Monday, 10 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१० जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आघाडीवरचे कोविड योद्धे, तसंच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आजपासून कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. यासाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची गरज नसल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. लसीची दुसरी मात्रा घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्यांना बुस्टर डोस घेता येईल; आधीच्या दोन मात्रा ज्या लसीच्या असतील त्याच लसीचा डोस दिला जाणार आहे.

****

कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यात निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी रात्री जारी केलेल्या निर्बधांच्या आदेशात राज्य सरकारनं काल सुधारणा केली; त्यानुसार आता सौंदर्य प्रसाधनगृह आणि व्यायाम शाळा ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी मास्कचा वापर तसंच पूर्णपणे लसीकरण झालेलं असणं बंधनकारक असेल.

****

राज्यात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या २०७ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाच तर औरंगाबाद, जालना आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

मराठवाड्यात काल ६२९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या उमरी इथं काल लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन पार पडलं. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हास लुलेकर हे होते. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

****

चेन्नई इथला चौदा वर्षीय भरत सुब्रमण्यम हा भारताचा ७३ वा ग्रँडमास्टर ठरला आहे. त्यामुळे आता इटलीमधल्या खुल्या व्हर्गानी चषक स्पर्धेसाठी आवश्यक असलेली दोन हजार ५०० ची मानांकन श्रेणी भरतनं पार केली असल्याचं, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघानं म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, जवळा पांचाळ, दांडेगावसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने हरभरा, गहू पिकांचं नुकसान झालं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...