Tuesday, 11 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

·      कुठलीही लक्षणं नसलेल्या व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणी करणं आवश्यक नसल्याचं, ICMR कडून स्पष्ट.

·      मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत कर्तव्याची जाण ठेवून कार्य करावं - राज्यपालांचं आवाहन.

·      ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन.

आणि

·      भारत तसंच दक्षिण आफ्रिका संघात तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला प्रारंभ.

****

कुठलीही लक्षणं नसलेल्या व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणी करणं आवश्यक नसल्याचं, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - ICMR ने स्पष्ट केलं आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या, संसर्गाचा धोका सर्वाधिक असलेल्या किंवा इतर व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांचीच कोरोना चाचणी करावी असा सल्ला ICMR ने दिला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींना कोरोना चाचणीची गरज नसल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. आंतरराज्य प्रवास करणारे प्रवासी, रुग्णालयातून घरी सोडले जात असलेले कोरोना रुग्ण यांचीही कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. परदेशातून आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणीच्या नावाखाली डॉक्टरांनी कुठलीही अत्यावश्यक शस्त्रक्रिया पुढे ढकलू नये. तसंच लक्षणं नसलेल्या कुठल्याही व्यक्ती, गर्भवतींची कोरोना चाचणी करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे.

****

कोविड संदर्भात देशातल्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज देशभरातल्या १२० तज्ज्ञ डॉक्टरांसोबत दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. डॉक्टरांनी दिलेली माहिती घेतल्यानंतर मांडविया यांनी त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. आपण सर्व मिळून कोविड विरुद्ध लढा देऊ असं मांडविया यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यांना काल रात्रीपासून मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचं मंगेशकर कुटुंबियांनी कळवलं आहे. त्यांना कोविडची लक्षणं सौम्य दिसत असून ऑक्सिजनची गरज भासली नसल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

****

मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवं, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज सोलापूर इथल्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सतराव्या दीक्षांत समारंभात बोलत होते. कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल या सोहळ्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. विद्यापीठात सुवर्णपदकं मिळवण्यात विद्यार्थिनी आघाडीवर आहेत, ही विशेष अभिनंदनाची बाब असल्याचं सांगून राज्यपालांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची प्रशंसा केली.

****

माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. शास्त्रीजींनी दिलेला “जय जवान, जय किसान” हा देशाची सुरक्षा आणि समृद्धीचा मंत्र असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ८९ वर्षाच्या होत्या. १९५२ साली प्रदर्शित झालेल्या लाखाची गोष्ट या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या रेखा कामत यांनी २००४ साली प्रदर्शित झालेल्या अगंबाई अरेच्चा या चित्रपटापर्यंत अनेक चित्रपटांतून नायिकेच्या तसंच चरित्र भूमिका साकारल्या. सौभद्र, संशयकल्लोळ, भावबंधन, एकच प्याला, तुझे आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, दिवा जळू दे सारी रात, आदि नाटकांमधून विविध भूमिका केलेल्या कामत यांनी, अनेक जाहिरातींमधून साकारलेली आजी, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. प्रपंच तसंच सांजसावल्या आदी दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

****

औरंगाबाद शहरात जवळपास दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला असल्याचं महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं आहे. पांडेय यांच्यासह महापालिकेच्या ६० अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज बुस्टर डोस घेतला. त्यानंतर महापालिका प्रशासक पांडेय बातमीदारांशी बोलत होते. पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचं आवाहन पांडेय यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज नवे ६४ तर नांदेड जिल्ह्यात नवीन १७० कोविड बाधित रुग्ण आढळून आले. जालना जिल्ह्यात सध्या कोविडच्या २११ तर नांदेड जिल्ह्यात ६६९ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून केपटाऊन इथं सुरू झाला आहे. भारतानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार बाद १२४ धावा झाल्या होत्या.

या मालिकेत दोन्ही संघ एक-एक सामना जिंकून बरोबरीत आहेत. त्यामुळे मालिका विजयासाठी हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

****

राज्यातील पर्यटन स्थळे ५० टक्के निर्बंधासह सुरू करावीत अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीचं निवेदन आमदार दानवे यांनी आज ठाकरे यांच्याकडे सादर केलं.

खेळाची मैदाने, जॉगिंग पार्क आणि उद्याने खुली करण्याची मागणी औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागीय क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे यांच्या मार्फत या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या खेलो इंडिया जिल्हा केंद्राचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. विभागीय क्रीडा संकुलातल्या नियोजित शूटिंग रेंजचं भूमिपूजनही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे सर्व सोयी सुविधांसहित शूटींग रेंजचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे. एसआर निधीमधून दहा मीटर शूटींग रेंजमध्ये आवश्यक दुरूस्ती करून ती सरावासाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

****

हवामान -

मराठवाड्यात आज आणि उद्या नांदेडसह इतर जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान संशोधन प्रकल्पानं वर्तवलेल्या साप्ताहिक अंदाजात मराठवाड्यात या काळात तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...