Thursday, 13 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा..

****

** देशातल्या कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा

** औरंगाबाद, नांदेडमध्ये कोविड नियमांचं उल्लंघन केल्यानं अस्थापनांविरुद्ध कारवाई

** सर्वसामान्यांचे `आधारवड` म्हणून काम करा - उपमुख्यमंत्री पवार यांचं पोलिस अधिकाऱ्यांना आवाहन

आणि

** भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातली रंगत वाढली

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू संसर्ग परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी आज देशातल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक घेतली. विविध राज्यांमध्ये संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर याला रोखण्यासाठी योजन्यात येत असलेल्या उपायांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती घेतली. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे या  बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याचं प्रतिनिधत्व केलं. दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीच्या १५५ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या तीन कोटी पेक्षा जास्त युवकांना या लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

                                 ****

कोविड नियमांचा भंग केल्या प्रकरणी औरंगाबाद शहरातल्या जालना महामार्गावर असलेल्या `राज क्लॉथ` या कापड दुकानावर प्रशासनानं कारवाई केली आहे. सहायक कामगार उपायुक्त वाय. एस. पडीयाल आणि महापालिकेच्या पथकानं हे दुकान पुढील आदेश येई पर्यंत बंद  केलं आहे. औरंगाबादेत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं नियमांचा भंग करणारे उपहारगृह, मॉल्स आणि विविध अस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

                                     ****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पैठण इथलं नाथमंदिर उद्या आणि परवा बंद ठेवण्याचा निर्णय संस्थाननं घेतला आहे. मकरसंक्रातीला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला असल्याचं संस्थानतर्फे कळवण्यात आलं आहे.

                                       ****

नांदेड शहरात आजपासून कोविड प्रतिबंधात्मक नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. या नियमावलीचा भंग करून खाजगी शिकवणी वर्ग सुरू ठेवल्याबद्दल शहरातल्या चार खाजगी शिकवणी वर्गांना ९५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. महापालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली.

                                     ****

पोलिस दलात काम करताना सर्वसामान्यांचा आधारवड होण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना केलं आहे. या अधिकाऱ्यांनी मुंबईत त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी पवार बोलत होते. राज्य पोलिस दलाला त्याग, बलिदान आणि शौर्याची परंपरा असून हे दल जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त झालेलं पोलीस दल आहे. अशा या दलात सेवा करण्याच्या मिळालेल्या मोठ्या संधीचं सोनं करा, असं पवार म्हणाले. 

                                       ****

आज भोगी आणि उद्याचा मकर सक्रांतीचा सण देशभरात विविध भागात वेगवेगळ्या नावानं आणि पद्धतीनं साजरा होतो. लोहरी, मकर सक्रांती, भोगली, बिहू, उत्तरायण, पौष पर्व अशा विविध भागातल्या सणांच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

                                      ****

मकर संक्रांतीचा सण साजरा करताना नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. या सणानिमित्त अनेक नागरिक मोठ्या उत्साहानं पतंग उडवत असतात मात्र, आपला सण साजरा करताना इतर कोणालाही इजा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

                                     ****                                     

दिल्ली इथं सुरू असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या प्रमुख खेळाडूंना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. संसर्ग झालेल्यांमध्ये किदाम्बी श्रीकांत आणि अश्विनी पोनप्पा यांच्यासह सात खेऴाडुंचा समावेश आहे. या सातही खेळाडुंनी स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती जागतिक बॅडमिंटन महासंघानं दिली आहे.  दरम्यान, नागपूरची खेळाडू मालविका बनसोडं हिनं अनुभवी सायना नेहवालला या स्पर्धेत आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सहज पराभूत केलं. 

****

भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा सात बाद १८० धावा केल्या आहेत. भारताकडे पहिल्या डावातली तेरा धावांची आघाडी आहे. ऋषभ पंतच्या नाबाद ८७ तसंच विराट कोहलीनं केलेल्या संयमी २९ धावांमुळं भारतीय संघ समाधानकारक धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल करत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत एक - एक अशी बरोबरी असल्यानं ही लढत निर्णायक ठरणार आहे. 

****

मुंबई सी.एस.टी. ते नांदेड `तपोवन` जलद रेल्वे गाडी शनिवार म्हणजेचं १५ तारखेपर्यंत मनमाड ते दौलताबाद दरम्यान तीस मिनिटं उशिरा धावणार आहे. औरंगाबाद ते दौलताबाद दरम्यान असलेल्या रेल्वे उड्डाण पुला शेजारी नवा उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. त्यामुळं गाडीला हा उशीर होणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.

                                      ****

मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. औरंगाबादमध्ये शहरवासी आज दिवसभर गरम कपड्यांमध्ये वावरताना दिसले. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

                                       ****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘२८ वा नामविस्तार दिन‘उद्या विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

// ******//

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 28 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...