Thursday, 6 January 2022

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात कोविड परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश  

·      राज्यातली सर्व महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद, औरंगाबाद जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यंत आठवीपर्यंतच्या शाळा बंद, हॉटेलमध्ये गर्दीला मनाई हुरडा पार्टी तसंच फार्म हाऊस आणि रिसॉर्टवरही बंदी  

·      राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या १४४ रुग्णांची नोंद

·      राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे २६ हजार ५३८ रुग्ण, मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर २९३ नवे बाधित

·      कर्ज वाटप - ठेवी गुणोत्तर वाढवण्यासाठी आर्थिक समावेशन अभियानाचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये शुभारंभ

·      माजी प्राचार्य सखाराम बेगाजी बागल यांचं निधन

आणि

·      ारताविरुद्धच्या दुसऱ्या सोटी क्रिकेट सामन्यात विजयासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २४० धावांचं आव्हान

****

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्यानं, परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यातली नवीन कोरोना विषाणूबाबत सद्यस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी काल उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. योग्य प्रकाराच्या मास्कचा वापर, आरोग्य यंत्रणेकडे असलेलं मनुष्यबळ, प्रमाणित उपचार पद्धती, विलगीकरण कालावधी आदी विषयांवर कोविड कृती दलाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी यावेळी विस्तृत चर्चा केली. आरोग्य यंत्रणेनं सज्ज रहावं, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयानं काम करावं, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढवावी, सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवताना, त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करावी,  कोविडची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णांवर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयं सज्ज ठेवावीत, उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसंच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावं, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.

****

अँटिजन चाचणी चा अहवाल कोरोनाबाधित आला, तर आरटीपीसीआर करण्याची आवश्यकता नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कोरोना रुग्णवाढीचा दर दुप्पट झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या टाळेबंदीचा विचार नसून कडक निर्बंध कडक लागू केल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली असून, या प्रवाशांसाठी जलद कोवीड चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

****

कोविड १९ च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातली सर्व महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. या सर्व ठिकाणी वर्ग ऑनलाईन चालू राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे, मात्र पुरेसं संपर्क यंत्रणा नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं घेण्याची भूमिका मांडल्याचं त्यांनी सांगितलं. वसतीगृहं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी परदेशी विद्यार्थी असलेली वसतीगृह चालू राहतील, त्यांना सगळ्या सुविधा पुरवल्या जातील, असं ते म्हणाले. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी ५० टक्के क्षमतेनं आलटून-पालटून काम करतील, १५ फेब्रुवारीनंतर, त्यावेळची परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल, असं सामंत यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं कोविड संदर्भात काही सूचना जारी केल्या आहेत. कोविड बाधित रुग्णाला गृह विलगीकरणात राहायचं असेल, तर घरातल्या सर्व सदस्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणं बंधनकारक असेल, या काळात कुटुंबातल्या इतर सदस्यांनाही घराबाहेर पडता येणार नाही. हॉटेलमध्ये गर्दीला मनाई असून, उपस्थितीचं चित्रीकरण करण्यात येईल. जिल्ह्यात हुरडा पार्टीवर पूर्णपणे निर्बंध असतील, अशा पार्टीवर पोलीस कारवाई केली जाईल. शहराबाहेरच्या फार्म हाऊस तसंच रिसॉर्टवर बंदी असेल, लग्न समारंभात ५० लोकांना सहभागी होता येईल, तसं शपथपत्र मंगल कार्यालयाना द्यावं लागेल. लसीकरण झालेल्या आणि मास्क वापरणाऱ्या नागरिकांनाच पेट्रोल मिळेल, सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द झाल्या असून, शहरी तसंच ग्रामीण भागात लग्नांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे अधिकारी अशा समारंभांना आकस्मिक भेट देतील, असं या सूचनांमध्ये नमूद  करण्यात आला आहे.

