हा निर्णय घेतल्यानंतर
काल आणि आजही नागरीकांनी बाजारात गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोरोना विषाणूची
तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे राज्य शासनाच्या
सूचनेनुसार नाशिक महानगरपालिकेनं तयारी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेच्या वतीनं शहरातील
बाल रोग तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली, तसंच सर्व रुग्णालयांना २५ टक्के खाटा आरक्षित
ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनेही शंभर खाटांचं
बाल रुग्णालय कोरोना बधितांसाठी उभारण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment