Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०८ जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही
आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना
कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन
हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा..
मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक
माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ०
७ ५ या वर संपर्क करा..
****
· वैद्यकीय पदव्युत्तर
प्रवेश परीक्षेत ओबीसींना २७ टक्के, तर आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण
लागू करण्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
·
राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहिमेत दीडशे कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार
·
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड प्रतिबंधासंदर्भात
नवीन मार्गदर्शक सूचना जारी
·
कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन न केल्यास,
निर्बंध अधिक कठोर करण्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा
· राज्यात कोविडचे
नवे ४० हजार ९२५ रुग्ण;
मराठवाड्यात ४९३ रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू
· परभणी जिल्ह्यात १५ ते १८ वर्ष वयोगटाच्या लसीकरणासाठी उद्यापासून
११ जानेवारीपर्यंत विशेष मोहीम
· औरंगाबाद शहरात येत्या सोमवारपासून पाच कोविड केंद्र पुन्हा
सुरु करण्यात येणार
· तुळजापूर इथं एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करणार- उद्योग राज्य
मंत्री आदिती तटकरे यांचं आश्वासन
आणि
· ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-२०२०’ जाहीर; महाराष्ट्राला विविध श्रेणीत
एकूण चार पुरस्कार
****
वैद्यकीय पदव्युत्तर
प्रवेश परीक्षा - नीट पीजी मध्ये इतर मागासवर्गीय
- ओबीसींना २७ टक्के, आणि आर्थिकदृष्टया मागास
घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याला, सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे.
सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये, म्हणून ओबीसी
आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण कायम ठेवण्यात येत आहे, तसंच पांडेय समितीच्या
शिफारशी पुढील वर्षापासून लागू करण्यास मंजुरी देत असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटासाठी वार्षिक ८ लाख रुपये उत्पनाच्या मुद्द्यावर येत्या
मार्च मध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतानं
काल दीडशे कोटी लसीकरणाचा टप्पा पार करुन इतिहास घडवला आहे. कोविड लसीकरण सुरू झाल्यानंतर
वर्षभरापेक्षाही कमी काळात देशानं हे उद्दिष्ट गाठलं आहे. गेल्या वर्षी १६ जानेवारीला सुरु
झालेल्या या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ९० टक्के पात्र नागरिकांना लसीची पहिली, तर ६५
टक्के पात्र नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. विश्वातल्या या सर्वात
मोठ्या लसीकरण अभियानात गेल्या वर्षी २१ ऑक्टोबरला २७९ दिवसातच, देशानं कोविड लसीच्या
१०० कोटी मात्रा देण्याचं उद्दिष्ट साध्य केलं होतं.
दरम्यान, दीडशे कोटी लसीकरणाबद्दल पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन करत, या यशाचं
श्रेय देशातले शास्त्रज्ञ, आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी,
लस निर्माते यांना दिलं आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गतीशील नेतृत्व आणि आरोग्य
कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न यांच्या बळावर, दीडशे कोटी मात्रांचा ऐतिहासिक टप्पा पार
केला असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोविड प्रतिबंधासंदर्भात नवीन मार्गदर्शक
सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतात येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस गृहविलगीकरण तर
आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक असून, भारताबाहेर जाणाऱ्या प्रवाशांनी
७२ तासांतल्या आरटीपीसीआरचा बाधित नसल्याचा अहवाल तसंच हा अहवाल खरा असल्याचं प्रतिज्ञापत्र,
सादर करणं बंधनकारक आहे. योग्य सामाजिक अंतर, मास्कचा वापर, यासह इतर नियमांचाही यात
उल्लेख करण्यात आला आहे. ब्रिटनसह सर्व युरोपीय देश, दक्षिण आफ्रिका, चीन, न्यूझीलंड,
हाँगकाँग, कझाकस्थान, केनिया आदी १९ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध अधिक
कठोर करण्यात आले आहेत.
****
कोरोनाविषयक निर्बंध न पाळणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल व्हायला
हवेत, तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असा इशारा,
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते काल जालन्यात बोलत होते. राज्यात लसीकरण
वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, परवा १० तारखेपासून पात्र नागरिकांनी बुस्टर
डोस घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. ज्या ठिकाणी संसर्ग दर २५ ते ३० टक्क्यांपर्यंत
वाढण्याची भीती असेल, त्या ठिकाणच्या शाळा स्थानिक प्रशासनाकडून बंद ठेवण्याचा निर्णय
घेण्यात येत आहे. चित्रपटगृहं, नाट्यगृह, तसंच धार्मिक स्थळांबाबत गरज भासली तर निर्बंध
लावले जातील, मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्याची आवश्यकता टोपे यांनी व्यक्त
केली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४० हजार ९२५ रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६८ लाख ३४ हजार २२२ झाली आहे.
