Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– १३ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी,
नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं.
नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने
धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित
रहा.
****
·
राज्यात कोविड लसीच्या पुरेशा मात्रांअभावी १८ ते ४४ वर्ष वयोगटाचं लसीकरण तुर्तास
स्थगित.
·
टाळेबंदीत येत्या ३१ मे पर्यंत वाढ करण्याची राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांना
शिफारस.
·
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम तथा विकास कामांच्या प्रत्यक्ष
उपस्थित राहून उद्घाटन कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाचा आदेश.
·
राज्यात ४६ हजार ७८१ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १४५ जणांचा मृत्यू
तर चार हजार ३८६ बाधित.
·
रोहित्र वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही,
वीज जोडणी देण्याचा उर्जामंत्र्यांचा निर्णय.
आणि
·
बीड जिल्ह्यातली सर्व जलाशयं, मध्यम आणि लघु तलाव, तसंच उपलब्ध जलसाठे पिण्यासाठी
आरक्षित करण्याचे पालकमंत्र्याचे आदेश.
****
राज्यात कोविड लसीच्या पुरेशा मात्रांअभावी १८ ते ४४ वर्ष वयोगटाचं कोविड लसीकरण
तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची
माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या ४५ वर्षावरील नागरिकांना कोविड
लसीची दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
१८ ते ४४ वयोगटाला तूर्त, तूर्त शब्द महत्वाचा आहे, कारण तूर्त स्थगित आपण करत
आहोत. कारण आपल्याजवळ लस उपलब्धता नाही. सेकंड डोस कंपलसरी देणं गरजेचं असल्या कारणाने,
जर नाही दिलं तर पहिल्या डोसचा उपयोग होत नाही. १८ ते ४४ महाराष्ट्र शासनाने खरेदी
केलेली जी लस आहे, मग ती लस पूर्णतः ४५ च्या पुढच्या लोकांसाठीच वापरण्याचा निर्णय
घेण्यात आलेला आहे.
राज्यातल्या टाळेबंदीत येत्या ३१ मे पर्यंत वाढ होण्याचे संकेत टोपे यांनी दिले
आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळानं टाळेबंदीला मुदतवाढ देण्याची शिफारस
मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं, टोपे यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील
असं ते म्हणाले.
लॉकडाऊन केल्यानंतर आज आपण जर बघितलं तर साधारण सात लाखाला पोहचलेला महाराष्ट्र
आता चार लाख पंच्याहत्तर हजारांच्या दरम्यान आलेला आहे. म्हणजे मोठ्या पद्धतीनं केसेसमधे
कमी झालेली आहे. आणि त्यामुळे या असलेल्या लॉकडाऊनला किमान पंधरा दिवस वाढ व्हावी अशी
एक चर्चा अशी एक अपेक्षा मंत्रीमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहे. माननीय मुख्यमंत्री
त्यासंदर्भातला अंतिम निर्णय घेतील. परंतू एक सुतोवाच आपल्याला सांगता येऊ शकेल की
एक कल साधारणपणे अशा स्वरूपाचा आहे.
राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवण्यात आले असून,
महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत, उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर
करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.
****
कोविड उपचारांसंदर्भात लहान मुलांसाठी आवश्यक उपचार सुविधांची माहिती त्वरित
पाठवण्याचे निर्देश, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी, राज्यातल्या शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बालरोगशास्त्र विभागांना दिले आहेत. कोविड
संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत, लहान मुलांमध्ये कोविड प्रादुर्भावाची शक्यता तज्ज्ञांनी
व्यक्त केली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून देशमुख यांनी, काल दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे
बैठक घेऊन हे निर्देश दिले.
दरम्यान, लातूर जिल्ह्यासंदर्भातही देशमुख यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला.
जिल्ह्यात शासकीय तसंच खाजगी रूग्णालयात प्राणवायू प्रकल्प उभारणीला गती द्यावी, प्राणवायू
तसंच व्हेंटीलेटर रुग्णखाटांची संख्या वाढवावी, लहान मुलासाठी स्वतंत्र विशेष कक्षाची
उभारणी करावी, आदी सूचना त्यांनी केल्या.
