Thursday, 6 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** राज्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भातला निर्णय तूर्त नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

** कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये पूर्वतयारी करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

** राज्यात सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रं उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या कृषिमंत्री दादा भुसे यांच्या सूचना

आणि

** विवेकाचा आवाज क्षिण होता कामा नये- अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचं प्रतिपादन 

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत आढावा बैठक घेतली. संचारबंदी, रात्रीची संचार बंदी किंवा सप्ताहांत टाळेबंदी, जिल्हाबंदी या सर्व पर्यायांवर चर्चा झाल्या आहेत, मात्र त्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात पत्रकारांना बोलताना सांगितलं. ते म्हणाले….

जी चर्चा झाली आणि ज्याच्यावर एकमत झालं १०० टक्के व्हॅक्सिनेशन कसं वाढलं पाहिजे. जे आज साधारण एक सत्तर, ऐंशी लाख लोकांनी अजून एकही व्हॅक्सीन घेतलं नाही. तर त्या लोकांनी व्हॅक्सीन घेतलंच पाहिजे. किंवा जे ड्यू डेट झालेले आहेत आणि सेकंड व्हॅक्सीन घेण्याची आवश्यकता आहे, त्यांनी सेकंड व्हॅक्सीन घेतलं पाहिजे. आता दहा तारखेच्या नंतर कोमॉरबीड आणि सिक्स्टी प्लस जे व्हॅक्सीन देण्याच्या संदर्भात ज्याला प्रिकॉशन व्हॅक्सीन म्हणतो, आपण ते घेतले पाहिजे, या दृष्टीकोनातून सुद्धा पॉलिसी काय आहे, कशी आपण करुन घेणार आहोत, ते पण समजून घेण्याचं काम त्याठिकाणी केलं आहे.

****

कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढताना दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. राज्यातली परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाय योजनाबाबतच्या आढावा बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. ही महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा, प्राणवायूची उपलब्धता, कृत्रिम जीवन प्रणालींची संख्या यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावं, अशा सूचनाही देशमुख यांनी यावेळी दिल्या.

****

जालना जिल्ह्यात आज  कोरोना विषाणू संसर्गाचे अकरा नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्गातून बरे झालेल्या तीन रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार ९२५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत तर सध्या जिल्ह्यात या संसर्गाच्या ६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

राज्यातल्या सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रं उभारण्यात येणार असून यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. या संदर्भात मुंबईत त्यांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळं होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, तसंच शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि कृषिविषयक सल्ला मिळण्याबाबतही ही केंद्रं उपयुक्त ठरणार असल्याचं भुसे म्हणाले.

****

राज्य विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ही शपथ दिली.

****

विवेकाचा आवाज क्षीण झाला आहे, तो होता कामा नये, असं प्रतिपादन लातूर जिल्ह्यात उदगीर इथं येत्या एप्रिल महिन्यात नियोजित आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केलं आहे. पुणे इथं महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सासणे बोलत होते. आत्मनिर्भर होऊन सत्य सांगता आलं पाहिजे तसंच लेखकांनी जाणीवपूर्वक यावर लिहिलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले.

****

हिंगोलीमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आज आयोजन करण्यात आलं होतं. हा उपक्रम अभिनंदनीय आणि स्तूत्य असल्याचं सांगत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन यावेळी अभिवादन करण्यात आलं.

                                   ****

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं श्री शाहू महाराज माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांतर्फे कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीराचं आज आयोजन करण्यात आलं होतं. यात १४ वर्षे वयाच्या दोन हजार विद्यार्थ्यांनी लस घेतली.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आहे. पावसामुळं दिवसभरातला निम्म्याहून अधिक खेळ होऊ शकलेला नाही. या व्यत्ययानंतर विजयासाठी २४० धावांचं आव्हान असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे फलंदाज दोन बाद ११८ वरुन पुढं खेळण्यास सुरुवात करणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...