काल २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
६१४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ७
दशांश टक्के झाला आहे. काल १४ हजार २५६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख ४७ हजार ४१० रुग्ण, कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक ८० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १
लाख ४१ हजार ४९२ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
दरम्यान, राज्यात
काल ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
मराठवाड्यात काल ४९३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १८३ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या १५१,
तर ग्रामीण भागातल्या ३२ रुग्णांचा समावेश
आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ८०, लातूर ७७, नांदेड ७४, परभणी २९, जालना २३, बीड
१६, तर हिंगोली जिल्ह्यात काल ११ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
परभणी जिल्ह्यात उद्यापासून ११ जानेवारीपर्यंत प्रत्येक शालेय
मुला - मुलींचं लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या १५ ते १८ वयोगटातील
एक लाख एक हजार आठशे पाच मुला मुलींचं लसीकरण या कालावधीमध्ये करण्यासाठी नियोजन करण्यात
आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी
लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या सौजन्यातून काल राबवण्यात आलेल्या
विशेष लसीकरण मोहिमेत ते बोलत होते. लसीकरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून संक्रमणाला
अटकाव होतो, असं चव्हाण यांनी सांगितलं.
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात येत्या
सोमवारपासून पाच कोविड केंद्र पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे
ही केंद्रं बंद करण्यात आली होती. गृहविलगीकरणातले रुग्ण आणि नागरिकांच्या सोयीसाठी
महानगरपालिका मुख्यालयात वॉर रुम तयार करण्यात आली आहे. यात दहा डॉक्टर सेवा देणार
असून, ते दिवसातून दोन वेळा रुग्णांची चौकशी करणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे
आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या १५ते १८ वयोगटातल्या ३० टक्के मुला मुलींचं
लसीकरण झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी दिली आहे. नागरिकांनी
ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं दिसली तर, जवळच्या केंद्रावर जावून तपासणी करुन घ्यावी
असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येऊन एसटी सुरू करावी, त्यानंतर आपण त्यांच्याशी तात्काळ चर्चा
करू आणि कारवाईबाबतचा निर्णय घेऊ, असं परिवहन मंत्री अनिल
परब यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत
होते. यापूर्वीही एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचे घोषित केलं होतं,
मात्र तरीही कर्मचारी रुजू झाले नाहीत. त्यामुळे सध्या तरी कारवाई
मागे घेतली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद या रेल्वेमार्गासाठी
लवकरात लवकर निधी उपलब्ध करून रेल्वे मार्ग उभारावा या मागणीसाठी, भारतीय जनता पक्षाचे
उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात, परिवहन मंत्री परब यांना
काल निवेदन देण्यात आलं. उस्मानाबाद बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध देण्यात
यावा, ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
****
राज्य परिवहन महामंडळ -एसटीच्या परभणी विभागातून संपावर
गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ६० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. याशिवाय
१४ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून, १३ कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या
आहेत.
****
तुळजापूरच्या विकासाबरोबरच तालुक्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एमआयडीसी स्थापन करण्यासाठी प्रयत्न
केले जातील, अशी माहिती, राज्याच्या उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
त्या काल तुळजापूर इथं बोलत होत्या. एमआयडीसी स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,
उद्योग विभागाचे मंत्री आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही
तटकरे यांनी दिली.
****
‘राष्ट्रीय जल पुरस्कार-२०२०’ काल जाहीर झाले. या पुरस्कारांमध्ये
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकावला असून, महाराष्ट्राला
विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी
गैर शासकीय संस्थांमधून औरंगाबाद इथल्या ग्रामविकास संस्थेला, तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार
जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी
तालुक्यातल्या सुर्डी ग्रामपंचयातीनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. जनतेमध्ये जलजागृतीसंदर्भात
उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल सकाळ वृत्तपत्र समूहाच्या ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्रास,
सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या गुन्हे सिद्धतेचं प्रमाण गेल्या वर्षात
८४ टक्के राहिलं आहे. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी औरंगाबाद शहराच्या गुन्ह्यांबाबत
वार्षिक अहवालासंदर्भात, काल वार्ताहर परिषदेत माहिती दिली. शहरात व्यसनाधीनता तसंच
सायबर गुन्ह्यात वाढ झाली असल्याचं, त्यांनी सांगितलं. जामीनावर सुटलेल्या आरोपींकडून
पुन्हा गुन्हा घडण्याची शक्यता पाहता शहरात प्रिव्हेन्शन सेल - दक्षता कक्ष सुरु करण्यात
येणार असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
****
बीड नगरपरिषदेच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या बचतगटाच्या मॉलचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाच्या महिला
आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते काल झालं. या मॉल मध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, हस्तकला,
शोभेच्या वस्तुंसह इतर विविध उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
****
हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तसंच आखाडा बाळापूर
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. वसंतराव देशमुख यांचं काल हृदयविकारच्या तीव्र
झटक्यानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी कळमनुरी तालुक्यात नांदापूर
इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना सुधाकर तोरणे
यांचं काल नाशिक इथं निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर
आज नाशिक इथं अंत्यसंस्कार होणार आहेत
****
शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी
अजून दोन जणांना नाशिक मधून अटक केली. या दोघांनी उमेदवारांकडून एकेक लाख रुपये घेऊन
त्यांना उत्तीर्ण केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. राज्य परीक्षा परिषदेचे माजी
अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे.
****
मुस्लिम महिलांची मानहानी करणाऱ्या ॲपच्या मुख्य सूत्रधाराला
अटक करण्याची मागणी औरंगाबाद इथल्या विधिज्ञ आसमां शेख यांनी केली आहे. त्या काल औरंगाबाद
इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या प्रकरणात काही लोकांना अटक झाली आहे. मात्र, मुख्य
सूत्रधारला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी शेख यांनी केली.
****
No comments:
Post a Comment