Saturday, 15 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.05.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      क्षमता आणि समर्पण भावनेच्या जोरावर देश कोरोनाच्या संकटावर नक्कीच मात करेल -पंतप्रधानांचा विश्वास.

·      राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना येत्या १५ दिवसांत कोविड लसीच्या एक कोटी ९० लाख मात्रा विनामूल्य मिळणार; रशियाच्या 'स्फुटनिक व्ही' लसीची एक मात्रा नऊशे पंच्याण्णव रुपयांना.

·      साखर उद्योगानं प्राणवायू निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा - मुख्यमंत्र्यांचं आवाहन.

·      राज्यात काल ३९ हजार ९२३ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल १२८ जणांचा या संसर्गानं मृत्यू तर चार हजार ५२४ नव्या रुग्णांची नोंद.

·      नृत्यशिरोमणी मीरा पाऊसकर यांचं काल औरंगाबाद इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन.

आणि

·      हिंगोली जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं एक दिवसआड उघडण्यास परवानगी.

****

क्षमता आणि समर्पण भावनेच्या जोरावर देश कोरोनाच्या संकटावर नक्कीच मात करेल, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. देशभरातल्या साडे नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते.

ग्रामीण भागात कोविड बाधितांचं प्रमाण वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावागावांमधल्या पंचायतींनी स्वच्छता आणि जनजागृतीवर भर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

औषध निर्मितीसोबतच औषधांचा काळाबाजार रोखणं, प्राणवायू निर्मिती प्रकल्प आणि रुग्णालयांच्या उभारणीसाठी सरकार प्रयत्नशील अल्याचं, पंतप्रधान म्हणाले.

प्रत्येकानं कोरोना प्रतिबंधक नियंमांचं पालन करावं, तसंच पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. प्रत्येक पात्र नागरिकाला त्वरीत लस मिळावी यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारांसोबत समन्वयानं काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

यावेळी पंतप्रधानांनी केंद्र सरकारनं कृषी मालाची विक्रमी खरेदी केल्याविषयी, तसंच शेतकऱ्यांचे लाभ त्यांच्या खात्यात थेट वळते केल्याविषयीची माहिती दिली. सेंद्रीय शेतीसंदर्भातल्या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात शेतकऱ्यांनी दाखवलेल्या स्वारस्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.

लातूरचे शेतकरी बाबा नरारे यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. किसान क्रेडिट कार्डच्या लाभाविषयी पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नरारे म्हणाले –

छोटे किसानोंको बँक से सस्ती दर पर आसान ऋण मिला। इसके लिए किसान क्रेडीट कार्ड का दायरा बहोत बढाया गया। आप के खेती पर इससे कोई फरक पडा है क्या? मैनें १ लाख ५८ हजार रुपये ऋण लिया था। उन पैसोंसे जमीन लेवल कर दिया था। और कोई बीज, कोई मजदूरी और उसके साथ साथ हमनें बकरीयाँ भी पाली थी। जमीन लेवल से और गोबर खत भी लिया था हमने उससे, तो पिछले साल २० ट्रॅक्टर सोयाबीन हो गया था। इस साल ४० ट्रॅक्टर सोयाबीन हो गया सर। इसलिए बहोत बडा फायदा हो गया है। और उसके साथ साथ हम वहा प्याज भी लगाते है। थोडा मिर्ची भी लगाते है। ये सबकूछ तो केसीसी के वजह से हो गया सर।

****

केंद्र सरकार येत्या १५ दिवसांत कोविड लसीच्या एक कोटी ९० लाख मात्रा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य पाठवणार आहे. यामध्ये एक कोटी ६२ लाख ५० हजार कोव्हिशील्ड, आणि २९ लाख ४९ हजार कोव्हॅक्सीन लसींचा समावेश आहे. या सर्व लसी ४५ पेक्षा जास्त वय असलेले नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. यापूर्वीही केंद्र सरकारनं एक कोटी ७० लाख कोविड लसी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या होत्या.

