Friday, 7 January 2022

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात कोविड संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचा राज्य सरकारचा विचार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे

·      राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ७९ रुग्णांची नोंद

·      राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ३६ हजार २६५ रुग्ण, मराठवाड्यात एका रुग्णाचा मृत्यू तर ३०३ बाधित

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात आढळलेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून चौकशी समिती स्थापन  

·      गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला, सर्व कारखान्यातल्या ऊस गाळपावर, प्रति टन दहा रुपये प्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय जारी

·      लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारखर्चात वाढ करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय  

·      महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी वैजनाथच्या न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी

आणि

·      दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात गडी राखून विजय  

****

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेऊन संसर्ग रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह मुंबईत या संदर्भातली आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारनं जमावबंदी, कार्यक्रमांवर बंधने आणली, मात्र त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही, त्यामुळे संचारबंदी, रात्रीची संचारबंदी किंवा सप्ताहांत टाळेबंदी, जिल्हाबंदी या सर्व पर्यायांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय तूर्त झालेला नसून, मुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय घेतील, असा त्यांनी पुनरुच्चार केला. प्रत्येक नागरीकानं प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेतलं पाहिजे, असं नमूद करत टोपे म्हणाले

जी चर्चा झाली आणि ज्याच्यावर एकमत झालं १०० टक्के व्हॅक्सिनेशन कसं वाढलं पाहिजे. जे आज साधारण एक सत्तर, ऐंशी लाख लोकांनी अजून एकही व्हॅक्सीन घेतलं नाही. तर त्या लोकांनी व्हॅक्सीन घेतलंच पाहिजे. किंवा जे ड्यू डेट झालेले आहेत आणि सेकंड व्हॅक्सीन घेण्याची आवश्यकता आहे, त्यांनी सेकंड व्हॅक्सीन घेतलं पाहिजे. आता दहा तारखेच्या नंतर कोमॉरबीड आणि सिक्स्टी प्लस जे व्हॅक्सीन देण्याच्या संदर्भात ज्याला प्रिकॉशन व्हॅक्सीन म्हणतो, आपण ते घेतले पाहिजे, या दृष्टीकोनातून सुद्धा पॉलिसी काय आहे, कशी आपण करुन घेणार आहोत, ते पण समजून घेण्याचं काम त्याठिकाणी केलं आहे.

****

कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, अशा सूचना, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. राज्यातली परिस्थिती आणि वैद्यकीय शिक्षण विभाग करत असलेल्या उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत, ते काल मुंबईत बोलत होते. ही महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा, प्राणवायूची उपलब्धता, कृत्रिम जीवन प्रणालींची संख्या यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावं, अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या.

****

राज्यात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ७९ रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांमध्ये मुंबईतले ५७, पुणे जिल्ह्यातले नऊ, नागपूर सहा आणि ठाणे जिल्ह्यातल्या सात रूग्णांचा समावेश आहे, यासह राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या आता ८७६ झाली असून, त्यापैकी ३८१ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३६ हजार २६५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६७ लाख ९३ हजार २९७ झाली आहे. काल १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ५९४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ८ दशांश टक्के झाला आहे. काल आठ हजार ९०७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख ३३ हजार १५४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक १७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १ लाख १४ हजार ८४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३०३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १२८ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या १११, तर ग्रामीण भागातल्या १७ रुग्णांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात ६८, नांदेड ३६, उस्मानाबाद २३, परभणी २१, बीड १२, जालना ११, तर हिंगोली जिल्ह्यात काल चार नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल दिले. जिल्ह्यात काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं, हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यातल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जवाहर नवोदय विद्यालयातले पाच शिक्षक कोरोना विषाणू बाधित आढळून आले आहेत.

नांदेड जिल्ह्यातही पहिली ते आठवीचे वर्ग येत्या ३० जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात आढळलेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं चौकशी समिती स्थापन केली आहे. सुरक्षा सचिव सुधीर कुमार सक्सेना हे या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, याप्रकरणी पंजाब सरकारनं देखील दोन सदस्यांच्या एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. ही समिती येत्या तीन दिवसांत अहवाल सादर करेल, अशी माहिती सरकारनं दिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या त्रुटीबद्दल चिंता व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी त्यांची काल भेट घेऊन त्यांना या संदर्भातली माहिती दिली. आज सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी होणार आहे. जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केली.

****

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला, सर्व सहकारी आणि खासगी कारखान्यातल्या ऊस गाळपावर, प्रति टन दहा रुपये प्रमाणे ऊसतोड कामगार कल्याण निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय, काल जारी करण्यात आला. सहकारी किंवा खाजगी साखर कारखान्यानं ऊस खरेदी केल्यानंतर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त आणि किफायतशीर दर रक्कमेतून एकही रुपया कपात न करता, संबंधित कारखान्यानं त्यांचे नफा-तोटा खाते दर्शवून त्यातून ही रक्कम जमा करावयाची आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा कुठलाही भार सहन करावा लागणार नाही, असं या शासन आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारखर्चात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार खर्चाची कमाल मर्यादा ४० लाख रुपये, तर लोकसभा निवडणुकीसाठी ९५ लाख रुपये करण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण - म्हाडामध्ये भरतीसाठीची परीक्षा आता सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन होणार आहे. म्हाडाच्या सचिवांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. तीन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. सहायक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक-टंकलेखक पदासाठी म्हाडामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. गेल्या महिन्यात पेपर फुटीमुळे ऐनवेळी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ मधल्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. या न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीमध्ये वारंवार जामीन दिल्यानंतरही ते न्यायालयासमोर हजर राहिले नसल्यामुळे, ही कारवाई करण्यात आल्याचं न्यायालयानं सांगितले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी २००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये परिवहन मंडळाच्या बसगाड्यांवर दगडफेक केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आलं असून, पुढची सुनावणी दहा फेब्रुवारी रोजी होणार आहे.

****

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं काल भारतावर सात गडी राखून विजय मिळवला. भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलं होतं. कर्णधार डीन एल्गारच्या नाबाद ९६ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं ते सहज पूर्ण केलं. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साध्य केली आहे.

****

हिंगोलीमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं काल आयोजन करण्यात आलं होतं. हा उपक्रम अभिनंदनीय आणि स्तुत्य असल्याचं सांगत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी, यावेळी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन यावेळी अभिवादन करण्यात आलं.

जालना शहरासह जिल्ह्यातही काल दर्पण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा मराठी पत्रकार संघ, प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र जिल्हा शाखा आणि स्मॉल ॲण्ड मिडियम न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीनं, पत्रकारांचा सत्कार तसंच कोवीड लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.

नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथंही दर्पणदिनानिमित्त तालुक्यातल्या ३० पत्रकारांना गौरण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे होते तर प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊराव मोरे हे होते.

****

परभणी शहरात विविध भागांमध्ये कोविड नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाईची मोहीम राबण्यात आली. यामध्ये एकूण १२७ नागरिकांवर मनपा आणि पोलिस पथकाकडून कारवाई करण्यात आली. नागरीकांनी मास्कचा वापर करावा, आरटीपीसीआर तपासणी करावी तसचं सर्व नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं श्री शाहू महाराज माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांतर्फे कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीराचं काल आयोजन करण्यात आलं होतं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...