Sunday, 9 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 09.01.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      उद्यापासून लागू होणाऱ्या कोविड-१९ विषयक निर्बंधांच्या आदेशात अंशत: सुधारणा.

·      कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांची बैठक.

·      दिव्यांग कर्मचारी आणि गर्भवती महिलांनी घरुन काम करण्याचे निर्देश.

आणि

·      बीड जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू, तेरा जण गंभीर जखमी.

****

राज्य शासनातर्फे उद्यापासून लागू होणाऱ्या कोविड-19 विषयक निर्बंधांच्या आदेशात अंशत: सुधारणा झाल्यानं आता ब्युटी सलून आणि व्यायाम शाळांना ५० टक्के क्षमतेनं, मास्क वापरून आणि पूर्ण लसीकरण झालेल्यांमार्फतच सेवा देता येणार आहे. ब्युटी सलूनचा समावेश “केश कर्तनालय” या गटात करण्यात येईल. संबंधीत ठिकाणी फक्त मास्क काढण्याची गरज नसलेल्याच सेवा देण्यास मुभा असेल. जिम अर्थात व्यायामशाळेतही मास्क लावणं बंधनकारक असेल. या दोन्ही अंतर्गत येणाऱ्या सेवांचा लाभ केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच घेता येईल.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून एका बैठकीत त्यांनी हा आढावा घेतला. आरोग्य मंत्री, गृहमंत्री, तसंच कॅबीनेट सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले.

****

देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणांतर्गत या विषाणूविरुद्ध प्रभावी ठरणाऱ्या ‘बूस्टर डोस’ अर्थात वर्धक मात्रा देण्यास उद्यापासून प्रारंभ होत आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन-अग्रक्रम कार्मचारी आणि साठ वर्ष वयांवरच्या सह-व्याधी असलेल्या अशा व्यक्तिंना डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि दोन्ही मात्रा घेऊन नऊ महिने किंवा ३९ आठवडे झालेल्यांनाच उद्यापासून ही वर्धक मात्रा देता येणार आहे. मात्रा घेण्यासाठी नव्या नोंदणीची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधे स्पष्ट केलं आहे. याआधी ज्या लसीच्या मात्रा घेतल्या आहेत तिचीच मात्रा म्हणजे वर्धक मात्रा असेल. पात्र नागरिकांचं लसीकरण कोणत्याही केंद्रावर होऊ शकतं.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर केंद्र सरकारनं दिव्यांग कर्मचारी आणि गर्भवतींना कार्यालयात येण्यापासून सुट दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. दिव्यांग कर्मचारी आणि गर्भवतींनी घरुनच काम करण्यासंदर्भातले निर्देश देण्यात आले आहेत. या संसर्गाविरुद्धच्या लढाईला यामुळं आणखी बळ मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रीया अर्थात ‘एन.इ.इ.टी २०२१ काउन्सिलिंग’ येत्या बुधवारपासून सुरु होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातल्या एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या याबाबतच्या आदेशानंतर ही प्रवेश प्रक्रीया सुरु होत आहे. या निर्णयामुळं निवासी डॉक्टरांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होईल आणि रुग्णांवरच्या उपचाराला बळ मिळेल, असं डॉ. मांडविया यांनी म्हटलं आहे. 

                                ****

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवासी देशवासी, विदेशात असलेल्या तसंच अनिवासी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रवासी भारतीय दिवसाच्या सर्वांना, विशेषत: अनिवासी भारतीयांना शुभेच्छा. आपल्या अनिवासी भारतीयांनी जगभरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच वेळी, ते त्यांच्या मुळाशी जोडलेले आहेत. आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर फाट्याजवळ आज राज्य परिवहन महामंडळाची बस आणि ट्रक दरम्यान भीषण अपघातात सहा जण जागीच मृत्यूमुखी पडले तर तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास दोन्ही वाहनं समोरासमोर धडकून ही दुर्घटना झाली. अपघात येवढा भीषण होता की धडकेमुळं एकमेकांत अडकलेली दोन्ही वाहनं क्रेनच्या सहाय्यानं वेगळी करून जखमींना बाहेर काढावं लागलं. जखमींवर बर्दापूर इथं आणि अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातग्रस्त बस लातूरहून औरंगाबादला येत होती. अपघाताचं निश्चित कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे येत्या १४ जानेवारी रोजी मकर सक्रांती निमित्त जागतिक स्तरावर सुर्यनमस्कार आसनाच्या प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात सुमारे ७५ लाख नागरिक सहभागी होणार आहेत. जलवायू परिवर्तन आणि जागतिक तापमान वाढ याबाबत जागरुकतेचा या आयोजना मागचा उद्देश आहे. तसंच, सूर्यनमस्काराच्या माध्यमातून प्राणीमात्रांसाठी ऊर्जेचा अविभाज्य स्त्रोत असलेल्या सुर्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत मन-शरीर यांचा समन्वय साधणाऱ्या या आसनाचं महत्व अधोरेखीत होणार आहे.

****

रोहन बोपन्ना आणि रामकुमार रामनाथन यांच्या बिगरमानांकित जोडीनं ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं दुहेरीतलं विजेतेपद पटकवलं आहे. या भारतीय जोडीनं अंतिम फेरीच्या सामन्यात प्रथम मानांकित इवान डोडिग आणि मार्सेलो मेला यांच्या जोडीला सात - सहा, सहा एक असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. हे बोपन्नाचं एटीपीमध्ये दुहेरीतलं विसावं विजेतेपद आहे तर रामकुमारनं पटकवलेलं पहिलं विजेतेपद आहे. या जोडीनं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित जोडी टोमिस्लाव ब्रिकिक आणि सैंटियागो गोंजालेजच्या जोडीचा सरळ सेटमध्ये सहा - दोन, सहा - चार असा पराभव केला.

                                    ****

अमरावती जिल्ह्यात निमगव्हाण गावाजवळ कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांची पोलिसांनी सुटका केली आहे. त्यांची वाहतुक करणाऱ्या पाच जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे उंट गुजरातमधल्या कच्छ इथून वाहनात कोंबून हैदराबादला नेले जात होते, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. प्राण्यांसाठी कार्यरत एका संस्थेनं या संदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. उंटांना हिंगणगाव इथं एका शेतात ठेवण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...