****

रशियन बनावटीची कोरोना विषाणू संसर्गावरील स्पुटनिक व्ही या लसीच्या एका मात्रेची किंमत नऊशे पंच्याण्णव रुपये चाळीस पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे. भारतात मंजुरी मिळालेली स्पुटनिक व्ही ही तिसरी लस आहे. हैदराबाद इथली डॉ. रेड्डीज ही औषधी उत्पादक कंपनी, या लसीचं भारतात उत्पादन करणार असून, काल हैदराबादमध्ये लसीची पहिली मात्रा देण्यात आली. पुढच्या आठवड्यापासून ही लस देशभरात उपलब्ध होणार आहे.

****

साखर उद्योगानं प्राणवायू निर्मितीच्या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात चोराखळी इथल्या धाराशिव साखर कारखान्यातल्या, प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्धाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पन्नासहून अधिक रुग्णखाटा असणाऱ्या रुग्णालयांमध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा, प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा वैद्यकीय प्राणवायू त्या त्या जिल्ह्यातच निर्माण होईल, यावर भर द्यावा, आदी सूचना गडकरी यांनी यावेळी केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, धाराशिव कारखान्यानं उभारलेला प्रकल्प या संकटात अतिशय महत्त्वाचा असल्याचं सांगून, इतर कारखान्यांनी अशा प्रकारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन केलं.

****

राज्यात काल ३९ हजार ९२३ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५ लाख नऊ हजार २१५ झाली आहे. काल ६९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, हजार ५५२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. काल ५३ हजार २४९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४ लाख सात हजार ९८० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८ पूर्णांक ६८ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख १९ हजार २५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल चार हजार ५२४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १२८ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३३, लातूर ३०, परभणी १६, उस्मानाबाद १५, नांदेड १३, बीड ११, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी पाच रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ११२ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ९८५, औरंगाबाद ६६५, लातूर ५६०, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी ४५८, नांदेड २०८, तर हिंगोली जिल्ह्यात ७८ नवे रुग्ण आढळून आले.

****

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधल्या आरक्षणाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात, रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं, काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यात मराठा आणि संपूर्ण देशात क्षत्रिय समाजातल्या राजपूत, ठाकूर आदी जातींना आर्थिक निकषांवर स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी हस्तक्षेप करावा, राज्य सरकारनं मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द करून अन्याय केला असून, राज्यातल्या अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

२०१६ ते २०१७ या कालावधीत फडणवीस सरकारच्या काळात, फोन टॅपिंगशी संबंधित सर्वांची महाविकास आघाडी सरकारनं उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, नाना पटोले यांनी केली आहे. आपला फोन टॅप झाल्याची माहिती खाजगी वृत्त वाहिन्यांकडूनच समजल्याचं सांगत, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली, राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

****

नृत्यशिरोमणी मीरा पाऊसकर यांचं काल औरंगाबाद इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, त्या ७९ वर्षांच्या होत्या. १९७७ मध्ये पाऊसकर यांनी निर्मलादेवी नृत्यझंकार नृत्यसंगीत अकादमी सुरु करून, त्या माध्यमातून मराठवाड्यात भरतनाट्यम् नृत्यशैलीचा प्रसार केला. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले शेकडो शिष्य आज देश विदेशात नृत्य कलेचा प्रचार करत आहेत. भरतनाट्यमसह त्यांनी कुचिपुडी नृत्यशैलीचंही शिक्षण दिलं. इंडियन डान्स अकादमीनं पाऊसकर यांना नृत्यशिरोमणी पुरस्कारानं गौरवलं होतं.

****

हिंगोली जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं एक जून पर्यंत एक दिवसआड सकाळी नऊ ते ११ वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल हे आदेश जारी केले. किराणा दुकानं, भाजीपाला, फळं, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते,  पावसाळी हंगाम पूर्व साहित्याची दुकानं उद्यापासून एक दिवसआड सुरु राहतील. दुध विक्री मात्र दररोज सकाळी सात ते ११ आणि संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सुरु राहील, असं या आदेशात म्हटलं आहे. ई-कॉमर्स, कुरीअर या सेवाही या दैनंदिन चालू राहतील. एक जून पर्यंत हे आदेश लागू असतील.