****
राज्यात कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असून, प्रत्यक्ष उपस्थित
राहून राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रम तथा विकास कामांच्या
उद्घाटन कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
दिले आहेत. रोजगार हमी योजना संदीपान भुमरे यांनी पैठण इथं गर्दी जमवून विविध विकास
कामांचं उद्घाटन केल्याच्या वृत्ताची खंडपीठानं दखल घेत हा आदेश दिला, तसंच भुमरे यांच्या
विरोधात काय कारवाई केली, अशी विचारणाही प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात विविध कलमांखाली
गुन्हे नोंदवण्यात आल्याचं सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, औरंगाबाद शहरात काही ठिकाणी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी एकही पोलिस
दिसत नसल्याच्या वृत्ताचीही खंडपीठानं दखल घेतली आहे. यासाठी पोलिस कर्मचारी कमी पडत
असतील, तर राज्य राखीव दल अथवा गृहरक्षक दलाची मदत घेता येईल, असं खंडपीठानं म्हटलं
आहे.
****
राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी सज्ज
व्हावं, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकार आणि प्रशासकीय
अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात दाखल तीन जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं
हे निर्देश दिले. रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी त्यांना ठरवून दिलेला कोटा महाराष्ट्राला
दिला की नाही, यावर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं, असंही न्यायालयानं सांगितलं
आहे.
****
राज्यात काल ४६ हजार ७८१ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या ५२ लाख २६ हजार ७१० झाली आहे. काल ८१६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७८ हजार सात
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ५८ हजार ८०५ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४६ लाख १९६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८८ पूर्णांक ०१ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
पाच लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल चार हजार ३८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
१४५ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या ३१, औरंगाबाद
२७, परभणी २२, बीड १७, नांदेड १६, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी १३,
तर हिंगोली जिल्ह्यातल्या सहा रुग्णांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग
झालेले नवे एक हजार २७० रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ७११, लातूर ६०१, उस्मानाबाद
५६९, परभणी ४५३, नांदेड ३९८, जालना २४३, तर हिंगोली जिल्ह्यात काल १४१ नवे कोविड बाधित
आढळले.
****
वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या
कृषी ग्राहकांनाही, वीज जोडणी देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
यांनी दिले आहेत. कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला,
त्यावेळी ते बोलत होते. ६०० मीटरपेक्षा दूर अंतरावर असलेल्या ग्राहकांना कृषी पंप धोरणात
वीज जोडणी देण्यासाठी, धोरणात बदल करण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
****
बीड जिल्ह्यातली सर्व जलाशयं, मध्यम आणि लघु तलाव, तसंच उपलब्ध जलसाठे पिण्यासाठी
आरक्षित करण्याचे आदेश, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वाढती उष्णता आणि त्यामुळे होणारं बाष्पीभवन
लक्षात घेता, पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. परळी तालुक्यातील चांदापूर
धरणातील पाणी, परळी नगर परिषदेस अतिरिक्त साठा म्हणून उपलब्ध करून देण्यात यावं, तसंच
चांदापूर परिसरात वन खात्यामार्फत उभारण्यात येत असलेल्या वनराई प्रकल्पाला पाणी उपलब्ध
करून देण्याबाबतचा प्रस्ताव, तातडीनं सादर करावा, असे निर्देश मुंडे यांनी संबंधितांना
दिले आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सोळाशे कोटी पीक कर्जवाटप करण्याचं
उद्दीष्ट निर्धारित असून, गावस्तरावरून पीक कर्ज वाटपाचं नियोजन करण्याची सूचना, पालकमंत्री
धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते काल जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते.
****
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद उद्या शुक्रवारी साजरा होत आहे, हा सण
साजरा करण्याबाबत राज्य शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं सर्वांनी पालन करण्याचं
आवाहन, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात
मुस्लिम धर्मगुरूंसह पोलीस तसंच प्रशासनाच्या बैठकीत चव्हाण काल बोलत होते. ते म्हणाले
–
आपण ईद नक्कीच उत्साहाने मनवायची, परंतू या ईदसाठी अल्लाहची प्रार्थना करण्यासाठी
एकत्र येणे कुठेतरी हा विषय मागे ठेवायचाय. म्हणजे त्यासाठी नमाज पठण असंल, तर्रावी
असंल, इफ्तार असंल याच्यासाठी कुठेही मशिदींमधे एकत्र जमू नये तर आपण सर्वांनी घरूनच
इबादत करायची आहे, पार्थना करायची आहे. घरामधूनच हे सगळं अतिशय साधेपणानं करायचंय.
