Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
वैद्यकीय
प्रवेश परिक्षा पदव्यूत्तर - नीट पीजी मध्ये इतर मागासवर्गीय - ओबीसींना २७ टक्के,
आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याला, सर्वोच्च न्यायालयानं
मान्यता दिली आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि
ए एस बोपन्ना यांच्या पीठाने हा निर्णय दिला. पदव्यूत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी
अखिल भारतीय कोट्यातील जागांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी
दहा टक्के आरक्षणाला या याचिकांमध्ये आव्हान देण्यात आलं होतं.
सध्याच्या
शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये, म्हणून ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या
मागास घटकाला आरक्षण कायम ठेवण्यात येत आहे, तसंच पांडेय समितीच्या शिफारशी पुढील वर्षापासून
लागू करण्यास मंजुरी देत असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात आढळलेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीसंदर्भात,
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या
महानिबंधकांना, या प्रकरणाची सर्व माहिती जतन करुन ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात
केंद्र सरकारने आणि पंजाब सरकारने स्थापन केलेल्या समित्यांनी चौकशी करुन आपला अहवाल
दर करावा, असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. हे प्रकरण सीमेपलिकडच्या दहशतवादाशी
संबंधित असल्याचं सांगून, महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा
- एनआयएचं सहकार्य घ्यावं, अशी मागणी केली. यामुळे राष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असल्याचंही
ते म्हणाले. पंजाब सरकारनं देखील या प्रकरणी गंभीर असून, लवकर तपास केला जाईल, असं
पंजाब सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या सोमवारी होणार
आहे.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ९४
लाख ४७ हजार ५६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १४९ कोटी ६६ लाख
८१ हजार १५६ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या एक लाख १७ हजार १०० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३०२
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी
५२ लाख २६ हजार ३८६ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ८३ हजार १७८ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. काल ३० हजार ८३६ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४३ लाख
७१ हजार ८४५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ७१ हजार ३६३ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
जम्मू
काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात जोलवा क्रालपोरा भागात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या
चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. हे दहशतवादी जैश - ए - मोहम्मद या संघटनेचे असल्याचं
पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं. चकमकीच्या ठिकाणाहून तीण ए के ५६ रायफल्स
जप्त करण्यात आल्या.
****
भारतीय
जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात पुढच्या
बुधवारी सुनावणी होणार आहे, यासंदर्भात राज्य सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर
उत्तर देण्याकरता नितेश राणे यांनी वेळ मागितला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी
शिवसेनेचे नेते संतोष परब यांना मारहाण प्रकरणी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
झाला आहे.
****
कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या
सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी
काल हे आदेश जारी केले.
नांदेड
जिल्ह्यातही पहिली ते आठवीच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी
डॉ. विपीन ईटनकर यांनी जारी केले आहेत. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग कोरोना विषयक
नियमांचं पालन करुन प्रत्यक्ष सुरू राहतील, असं त्यांनी सांगितलं आहे.
****
उस्मानाबाद
इथं जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं काल दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन
करण्यात आलं होतं. माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. सत्तेच्या
बाजूने रहायचं की सत्याच्या बाजूने रहायचं हे प्रत्येक पत्रकाराने ठरवणं आवश्यक असल्याचं
मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
परभणी
शहरात विविध भागांमध्ये कोविड नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिकेतर्फे
दंडात्मक कारवाईची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण १२७ नागरिकांवर मनपा आणि पोलिस
पथकाकडून कारवाई करण्यात आली. नागरीकांनी मास्कचा वापर करावा, आरटीपीसीआर तपासणी करावी
तसचं सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी
केलं आहे.
****
No comments:
Post a Comment