Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 08 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक
लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा
ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या
किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या
दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी
सहकार्य करा. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड
-१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय
मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू
शकता.
****
·
गोवा,
पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम
जाहीर.
·
ओमायक्रॉन
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय.
·
हिंगोली
जिल्ह्यात कोविडने दगावलेल्या ६५७ व्यक्तींच्या कुटुंबीयांचे सानुग्रह मदतीसाठी अर्ज.
·
अकोला
ते पूर्णा या २०२ किलोमीटर लोहमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण.
आणि
·
लोकसहभागातून
खाम नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम आणखी पुढे नेण्याचा आमदार अंबादास दानवे यांचा मानस.
****
गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड
आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं
आज जाहीर केला. या राज्यांमधल्या ६९० विधानसभा जागांसाठी सात टप्प्यात निवडणूक होणार
असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशिल चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१०, १४, २० २३, २७, फेब्रुवारी तसंच ३ आणि ७ मार्च अशा सात टप्प्यात मतदान घेण्यात
येणार आहे. उत्तराखंड, पंजाब आणि गोव्यात एकाच टप्प्यात, मणिपूर मध्ये दोन टप्प्यात
तर उत्तर प्रदेश इथं सात टप्प्यात मतदान होणार आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर महिलांसाठी
महिलांद्वारे संचलित एका मतदान केंद्राची सोय करण्यात येणार असून उमेदवारांना ऑनलाईन
अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. पाच ही राज्यातील मतमोजणी १० मार्च
रोजी होणार आहे.
****
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आपण गृहविलगीकरणात असून, आपल्या
संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन दानवे यांनी ट्विट संदेशाद्वारे
केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कोविडने
मृत्यू झालेल्या ६५७ व्यक्तींच्या कुटुंबीयांनी सानुग्रह मदतीसाठी अर्ज केले आहेत.
यापैकी १७७ अर्ज एकत्रितरित्या जिल्हाधिकारी कार्यालय तसंच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत
मंजूर करण्यात आले आहेत. तर १४ अर्ज नामंजूर झाले आहेत. संबंधितांनी त्रुटी दुरुस्त
करून ऑनलाईन पोर्टलवर देण्यात आलेल्या वेळेत सर्व कागदपत्रं घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात
हजर राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या
लाटेला सुरुवात झाली असली, तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, योग्य ती काळजी घ्यावी,
असं आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केलं आहे. कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यासह
लसीकरण करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले –
हिंगोली
जिल्ह्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. आज जवळपास
११ पेशंटस् हे पॉझिटीव आलेले आहेत. मात्र याच्यामधली समाधानाची बाब एवढीच आहे की हे
सर्व पेशंटस् बहुतेक असिंम्पटोमॅटीक आहेत. नागरिकांना विनंती आहे की आपण आपला पहिला
डोस तात्काळ घ्यावा, ज्यांचा दुसरा डोस ड्यू झालेला आहे, त्या लोकांनी आपला दुसरा डोस
तात्काळ घेतला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती ओमायक्रॉनचा किंवा तिसऱ्या लाटेचा फार
मोठा प्रभाव पडणार नाही.
****
ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव
लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या
१४ फेब्रुवारी पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार
होत्या. पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ३१ जानेवारी ऐवजी आता २८
फेब्रुवारी पासून घेण्यात येणार आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला
ते पूर्णा या २०२ किलोमीटर लोहमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. सध्या या मार्गावर
रेल्वे इंजिनची चाचणी सुरू असून पुढच्या आठवड्यात या मार्गावरून रेल्वे धावण्याची चाचणी
घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मार्गावरून विजेवरून चालणारी रेल्वे
सुरू झाल्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा नवा मार्ग सुरू होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी
आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. या संदर्भातलं
एक पत्र या कर्मचाऱ्यांनी पाथरीचे तहसीलदार सुमंत मोरे यांच्याकडे आज सादर केलं. आत्महत्या
हा कायद्याने गुन्हा असल्याने आपण आत्महत्या करु शकत नाहीत, असं नमूद करत, वारंवार
निवेदन देवूनही सरकार योग्य प्रतिसाद देत नसल्याने आता स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी,
असं या पत्रात म्हटलं आहे.
****
सातारा जिल्ह्यात कोयना धरण
परिसरात आज दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची
तीव्रता रिश्टर स्केलवर २ पूर्णांक ९ दशांश इतकी नोंदवली गेली असून त्याचा केंद्रबिंदू
कोयना धरणापासून आठ किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावात नोंदवला गेला आहे.
****
खाम नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमात
लोकांचा सहभाग वाढवून या कार्याला आणखी पुढे नेण्याचा मानस आमदार अंबादास दानवे यांनी
व्यक्त केला आहे. औरंगाबाद शहरातून वाहणाऱ्या खाम नदी पुनरुज्जीवन अभियानाअंतर्गत कामाची
प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, आमदार अंबादास दानवे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज पाहणी
केली, त्यावेळी दानवे बोलत होते. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामि गंगे’ अभियानाअंतर्गत
औरंगाबाद मधून वाहणाऱ्या खाम नदीला पुनरुज्जीवित करण्यात येत आहे. यामध्ये औद्योगिक
संघटना, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि लोकसहभाग घेतला जात आहे. छावनी परिषद
ते गरमपाणी भागापर्यंतचा नदी किनाऱ्याची आज पाहणी करण्यात आली. लोकांनी हे नदी काठाचे
बदललेले स्वरूप पाहण्यासाठी आवर्जून भेट द्यावी, खाम नाल्याचे पुनश्च नदी करण्याचा
हा उपक्रम आगामी काळात अजून वेग घेईल.
****
No comments:
Post a Comment