Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या
काही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर
आज सरकारनं बैठक बोलावली असून, यावेळी राज्यात अधिक निर्बंध लावण्याबाबत चर्चा होईल,
असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
****
जम्मू
आणि काश्मीरलध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या चांदगाम भागात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या
चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. हे दहशतवादी जैश - ए - मोहम्मद या संघटनेचे असल्याचं
पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं. यापैकी एक दहशतवादी हा पाकिस्तानी नागरीक
होता, असं ते म्हणाले.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ९६
लाख ४३ हजार २३८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १४७ कोटी ७२ लाख
आठ हजार ८४६ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १५ ते १८ वयोगटातल्या ८१ लाख ४५
हजारांहून अधिक जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.
****
कोविड-19
चा सामना करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आणि आरोग्य व्यवस्था तयारी पॅकेजच्या दुसऱ्या
टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं, फक्त २६ पूर्णांक १४ शतांश टक्के निधी वितरित केल्याचं
वृत्त, दिशाभूल करणारं असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय
आरोग्य मोहिमेद्वारे आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सहा हजार कोटी रुपयांपेक्षा
जास्त म्हणजे ५० टक्के निधी वितरित केला आहे. त्यापैकी एक हजार ६८९ कोटी रुपये राज्य
आणि केंद्रशासित प्रदेशांनी याआधीच खर्च केले आहेत. राज्यांनी या आरोग्य-पॅकेजची वेगानं
अंमलबजावणी करावी, यासाठी केंद्र सरकार सक्रियतेनं पाठपुरावा करत आहे, असं केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या, परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता ऑनलाईन
अर्ज भरण्याची सुरुवात नऊ डिसेंबर पासून झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी येत्या सात जानेवारीपर्यंत
अर्ज करावेत. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा येत्या १६ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी
एक या वेळेत घेण्यात येणार आहे. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या मुंबईच्या
संचालकांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता
पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था,
मुंबई आणि नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि कोल्हापूर इथल्या भारतीय प्रशासकीय
पूर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये, प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचं आयोजन
करण्यात आलं आहे.
****
ज्येष्ठ
समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज पुण्यात वैकुंठ स्मशान भूमीत शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंधुताई सपकाळ यांचं काल हृदयविकाराच्या
झटक्यानं निधन झालं, त्या ७३ वर्षांच्या होत्या. सिंधुताई अनाथ मुलांच्या संगोपनासाठी,
त्यांच्या शिक्षणासाठी सदैव कार्यरत राहिल्या.
****
अखिल
भारतीय साहित्य महामंडळाचा यंदाचा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती संत साहित्य पुरस्कार,
संत साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. यू.म. पठाण यांना, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ
कोत्तापले यांच्या हस्ते, औरंगाबाद इथं आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. एक लाख
रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
देशातला
साखरेचा शिल्लक साठा आणि चालू हंगामात उसाचं झालेलं अतिरिक्त उत्पादन लक्षात घेता,
यंदा साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉलनिर्मितीवर भर द्यावा, असं आवाहन, वसंतदादा
साखर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते काल पुण्यात संस्थेच्या ४५ व्या
वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अतिरिक्त साखरेचं उत्पादन करुन नंतर ती साखर बँकेकडे
गहाण ठेवण्याऐवजी इथेनॉलची निर्मिती करून कारखान्यांनी पैसा मोकळा करावा, त्याचा फायदा
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही होईल. शेतकऱ्यांनीही एकरी अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या उसाच्या
नव्या वाणाकडं वळलं पाहिजे, असं पवार म्हणाले.
****
बैलगाडी
शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर राज्यातल्या पहिल्या बैलगाडी शर्यती काल सांगली जिल्ह्यात
पार पडल्या. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नांगोळे या गावात झालेल्या या शर्यतीमध्ये ४०
बैल जोडी मालकांनी भाग घेतला. सदर स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातले संदीप पाटील यांच्या
हरण्या - सोन्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. एक लाख रुपयांचे रोख बक्षीस यावेळी
देण्यात आले. ही शर्यत पाहायला लोकांनी गर्दी केली होती.
****
जोहान्सबर्ग
इथं सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात
आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात दोन बाद ८५ धावांपासून पुढे खेळणार
आहे. भारताकडे ५८ धावांची आघाडी आहे.
****
No comments:
Post a Comment