****

परभणी जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार वैद्यकीय सेवेसह औषधी दुकानं वगळता, इतर सर्व आस्थापना आज आणि उद्या दोन दिवस पूर्णतः बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल याबाबतचे निर्देश जारी केले.

****

नांदेड जिल्ह्यात आज फक्त ४५ वर्षांवरील वयाच्या व्यक्तींना कोव्हिशील्ड या लसीचा दुसरा डोस देण्यात येईल. जिल्ह्यातल्या ९१ आरोग्य केंद्रांवर लसीच्या प्रत्येकी १०० मात्रा उपलब्ध असणार आहेत.

****

परभणी महानगरपालिकेच्या नऊ केंद्रांवर आज ४५ वर्षांवरील नागरिकांना कोव्हिशील्ड लसीची पहिली आणि दुसरी मात्रा, सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत देण्यात येईल. ज्या केंद्रावर लसीकरण केलं जाणार आहे, त्या केंद्रांवर नागरिकांनी सकाळी सात ते १० या वेळेत टोकन प्राप्त करावेत, असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहरात आधी रक्तदान, मगच लसीकरणासाठी माझे स्थान, ही मोहीम काल राबवण्यात आली. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काल हुतात्मा स्मारक परिसरात ऐच्छिक रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

****

मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्ग - ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या शिष्टमंडळानं हे निवेदन सादर केलं. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संभाजी ब्रिगेड आता समाजाची फसवणूक होऊ देणार नाही, त्यासाठी लढा उभारणार असल्याचं, या निवेदनात म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून, सेलू आणि मानवत इथल्या ग्रामीण रुग्णालयांना दोन रुग्णवाहिका दिल्या. पूर्णा, गंगाखेड, जिंतूर आणि पालम या तालुक्यांतल्या रुग्णांकरता, रुग्णवाहिकांची गरज असून, त्यासाठीही प्रयत्न करण्याचं आश्वासन जाधव यांनी दिलं.

****

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करत सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्वीची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. तलावांची दुरूस्ती आणि पूर परिस्थितीचं नियोजन, तसंच संभाव्य धोक्याच्या ठिकाणी नागरिकांना माहिती आणि सावध करण्याच्या दृष्टीनं परिपूर्ण सूचनांचे फलक लावावेत, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मे आणि जून महिन्यात विशेष ऑनलाइन व्याख्यानांचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आज सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांचं कोविड-१९-एक युध्दया विषयावर व्याख्यान होणार आहे. याचा विद्यापीठातल्या सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, उद्या १६ मे पर्यंत चक्रीवादळात परावर्तीत होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ग्नेय अरबी समुद्र आणि त्याच्या आसपासच्या लक्षद्वीपच्या परिसरात हा पट्टा निर्माण झाला आहे. या वादळाची तीव्रता वाढून ते १८ मे च्या संध्याकाळी वायव्य गुजरात किनारपट्टीला धडकेल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या वादळामुळे दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागात रविवारी आणि सोमवारी मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला १६ ते १८ मे दरम्यान या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी वर्तवली आहे.

****

राज्यात काल अक्षय्य तृतीयेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद असल्यामुळे सोनं, वाहनं, तसंच इतर खरेदी झाली नाही. यामुळे व्यापाऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं. मात्र ऑनलाईन खरेदी विक्रीचे व्यवहार काही प्रमाणात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

ईद उल फित्र - रमजान ईदही काल गर्दी न करता सर्वत्र साधेपणानं साजरी करण्यात आली. ईदगाह किंवा मशिदीतही मोठ्या संख्येनं एकत्र न येण्याचं आवाहन प्रशासनानं केलं होतं. त्यानुसार बहुतांश नागरिकांनी घरीच नमाज पठण करत ईद साजरी केली. काही ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीनं फक्त पाच जणांनी मशिदीत नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

****

महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती काल सर्वत्र कोविड नियमांचं पालन करत साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

औरंगाबाद शहरात आकाशवाणी चौकात बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रक्तदान शिबिराचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं.

****

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं.

औरंगाबाद इथं संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला. परभणी तसंच नांदेड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी महात्मा बसवेश्वर तसंच संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...