Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 15 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक
भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी
कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच
चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
नोंदणी करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन.
·
सैनिकांसाठी
तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक गणवेशाचं सैन्य दिनी अनावरण.
·
कोरोना
विषाणू प्रतिबंधक लसीकरणाची बोगस प्रमाणपत्र प्रकरणी धुळे महापालिकेचे मुख्य आरोग्य
अधिकारी डॉ.महेश मोरे यांच्यासह ४ जणांना अटक.
आणि
·
भारतीय
खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक.
****
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात
सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे
परीक्षार्थीं तसंच पालकांना केलं आहे. युवकांसमवेत जोडण्याची तसंच त्यांचे आव्हानं
आणि प्रश्न समजून घेण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते असं पंतप्रधानांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे. तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी
जास्तीत जास्त प्रमाणात ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं. गेल्या महिन्यात मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही पंतप्रधानांनी या
कार्यक्रमासाठी नोंदणीचं आवाहन केलं होतं.
****
सैनिकांसाठी तयार करण्यात
आलेल्या अत्याधुनिक गणवेशाचं आज सैन्य दिनी अनावरण करण्यात आलं. नवी दिल्लीत करियप्पा
मैदानावर झालेल्या संचलनात हा गणवेश धारण करुन सुरक्षा दलाचे सैनिक सहभागी झाले. राष्ट्रीय
फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्यांनं हा गणवेश तयार करण्यात आला आहे. हा विविध १३
आकारांमध्ये उपलब्ध असून यासाठी विशेष डिजिटल विघटन पॅटर्नचा उपयोग केला आहे. प्रतिकूल
हवामान स्थितीत सैनिकांना अधिक सुरक्षा उपलब्ध करणं आणि याकाळात अधिक काळ टिकून राहण्याची
क्षमता प्रदान करणं, हा या गणवेशाचा उद्देश आहे. वजनानं हलका असलेला हा गणवेश ३० टक्के
पॉलिस्टर आणि ७० टक्के सुती धाग्यांचा वापर केल्यामुळे तो लवकर कोरडा होऊ शकतो. हिवाळा
तसंच उन्हाळ्यातही कारवाई दरम्यान जवानांकरता अधिक आरामदायक सिद्ध होईल असा विश्वास
लष्करानं व्यक्त केला आहे.
****
उत्तर प्रदेशात होणाऱ्या
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं १०७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात
पहिल्या टप्प्यातल्या ५७ आणि दुसऱ्या टप्प्यातल्या ४८ उमेदवारांचा समावेश आहे. सध्याच्या
८३ आमदारांपैकी २१ नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
****
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल
यांना वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी
कारवाई करत सहा जणांना अटक केली. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः
प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील सर्किट हाउस या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी
आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं सांगितले.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधक
लसीकरणाची बोगस प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी धुळे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.महेश
मोरे यांच्यासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी शासनाच्या लसीकरण संकेतस्थळावर
खोट्या नोंदी करत ३ हजार १९१ लोकांना लस न घेतांच प्रत्येकी ५०० ते १००० रुपयांची वसुली
करत बोगस प्रमाणपत्र तयार करुन दिले. महापालिका स्थायी समितीत नगरसेवकांनी आणि महापालिकेच्या
बाहेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस लसीकरण प्रमाणपत्राबाबतीत आंदोलन केल्यानंतर
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांनी शहर पेालिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या
विरुध्द गुन्हा दाखल केला.
****
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी
महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री
छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातल्या सत्यगाव इथं अंगणवाडी
इमारत आणि अन्य विकासकामाचं उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याबरोबरच वीज खंडीत होणार नाही याची काळजी घेतली
जाईल. विजबिलाच्या भरणातून आलेला निधी हा गावातील विजेची कामे मार्गी लावण्यासाठी परत
मिळेल याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या
पुरुष एकेरीत भारतच्या लक्ष्य सेननं अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत मलेशियाच्या
बॅटमिंटनपटूचा १९-२१, २१-१६, २१-१२ असा पराभव करत, लक्ष्यने अंतिम फेरी गाठली. उद्या
त्याची अंतिम सामन्यात सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याशी लढत होणार आहे.
****
स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्रेस
लवकरच सुरू करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिलं
आहे. मराठवाड्यातल्या नागरिकांना स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसर पाहता यावा, तसंच व्यापारी
हिता साठी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्रेस' सुरू करावी अशा मागणीचं निवेदन भाजप पदाधिकाऱ्यांनी
आज औरंगाबाद इथं कराड यांच्याकडे सादर केलं, त्यावेळी डॉ कराड यांनी हे आश्वासन दिलं.
****
पहिल्या प्रबोधन आंतरराष्ट्रीय
लघुपट महोत्सवात ‘खिसा’ या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी
राज मोरे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरला
आहे. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचं तर विराज झुंजारराव
दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे. या सोहळ्याला प्रमुख
पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक तसंच महाराष्ट्राचे उद्योग
आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे
अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते.
****
वाशिम इथं काल चार बालकामगारांची
सुटका करण्यात आली. बाल कामगार आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियमाअंतर्गत
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या नियंत्रणाखालील गठित कृतीदलानं एका आस्थापनेत
काम करणाऱ्या या मुलांची सुटका केली. आस्थापनाधारकाविरुद्ध वाशिम शहर पोलीस स्थानकात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज कोरोना
विषाणू बाधित ४२१ नवीन रुग्ण आढळून आले, तर ६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात
सध्या २ हजार २० रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.
जालना जिल्ह्यात आज १०० नवीन
कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर कोरोनामुक्त झालेल्या २३ रुग्णांना सुट्टी देण्यात
आली. जिल्ह्यात सध्या ५५९ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
No comments:
Post a Comment