Monday, 10 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

·      कोविड प्रतिबंधक लसीकरणात १५१ कोटी ९४ लाखाचा टप्पा पार; बूस्टर डोस देण्यास प्रारंभ.

·      राज्यात कोविडची तिसरी लाट; जानेवारीच्या अखेरीस सर्वोच्च रुग्णसंख्येची शक्यता आरोग्यमंत्र्यांकडून व्यक्त.

·      तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ.

·      प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रूजू व्हावं, - खासदार शरद पवार यांचं आवाहन.

आणि

·      क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या तिघांना औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक.

****

देशाच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज १५१ कोटी ९४ लाखाचा टप्पा पार केला.

एक कोटी ६२ लाख २६ हजार ७९२ लसीकरण सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. देशात सध्या उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या ७ लाख २३ हजार ६१९ इतकी आहे. कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तीन कोटी ४५ लाख १७२ झाली असून, देशाचा रोगमुक्ती दर ९६ पूर्णांक ६२ शतांश टक्के झाला आहे.

****

देशातले आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या कोविड योद्ध्यांना तसंच सहव्याधी असणाऱ्या ६० वर्षांच्या पुढील नागरिकांना आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस दिला जात आहे. मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात आज सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत या प्रतिबंधात्मक मात्रा लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. कोविड प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा घेतल्यापासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाल्यानंतर, बूस्टर डोस दिला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातल्या जंबो कोविड केंद्रात प्रतिबंधात्मक मात्रा घेतली.

****

राज्यात कोविडची तिसरी लाट आलेली असून, दररोज ४० हजारावर नवे रुग्ण आढळत आहेत. जानेवारीच्या अखेरीस या लाटेत सर्वोच्च रुग्णसंख्या समोर येईल, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. ते आज जालन्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. रुग्ण संख्या वाढत असली तरीही, आरोग्य यंत्रणेवर कोणताही ताण आलेला नाही, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यात कोविड प्रतिबंधासाठी नव्यानं लावलेल्या निर्बंधांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं, आणि या निर्बंधांचं पालन करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

****

सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचं तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा अजित पवार यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक योजनांची अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळण्याचे निर्देशही पवार यांनी दिले. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना पवार यांनी यावेळी दिल्या.

****

हिंदी भाषेच्या वापराला परदेशातही प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं दरवर्षी १० जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. २००६ मध्ये या दिवशी नागपूर इथं प्रथमच जागतिक हिंदी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशातील भारतीय दूतावासांमध्येही हा दिवस साजरा होतो. परराष्ट्र मंत्री डॉ एस. जयशंकर यांनी जागतिक हिंदी दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. परदेशात हिंदीचा वापर आणि प्रचारात योगदान देणाऱ्यांचं, त्यांनी एका ट्विटमध्ये कौतुक केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागतिक हिंदी दिवस उत्साहात साजरा होईल, अशी अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली.

****

तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. सात दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर आज पहाटे तुळजाभवानी देवी सिंहासनारूढ झाली. शाकंभरी देवीच्या प्रतिमांचं पूजन करून आज दुपारी घटस्थापना करण्यात आली. यंदा १० ते १८ जानेवारी दरम्यान कोविड प्रतिबंधक निर्बंधांमुळे शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे.

****

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रूजू व्हावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे. पवार यांनी आज परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्यासोबत एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंत ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे सुमारे ५० हजार कर्मचारी कामावर रूजू झाल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीतही एसटी वाहतुक सुरळीत झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी दिलं.

****

क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या तीन जणांना औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज जेरबंद केलं. रियाज सय्यद, तबरेज खान, आणि शेख मुजहित अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांकडून साडे ४७ हजार रुपये रोख आणि २८ हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे तिघे काही स्थानिकांकडून पैसे घेऊन सट्टा बुकिंग करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज ३७ नवीन रुग्ण आढळून आले. तर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या सात रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले ६० हजार ९४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सध्या कोरोना सक्रिय १६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे १६ रुग्ण, तर बुलडाणा जिल्ह्यात ४६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...