Saturday, 8 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०८ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतानं दीडशे कोटी लसीकरणाचा टप्पा पार करुन इतिहास घडवला आहे. कोविड लसीकरण सुरू झाल्यानंतर वर्षभरापेक्षाही कमी काळात देशानं हे उद्दिष्ट गाठलं आहे. गेल्या वर्षी १६ जानेवारीला सुरु झालेल्या या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ९० टक्के पात्र नागरिकांना लसीची पहिली, तर ६५ टक्के पात्र नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

****

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नियंत्रण कक्ष पुन्हा सुरु करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युक्त अत्याधुनिक सोयींनी सज्ज असे हे नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवावेत असं, आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात येत्या सोमवारपासून पाच कोविड केंद्र पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मेल्ट्रॉन वगळता ही केंद्र बंद करण्यात आली होती. तसंच गृहविलगीकरणातले रुग्ण आणि नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिका मुख्यालयात वॉर रुम तयार करण्यात आली आहे. यात दहा डॉक्टर सेवा देणार असून, ते दिवसातून दोन वेळा रुग्णांशी संपर्क साधून त्यांची विचारपूस करतील, अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी दिली.

****

मराठवाड्यात काल ४९३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १८३ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या १५१, तर ग्रामीण भागातल्या ३२ रुग्णांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ८०, लातूर ७७, नांदेड ७४, परभणी २९, जालना २३, बीड १६, तर हिंगोली जिल्ह्यात काल ११ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

धुळे शहरासह जिल्ह्यात काल रात्री गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...