Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 07 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक
भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी
कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच
चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
राष्ट्रव्यापी
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत दीडशे कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार.
·
आंतरराष्ट्रीय
प्रवाशांसाठी कोविड प्रतिबंधासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी.
·
कोविड
निर्बंधाचं पालन न केल्यास, निर्बंध अधिक कठोर करण्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा
इशारा.
·
वैद्यकीय
पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत ओबीसींना २७ टक्के, तर आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के
आरक्षण लागू करण्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता.
आणि
·
औरंगाबाद
शहरात व्यसनाधीनता तसंच सायबर गुन्ह्यात वाढ.
****
राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक
लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतानं आज दीडशे कोटी लसीकरणाचा टप्पा पार करुन इतिहास घडवला
आहे. कोविड लसीकरण सुरू झाल्यानंतर वर्षभरापेक्षाही कमी काळात देशानं हे उद्दिष्ट गाठलं
आहे. गेल्या वर्षी १६ जानेवारीला सुरु झालेल्या या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ९० टक्के
पात्र नागरिकांना लसीची पहिली मात्रा तर ६५ टक्के पात्र नागरिकांना लसीची दुसरी मात्रा
देण्यात आली आहे. विश्वातल्या या सर्वात मोठ्या लसीकरण अभियानात गेल्या वर्षी २१ ऑक्टोबरला
२७९ दिवसातच देशानं कोविड लसीच्या १०० कोटी मात्रा देण्याचं उद्दिष्ट साध्य केलं होतं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचं गतीशील नेतृत्व आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न यांच्या बळावर भारतानं
कोविडच्या दीडशे कोटी मात्रांचा ऐतिहासिक टप्पा पार केला असल्याचं, केंद्रीय आरोग्य
मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. मांडवीय यांनी एका ट्वीट संदेशातून आपल्या
भावना व्यक्त करतांना, सर्वांनी एकत्र प्रयत्न केले तर कोणतंही उद्दीष्टं पूर्ण करणं
शक्य असल्याचं म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी
कोविड प्रतिबंधासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या प्रवाशांनी
७२ तासांतल्या आरटीपीसीआरचा बाधित नसल्याचा अहवाल, हा अहवाल खरा असल्याचं प्रतिज्ञापत्र,
सादर करणं बंधनकारक आहे. योग्य सामाजिक अंतर, मास्कचा वापर, यासह इतर नियमांचाही यात
उल्लेख करण्यात आला आहे. ब्रिटनसह सर्व युरोपीय देश, दक्षिण आफ्रिका, चीन, न्यूझीलंड,
हाँगकाँग, कझाकस्थान, केनिया आदी १९ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध अधिक
कठोर करण्यात आले आहेत.
****
कोरोनाविषयक, निर्बंध न पाळणाऱ्यांविरोधात
गुन्हे दाखल व्हायला हवेत, तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच
लागतील, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते आज जालन्यात बोलत होते.
राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून १० तारखेनंतर पात्र नागरिकांनी
बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन टोपे यांनी केलं.
ज्या ठिकाणी संसर्ग दर २५
ते ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती असेल, त्या ठिकाणच्या शाळा स्थानिक प्रशासनाकडून
बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. चित्रपटगृहं, नाट्यगृह, तसंच धार्मिक स्थळांबाबत
गरज पडली तर निर्बंध लावले जातील. मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्याची आवश्यकता
टोपे यांनी व्यक्त केली.
****
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश
परीक्षा - नीट पीजी मध्ये इतर मागासवर्गीय - ओबीसींना २७ टक्के, आणि आर्थिकदृष्टया
मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याला, सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे.
यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि ए एस बोपन्ना यांच्या
पीठाने हा निर्णय दिला. सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेत कोणतीही बाधा
येऊ नये, म्हणून ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण कायम ठेवण्यात येत आहे,
तसंच पांडेय समितीच्या शिफारशी पुढील वर्षापासून लागू करण्यास मंजुरी देत असल्याचंही
न्यायालयानं म्हटलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्नाच्या
मुद्यावर येत्या मार्च मध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी
घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी अजून दोन जणांना नाशिक मधून अटक केली आहे. या दोघांनी
उमेदवारांकडून एकेक लाख रुपये घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचं तपासात निष्पन्न झालं
आहे. राज्य परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या चौकशीत ही माहिती पुढे
आली आहे.
****
‘सर्वांसाठी घरं’ हा कार्यक्रम
शासनामार्फत प्राधान्यानं राबवला जाणार असून म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी
राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुणे
गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची
ऑनलाईन सोडत उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
****
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ
यांच्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा
विजय झाला आहे. बँकेच्या संचालकपदाच्या २१ पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या असून सत्ताधारी
गटातील ८ उमेदवार तर विरोधी गटातील ४ उमेदवार विजयी झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या गुन्हे
सिद्धतेचं प्रमाण गेल्या वर्षात ८४ टक्के राहिलं आहे. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता
यांनी औरंगाबाद शहराच्या गुन्ह्यांबाबत वार्षिक अहवालासंदर्भात आज वार्ताहर परिषदेत
माहिती दिली. शहरात व्यसनाधीनता तसंच सायबर गुन्ह्यात वाढ झाली असल्याचं डॉ गुप्ता
यांनी सांगितलं. जामीनावर सुटलेल्या आरोपींकडून पुन्हा गुन्हा घडण्याची शक्यता पाहता
शहरात प्रिव्हेन्शन सेल - दक्षता कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्तांनी
सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात आज २३ तर
नांदेड जिल्ह्यात ७४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. जालना जिल्ह्यात सध्या बाधित
असलेल्या ८० रुग्णांवर तर नांदेड जिल्ह्यात २०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
राज्य परिवहन महामंडळ-एसटीच्या
परभणी विभागातून संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ६० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सेवेतून
बडतर्फ करण्यात आलं आहे. यामध्ये १८ चालक, १३ वाहक, यांत्रिकी विभागातले आठ तर प्रशासकीय
विभागातल्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय १४ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली
असून, १३ कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment