Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रव्यापी
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १५० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात
९० लाख ५९ हजार ३६० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५० कोटी ६१
लाख ९२ हजार ९०३ मात्रा देण्यात आल्या आहेत. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या दोन कोटी २३
लाख चार हजार ५८० मुलांचं लसीकरण करण्यात आलं.
दरम्यान,
देशात काल नव्या एक लाख ४१ हजार ९८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २८५
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ४० हजार ८९५ रुग्ण बरे झाले. देशात सध्या
तीन लाख ७२ हजार १६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
केंद्रीय
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आपण गृहविलगीकरणात
असून, आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन दानवे यांनी
ट्विट संदेशाद्वारे यांनी केलं आहे.
****
कोरोनाच्या
तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असली, तरी नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, योग्य ती काळजी
घ्यावी, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. कोविड प्रतिबंधक
नियमांचं पालन करण्यासह लसीकरण करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. ते म्हणाले –
हिंगोली
जिल्ह्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. आज जवळपास
११ पेशंटस् हे पॉझिटीव आलेले आहेत. मात्र याच्यामधली समाधानाची बाब एवढीच आहे की हे
सर्व पेशंटस् बहुतेक असिंम्पटोमॅटीक आहेत. नागरिकांना विनंती आहे की आपण आपला पहिला
डोस तात्काळ घ्यावा, ज्यांचा दुसरा डोस ड्यू झालेला आहे, त्या लोकांनी आपला दुसरा डोस
तात्काळ घेतला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावरती ओमायक्रॉनचा किंवा फार मोठा प्रभाव पडणार
नाही.
****
पाच
राज्यांच्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी
साडे तीन वाजता करणार आहे. यामध्ये गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश
या राज्यांचा समावेश आहे.
****
केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत देशातल्या सार्वजनिक बँकाचे अध्यक्ष
आणि व्यवस्थापकीय संचालकाची आढावा बैठक घेतली. कोरोना साथीमुळे उद्भवलेल्या आर्थिक
संकटावर मात करण्यासाठी बँकांनी राबवलेल्या उपाययोजनांचा सीतारामन यांनी आढावा घेतला,
तसंच कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी काय तयारी केली आहे, याचीही
माहिती त्यांनी घेतली. शेती, शेतकरी, किरकोळ व्यापार क्षेत्र आणि लघु, मध्यम उद्योग
क्षेत्राला पाठबळ देण्याचं काम बँकांनी असंच सुरू ठेवावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त
केली.
****
राज्यातील
महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी
ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल मुंबईत दिली. राजस्थानचे महसूलमंत्री रामलाल
जाट यांनी महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राजस्थानमध्ये ‘ई-गिरदावरी’ या नावानं
स्वीकारला असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राज्यात
सूक्ष्म सिंचन संच बसवणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरता २०० कोटी रुपयाचा
निधी राज्य शासनानं उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल जारी केला असल्याची
माहिती कृषि मंत्री दादा भुसे यांनी दिली. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक
आणि तुषार सिंचन संचाकरता अनुदान दिलं जातं. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च
मर्यादेच्या ५५ टक्के, तर इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ४५ टक्के अनुदान, पाच हेक्टर
कमाल क्षेत्राकरता दिलं जातं.
****
महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेमार्फत गेल्या वर्षी १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीसाठी
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, आणि इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती
परीक्षेचा अंतिम निकाल तसंच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी काल जाहीर
करण्यात आली. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी १४ २५० तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी
दहा हजार ७३६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
****
No comments:
Post a Comment