Wednesday, 5 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबातल्या फिरोजपूर इथली सभा सुरक्षा भंग झाल्यानं रद्द.

·      देशाचा कोविड संसर्ग दर पाच पूर्णांक शून्य ३ टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर ११ टक्क्यांवर.

·      राज्यातली महाविद्यालयं १५फेब्रुवारीपर्यंत तर औरंगाबाद मधल्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद.

·      प्राचार्य सखाराम बेगाजी बागल यांचं आज वसमत इथं निधन.

आणि

·      दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबातली फिरोजपूर इथली सभा सुरक्षा भंग झाल्यानं रद्द करण्यात आली. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरऐवजी रस्त्याने सभास्थानी निघालेल्या पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा, काही आंदोलकांच्या गटानं, एका उड्डाणपुलावर सुमारे २० मिनिटं रोखून धरला. त्यानंतर दौरा रद्द करून, पंतप्रधानांचा ताफा मागे फिरल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या प्रवासाचा मार्ग आंदोलकांना कसा काय माहिती झाला, याचं उत्तर पंजाबातल्या काँग्रेस सरकारनं द्यावं, अशी मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेतून केली आहे.

****

देशाचा कोविड संसर्गदर पाच पूर्णांक शून्य ३ दशांश टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर ११ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. देशभरात कोविड संसर्गाचं प्रमाण वाढत असलं तरीही, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

 

दरम्यान देशभरात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या १४८ कोटी १८ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. यापैकी ८५ कोटी २२ लाख नागरिकांना लसीची पहिली मात्रा तर ६१ कोटी ९० लाख नागरिकांना दोन्ही मात्रा, तर १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या एक कोटी सहा लाख किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

****

राज्यात कोविड स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आरोग्य यंत्रणेनं सज्ज रहावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. ते आज या संदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. कोरोना बाधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी, सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांवर गृह अलगीकरणात योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोविड रुग्णालयं सज्ज ठेवण्यात यावीत अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

****

अँटिन्जन चाचणी चा अहवाल कोरोनाबाधित आला, तर आरटी पीसीआर करण्याची आवश्यकता नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कोरोना रुग्णवाढीचा दर दुप्पट झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या टाळेबंदीचा विचार नसून कडक निर्बंध कडक लागू केल्याचं त्यांनी सांगितलं. बाधित रुग्णांचा कालावधी आता सात दिवसांचा करण्यात आला असून घरगुती विलगीकरणासाठी प्रशासनानं नव्यानं मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत असं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली असून, या प्रवाशांसाठी जलद कोवीड चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

****

भारत बायोटेक या हैदराबाद इथल्या कंपनीनं तयार केलेल्या, नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या परीक्षणाला भारतीय औषध महानियंत्रक च्या तज्ञ समितीनं परवानगी दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या २ मात्रा घेतलेल्यांना बुस्टर डोस म्हणून ही मात्रा देण्याचं प्रस्तावित आहे. औषध महानियंत्रक विभागानं भारत बायोटेक ला या विषयीचा नवा कच्चा मसुदा सादर करण्यास सांगितलं आहे.

****

राज्यातली सगळी महाविद्यालयं येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज ही माहिती दिली. या कालावधीत ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. परदेशातून आलेले विद्यार्थी वगळता, इतर विद्यार्थ्यांसाठीची वसतीगृहं बंद राहणार असल्याचं, सामंत यांनी सांगितलं.

****

कोविड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतल्या पहिली ते आठवी इयत्तेचे वर्ग येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आज या संदर्भातले आदेश जारी केले. या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सर्व इयत्तांचा अभ्यास सुरू ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

****

पुस्तकांचं गाव योजनेचा विस्तार करण्यास राज्यसरकारने मान्यता दिली आहे. महाबळेश्वरजवळ भिलार इथं राबवली जात असलेली ही योजना आता राज्यभर राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात सहा विभागीय स्तरावर प्रत्येकी एक आणि दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरावर एक पुस्तकाचं गाव उभारलं जाईल. या योजनेसाठी वार्षिक एक हजार ९७९ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिव देहाचं आज पुण्यात ठोसर बाग स्मशान भूमीत महानुभाव पंथाच्या प्रथेनुसार शासकीय इतमामात दफन करण्यात आलं. तत्पूर्वी त्यांचा पार्थिव देह पुण्यात मांजरी इथल्या पुनर्वसन केंद्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. मांजरी पुनर्वसन केंद्रात महिला पोलिस दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

****

प्राचार्य सखाराम बेगाजी बागल यांचं आज हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं निधन झालं. हिंगोली जिल्हा कांग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या सखाराम बागल यांनी, वसमत मधल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालय, तसंच औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून समर्थपणे काम केलं. शैक्षणिक, सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रात बागल यांनी भरीव योगदान दिलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी कौठा इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात २६६ धावा करत, दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान दिलं आहे. कालच्या दोन बाद ८५ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाचे फलंदाज आजही फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. अजिंक्य राहणेच्या ५८, चेतेश्वर पुजारा ५३ तर हनुमा विहारीच्या नाबाद ४० धावा वगळता, अन्य एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या बिनबाद २१ धावा झाल्या होत्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...