Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 14 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक
भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी
कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच
चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या ३१ जानेवारीपासून सुरवात.
·
कर्मचारी
भविष्य निर्वाह निधी खात्यातून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्यास मुभा.
·
कोरोना
लसीकरण बंधनकारक करण्याची राज्य सरकारची केंद्र सरकारकडे मागणी.
·
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘नामविस्तार दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा.
आणि
·
उस्मानाबाद
इथं ड्रोनच्या सहाय्यानं पिकावरील फवारणी तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी.
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन सत्रात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं
सत्र ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान तर दुसरं सत्र १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत
चालेल. १ फेब्रुवारीला २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
****
केंद्र तसंच राज्य सरकारी
कर्मचाऱ्यांना आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातून एकूण जमा निधीपैकी एक लाख
रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. मेडिकल क्लेम अंतर्गत कर्मचाऱ्यांना हे पैसे काढता
येणार असून यासाठीच्या नियमात लवकरच बदल करण्यात येणार आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं
यासंदर्भात एक पत्रक जारी केलं. ईपीएफओ सदस्य कोणतीही कागदपत्रं सादर न करता त्यांच्या
पीएफ खात्यातून एक लाख रुपये काढू शकणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.
****
कोरोना प्रतिबंधक लसीकरण
कायदेशीर दृष्टीने बंधनकारक करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. लसीकरण ऐच्छिक असल्याने अनेकजण लस घ्यायला
टाळाटाळ करत असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
राज्यात १५ ते १८ वयोगटातील
किशोरवयीन गट, ६० वर्षांपुढील ज्येष्ठांचा गट, आणि आरोग्य कर्मचारी तसंच आघाडीच्या
कोविड योद्ध्यांचा तिसरा गट, असं तीन गटांना लसीकरण सुरू आहे. राज्यात कोविड लसींच्या
मात्रांचा तुटवडा जाणवत असून, ९८ लाख लोक लसीच्या पहिल्या मात्रेपासून वंचित आहेत.
लसीकरणाला गती मिळावी याकरता
कोविशिल्ड लसीच्या ५० लाख आणि कोवॅक्सिन लसीच्या ४० लाख मात्रांची मागणी केंद्र सरकारकडे
केली आहे, असं टोपे यांनी सांगितलं. राज्यात लहान मुलांचं ४० टक्के लसीकरण झालं असून
अशीच गती राहिल्यास १५ दिवसांत लसीकरण पूर्ण होईल असंही टोपे म्हणाले.
****
राज्य सरकारच्या मराठी भाषा
संवर्धन पंधरवड्याला आजपासून प्रारंभ झाला. २८ जानेवारीपर्यत चालणाऱ्या या पंधरवड्यांतर्गत
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी संवाद, तरुण कवींचं संमेलन, ‘मराठी
खऱ्या अर्थानं ज्ञानभाषा होईल का?’ या विषयावर आभासी परिसंवाद, तसंच ‘मी काय वाचतो?’
या विषयावर आभासी व्याख्यानाचं आयोजन केलं जाणार आहे. २८ जानेवारीला साहित्य अभिवाचनानं
या पंधरवड्याचा समारोप होईल.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचा २८ वा ‘नामविस्तार दिन’ आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या’ नामविस्ताराच्या निर्णयाने राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता,
बंधुत्वाचा विचार अधिक भक्कम झाला, असं पवार यांनी म्हटलं आहे.
नामांतर आंदोलनात मराठवाड्यात
अनेकांच्या घरा-दाराची राख झाली. मात्र, फिनिक्स पक्षाप्रमाणे नवीन समतावादी पक्षांची
पिढी उभी राहिल्याचं, मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीचे प्राध्यापक मंगेश बनसोड
यांनी म्हटलं आहे. नामविस्तार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानात ‘नामविस्तार
आणि सामाजिक न्यायाची अपेक्षा’ या विषयावर ते बोलत होते. विद्यापीठाचा नामविस्तार ही
सामाजिक आणि राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना असून, समतेचं आंदोलन आता खूप
पुढे गेलं असल्याचं डॉ.बनसोड यांनी नमूद केलं.
विद्यापीठ नामविस्तारासाठी
प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा सैनिकांच्या स्मारकाचं भूमिपूजन कुलगुरु डॉ.प्रमोद
येवले यांच्या हस्ते आज करण्यात आलं. विद्यापीठ प्रवेशद्वाराचं नूतनीकरणही करण्यात
येणार असल्याचं कुलगुरुंनी यावेळी सांगितलं. नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ प्रवेशद्वारावर
आंबेडकर अनुयायी अभिवादन करत आहेत.
****
केपटाऊन कसोटी क्रिकेट सामना
दक्षिण आफ्रिकेनं सात गडी राखून जिंकला. विजयासाठी भारतीय संघाने दिलेलं २११ धावांचं
आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने आज सामन्याच्या चौथ्या दिवशी तीन गड्यांच्या मोबदल्यात
पूर्ण केलं. या विजयासोबत दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघासोबत झालेली तीन कसोटी
सामन्यांची ही मालिकाही जिंकली आहे. दरम्यान दोन्ही संघात तीन एकदिवसीय सामन्यांची
मालिका होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना येत्या बुधवारी १९ जानेवारीला होणार आहे.
****
उस्मानाबाद इथं ड्रोनच्या
सहाय्यानं पिकावरील फवारणी तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तेरणा अभियांत्रिकी
महाविद्यालयाच्या वतीनं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या
या ड्रोन प्रात्यक्षिकाचा उस्मानाबाद जवळील पळसवाडी शिवारात केलेला प्रयोग यशस्वी झाला.
फक्त १२ लिटर पाणी आणि २०० मिलीलिटर औषधामध्ये १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत अर्धा एकर
पेक्षा जास्त क्षेत्रावर फवारणी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, पाणी याची
बचत होणार आहे, कीड अथवा रोगांचा प्रार्दुभाव निदर्शनास येताच, लगेच फवारणी करणंही
शक्य होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण
इथल्या नियोजित मोसंबी रोपवाटिका “सिट्रस इस्टेट” या योजनेसाठी ३६ कोटी ४४ लाख ९९१
रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान
भुमरे यांनी ही माहिती दिली. ही तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यात येणार
असल्याचं भुमरे यांनी सांगितलं. पैठण केंद्रबिंदू मानून १०० किलोमीटर परिघात या रोपवाटिकेचं
कार्यक्षेत्र राहणार आहे. मराठवाड्यात सुमारे ३९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर मोसंबी
उत्पादन घेतलं जातं. त्यापैकी औरंगाबाद जिल्हात २१ हजार ५२५ हेक्टर आणि जालना जिल्हात
१४ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रावर हे उत्पादन घेतलं जातं.
****
जालना जिल्ह्यात आज नवे १६३
तर नांदेड जिल्ह्यात आज नवीन ५५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात
आज २३ रुग्णांना तर नांदेड जिल्ह्यात १२८ रूग्ण बरे होऊन घरी परतले. जालना जिल्ह्यात
सध्या ४८२ तर नांदेड जिल्ह्यात सध्या एक हजार ८६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
No comments:
Post a Comment