****

दरम्यान, कोविड रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतले पहिली ते आठवी इयत्तेचे वर्ग, येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल या संदर्भातले आदेश जारी केले. या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सर्व इयत्तांचा अभ्यास सुरू ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

****

राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांमधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर या महिना अखेर पर्यंत शासनानं स्थगित केला आहे. तसं परिपत्रक काल जारी करण्यात आलं. या कालावधीत अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयातली उपस्थिती हजेरी पटावर नोंदवावी, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या १४४ रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये मुंबईतले १००, पुणे जिल्ह्यातले १३, नागपूर ११, कोल्हापूर पाच, ठाणे सात, अमरावती, भिवंडी, आणि उल्हासनगर प्रत्येकी दोन तर पनवेल आणि उस्मानाबाद इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ७९७ झाली असून, यापैकी ३३० रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २६ हजार ५३८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६७ लाख ५७ हजार ३२ झाली आहे. काल ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ५८१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ९ दशांश टक्के झाला आहे. काल पाच हजार ३३१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख २४ हजार २४७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ८७ हजार ५०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २९३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १२० नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या १०३, तर ग्रामीण भागातल्या १७ रुग्णांचा समावेश आहे.

लातूर जिल्ह्यात ५१, नांदेड ४५, उस्मानाबाद ४०, परभणी १७, बीड १२, जालना सहा, तर हिंगोली जिल्ह्यात काल दोन नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

राज्यातील कर्ज वाटप - ठेवी सीडी रेशोचं गुणोत्तर वाढवण्यासाठी आर्थिक समावेशन अभियानाची काल औरंगाबाद इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.  राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक -नाबार्ड तसंच महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत हे अभियान राबवलं जात आहे. राज्यातल्या उस्मानाबाद, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये सीडी रेशो गुणोत्तर चिंताजनक असल्याचं, डॉ. कराड यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार झाले असून, सर्वसामान्य नागरिकांनीही डिजिटल व्यवहाराचा वापर केला पाहिजे, असं कराड यावेळी म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे ग्राहकांना सेवा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनचं लोकार्पण कराड यांच्या हस्ते झालं.

****

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा यंदाचा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती संत साहित्य पुरस्कार, संत साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. यू.म. पठाण यांना, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापले यांच्या हस्ते, औरंगाबाद इथं काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. लोकसाहित्यातील संशोधनाचा प्रारंभ यू. म. पठाण यांनी केला, असं कोत्तापल्ले यावेळी म्हणाले.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिव देहाचं काल पुण्यात ठोसर बाग स्मशान भूमीत, महानुभाव पंथाच्या प्रथेनुसार शासकीय इतमामात दफन करण्यात आलं. तत्पूर्वी त्यांचा पार्थिव देह पुण्यात मांजरी इथल्या पुनर्वसन केंद्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. मांजरी पुनर्वसन केंद्रात महिला पोलिस दलांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

****

माजी प्राचार्य सखाराम बेगाजी बागल यांचं काल हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं निधन झालं. हिंगोली जिल्हा कांग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या सखाराम बागल यांनी, वसमत मधल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालय, तसंच औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून समर्थपणे काम केलं. शैक्षणिक, सामाजिक तसंच राजकीय क्षेत्रात बागल यांनी भरीव योगदान दिलं. त्यांच्या पार्थिव देहावर काल कौठा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

क्षिआफ्रिका आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या सोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात ६६ धावा करत, दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान दिलं आहे. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात दोन बाद ११८ धावा झाल्या होत्या.क्षिण आफ्रिकेचा संघ विजयापासून २२ धावा दूर असून, भारताला विजयासाठी दक्षिण आफ्रिका संघाचे आठ बळी बाद करणं आवश्यक आहे.

****

उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार, अंबाजोगाई इथले पत्रकार अविनाश मुडेगांवकर यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उदगीर तालुका पत्रकार संघाच्या पुरस्काराचं हे तेरावं वर्ष आहे.

****

लातूर जिल्ह्यात हमीभावानं तूर खरेदीसाठी १८ केंद्र सुरु करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन, पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. तुरीची ऑनलाईन नोंदणी करुन विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सहा हजार ३०० रुपये दर मिळणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी शहराजवळ मोटरसायकलच्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. माळेगावहून येणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत, दुचाकीस्वार दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

परभणी जिल्ह्यातल्या आहेरवाडी कडून पूर्णेकडे येणाऱ्या दुचाकीच्या ट्रकशी झालेल्या अपघातात २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. काल दुपारी माटेगाव शिवारात हा अपघात झाला.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर पोलीस ठाण्यातला पोलीस हवालदार अनिल इंगोले याला सात हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तक्रारदारवर दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी इंगोले यानं, ही लाच मागितली होती. परवा मंगळवारी पंचासमक्ष लाचेची रक्कम घेऊन इंगोले पसार झाला होता. लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

****

उदगीर शहरातील अनेक रस्त्यांच्या चौपदरीकरणाला काल मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...