आणि औरंगाबादमधे आपण जे कोरोना मुक्तीचा जे मिशन सुरू केलेलंय ते मिशन यशस्वी होतायत.
याला शेवटपर्यंत यशस्वी करायचं असंल तर मला मला माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आपली
साथ पाहिजेल. पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मुस्लिम बंधू भगिनींना
शुभेच्छा देतो.
****
औरंगाबाद इथं कोविड लसीची पहिली मात्रा सध्या कोणालाही दिली जाणार नसल्याचं,
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितलं आहे. सध्या पहिली
मात्रा घेऊन कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना, दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य देण्याचे
निर्देश सरकारने दिले आहेत. लसीच्या पुरेशा मात्रा उपलब्ध नसल्यानं, हा निर्णय घेण्यात
आला आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये,
असं आवाहन डॉ.पाडळकर यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज ४५ वर्षांवरील वयाच्या नागरिकांसाठी कोविडशिल्ड या लसीचा
दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस देण्यात येणार आहेत. नागरिकांनी
गर्दी न करता आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केलं आहे.
परभणी इथंही आज सकाळी ११ ते दुपारी चार यावेळेत नऊ लसीकरण केंद्रांवर, कोविशिल्ड
लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी सकाळी सात ते १० वाजेपर्यंत
केंद्रांवर जावून टोकन प्राप्त करुन घ्यावेत, असं आवाहन, महापालिका आयुक्त देविदास
पवार यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल परिचारिका दिन उत्साहात साजरा झाला. उमरगा इथं आमदार
ज्ञानराज चौगुले यांनी, तर तुळजापूर इथं आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी, परिचारिकांचा
सत्कार केला. नांदेड जिल्ह्यात भोकर इथं ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक
मुंडे यांनी, फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्षहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर स्टेशन इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण
रुग्णालयात रुपांतर करुन, याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात,
अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी काल मुंबईत मंत्रालयात टोपे यांची भेट घेतली.
यासंदर्भात सकारात्मक विचार करुन आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन टोपे यांनी दिलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या आज आणि उद्या दोन दिवस किराणा दुकानं, फळं विक्री तसंच
भाजी बाजार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांनी परवानगी दिली आहे. मात्र, जिल्ह्यातल्या इतर आस्थापना बंद राहतील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी
काल काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथं, अनधिकृतपणे कोविड
चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळेचा मालक संजय पवार याच्याविरोधात, गुन्हा नोंदवण्यात आला
आहे. शासनाची कोणतीही मान्यता न घेता अनधिकृतपणे या प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जात
असल्याचं उघडकीस आल्यानंतर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत कारवाई करण्यात
आल्याची माहिती, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, आणि मृत्युदर
रोखण्यासाठी, जिल्हा प्रशासनानं ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या तिसऱ्या
टप्प्या अंतर्गत, नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरु आहे. ही मोहीम आता अंतिम टप्प्यात
पोहचली असून, जिल्ह्यातल्या १६ लाख ५० हजार नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात
आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि पुढील धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारनं
विधिमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन बोलवावं, अशी मागणी, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरीभाऊ
बागडे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात
मराठा आरक्षण वाचवण्यात अपयश आल्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आता वैधानिक
प्रक्रिया पूर्ण न करताच हा विषय केंद्र सरकारकडे सोपवण्याच्या प्रयत्नात आहे, असा
आरोप बागडे यांनी केला.
****
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवरून राबवण्यात येणाऱ्या
अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना,
तसंच कृषी क्रांती योजनेंतर्गत नवीन सिंचन विहिरी कामं सुरू करण्यात, उस्मानाबाद जिल्हा
परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. या योजना अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातल्या
शेतकऱ्यांच्या हिताच्या असल्यानं, निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी
पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करावीत, असं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू कृषि उत्पन्न बाजार समितीवर सहकार खात्यानं नवीन अशासकीय
प्रशासक मंडळ नियुक्त केलं आहे. सहकार आणि पणन विभागानं जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था
यांना पाठवलेल्या एका पत्राद्वारे, नवीन अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीस मान्यता बहाल
केली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या रक्तसंकलन केंद्रामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं,
नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत
आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जालन्यातल्या सदर बाजार पोलिसांकडून रक्तदान शिबीर घेण्यात
आलं, या शिबिरात १०९ जणांनी रक्तदान केलं.
****
No comments:
Post a Comment