आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१३ मे २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात कोविड लसीच्या पुरेशा मात्रांअभावी १८ ते ४४ वर्ष वयोगटाचं
कोविड लसीकरण तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या ४५
वर्षावरील नागरिकांना कोविड लसीची दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं,
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं कोविड लसीची पहिली मात्रा सध्या कोणालाही दिली जाणार नसल्याचं, महापालिकेच्या
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितलं आहे. नांदेड आणि
परभणी जिल्ह्यात आज ४५ वर्षांवरील वयाच्या नागरिकांसाठी कोविडशिल्ड या लसीचा दुसरा
डोस दिला जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, कोविड रुग्णांसाठी कोविड सुश्रुषा केंद्र
सुरु करण्यात आलं आहे. कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत, ऑनलाईन पद्धतीनं काल या केंद्राचं लोकार्पण झालं.
****
नांदेड शहरात पोलिस प्रशासनकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीतून व्यापाऱ्यांची
त्वरीत सुटका करावी, अशी आग्रही मागणी, नांदेड मर्चंट अॅड इंडस्ट्रीज असोसिएशन च्या
वतीनं जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र शिर्डी इथल्या साईबाबा रुग्णालय
आणि साईनाथ रुग्णालय इथल्या कंत्राटी परिचारिक आणि परिचारिकांनी काल जागतिक परिचारिका दिनी आंदोलन केलं. नोकरीत कायम करावं, पगारवाढ
द्यावी अशा मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.
****
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून राबवण्यात येणाऱ्या
‘मदतीचा एक घास’ या उपक्रमाचा काल आमदार प्रणिती शिंदे यांनी शुभारंभ केला. या उपक्रमाद्वारे पक्षातल्या पदाधिकारी महिला स्वत:च्या घरी स्वयंपाक करून,
गरजूंना भोजन पुरवणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात वाळू माफियांनी, पाथरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर
हल्ला केला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. उपविभागीय अधिकारी निकाळजे यांच्या वाहनावर
दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल
केला असून, अधिक तपास सुरू आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव परिसरातून पोलिसांनी विविध ठिकाणी छापा टाकून तीन लाख
रुपयांची शस्त्रं जप्त केली असून, दोन जणांना अटक केली आहे.
****
No comments:
Post a Comment