Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 16 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक
भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी
कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच
चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची वर्ष पूर्ती; टपाल
तिकिटाचं अनावरण.
·
कोविड स्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे आरोग्य मंत्री
राजेश टोपे यांचे संकेत.
·
मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचं आज पहाटे पुण्यात
निधन.
आणि
·
वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ पुस्तकाला बालवाङमय
पुरस्कार जाहीर.
****
कोविड १९ प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालं. १६
जानेवारी २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं होतं. देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना कोविड लसीची मात्रा
देण्यात आली आहे. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन्ही
मात्रा मिळाल्या आहेत.
लसीकरण
मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी या मोहिमेशी संबंधित सर्वांचं कौतुक केलं आहे. कोविड-19
विरुद्धच्या लढ्याला या मोहिमेतून मोठं बळ मिळालं, अनेकांचे प्राण वाचले, असं
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
लसीकरण
मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज एक
टपाल तिकीट जारी केलं. या कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियानाबद्दल जगभरातून आश्चर्य व्यक्त
होत असल्याचं मांडवीय यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात
बंद करण्यात आलेल्या शाळा सुरू करण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले
आहे. ते आज जालन्यात बोलत होते. वाढती रुग्ण संख्या पाहता, राज्यातल्या शाळा बंद करण्यात
आल्या आहेत. ज्या ठिकाणी कोविड रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्के क्षमतेनं शाळा पुन्हा
सुरु कराव्यात अशी मागणी होत आहे. त्यामुळं पंधरा दिवसांनंतर आढावा घेवून यावर पुनर्विचार
करण्यात येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील असं टोपे यांनी स्पष्ट केलं
आहे. प्रत्येक जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असंही आरोग्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिस असोसिएशन – ‘मेस्टा’
या संघटनेनं उद्यापासून राज्यभरातील शाळा सुरु
करणार असल्याचं सांगितलं
आहे. आज नागपूर इथं या संदर्भात एक बैठक
घेण्यात आली त्यानंतर संघटनेच्या वतीनं डॉ. निशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली. पालकांच्या सहमतीनं, कोरोना नियमांचं संपूर्ण पालन तसंच सविनय कायदेभंग
करत शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं डॉ.नारनवरे यांनी सांगितलं. संपूर्ण राज्यात मेस्टा संघटनेच्या १८ हजार शाळा
असून त्यापैकी किमान ५० टक्के शाळा सुरू होण्याची शक्यता डॉ नारनवरे
यांनी व्यक्त केली.
****
मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. बालवाङमय, विज्ञान, इतिहास
आदी विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. जाखडे यांनी ‘पद्मगंधा’ प्रकाशनाच्या
माध्यमातून अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली. याशिवाय
जगभरातलं तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी
भाषेत अनुवादही प्रकाशित केले. त्यांच्या संपादनात ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक प्रकाशित होत. जाखडे यांना विविध साहित्य संस्थाचे पुरस्कार देऊन
गौरवण्यात आलं आहे.
****
नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स
सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
आज नवी मुंबईत खारघर इथं फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन
दूरदृश्य प्रणालीद्वारे ठाकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी तसंच
मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या केंद्राच्या माध्यमातून ही नाळ
मातीशी पुन्हा जोडली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. छत्रपती संभाजी
महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचं रक्षण करत स्वराज्यविस्तार केला. युध्दनिपुण, प्रकांड
पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला आपण मानाचा मुजरा करतो
तसंच राज्यातील जनतेला या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो असंही अजित पवार
यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पदवी प्राप्त करणं ही शिक्षणाची सीमा नसून तो
शिक्षणाचा आरंभ असल्याचं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ते
आज पुण्यात श्री बालाजी अभिमत विद्यापीठाचा पहिल्या दीक्षांत समारोहात बोलत होते.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रत्येकानं आत्मनिर्भर झालं
पाहिजे तसंच आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले.
सेवानिवृत्त एअर मार्शल भूषण गोखले या समारंभाला उपस्थित होते. भारतीय लष्कराला
संरक्षण दल न म्हणता सशस्त्र सैन्य दल म्हणणं योग्य राहिल असं मत गोखले यांनी
वर्तवलं. ‘संरक्षण’ हा शब्द बचावात्मक पवित्रा
दर्शवतो तर ‘सशस्त्र सैन्य दल’ आत्मविश्वास
जागवतो असं त्यांनी सांगितलं.
****
अखिल
भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२०-२१ या वर्षाचे बाल वाङमय पुरस्कार जाहीर
झाले आहेत. बाल कवितेचा पुरस्कार वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ या
पुस्तकाला, बाल कथा संग्रहाचा पुरस्कार प्रा. सुहास बारटक्के यांच्या ‘बांधामधला धामण’
या पुस्तकाला, बाल एकांकिकेचा पुरस्कार प्रभाकर शेळके यांच्या कोरोना राक्षस या पुस्तकाला,
बाल कादंबरीचा पुरस्कार नागेश शेवाळकर यांच्या समूदादा या पुस्तकाला, शैक्षणिक साहित्याचा
पुरस्कार डॉ. नीलिमा गुंड यांच्या भाषेची भिंगरी या पुस्तकाला, तर विज्ञानविषयक पुरस्कार
डॉ. सुनील विभुते यांच्या अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा या पुस्तकाला जाहीर झाला आहे.
मुलांनी लिहिलेल्या साहित्याचा पुरस्कार मुग्धा घेवरीकर हिच्या ‘मुग्धाच्या कविता’
या पुस्तकाला तसंच पीयुष गांगुर्डे याच्या ‘काळजातली माया’ पुस्तकाला जाहीर झाला आहे
****
हिंगोली
जिल्ह्यात येत्या दोन महिन्याच्या आत शंभर टक्के लसीकरण झालं पाहिजे, अशा सूचना जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिल्या आहेत. कळमनुरी इथल्या उगम
ग्रामीण विकास संस्था, उमरा या संस्थेच्या लसीकरण आणि जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटन
संजय दैने यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. हिंगोली जिल्ह्यात लसीकरणाचा
टक्का वाढवण्यासाठी आता सेवाभावी संस्थाही पुढे सरसावल्या असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे
****
जालना जिल्ह्यात आज १८५ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर कोरोनामुक्त
झालेल्या ३५ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात ६१ हजार ७० रुग्ण
कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सध्या ७०९ कोरोना
सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
No comments:
Post a Comment