Monday, 10 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

देशातले आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या कोविड योद्ध्यांना तसंच सहव्याधी असणाऱ्या ६० वर्षांच्या पुढील नागरिकांना आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस दिला जात आहे. यासाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची गरज नसल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. लसीची दुसरी मात्रा घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्यांना बुस्टर डोस घेता येईल; आधीच्या दोन मात्रा ज्या लसीच्या असतील त्याच लसीचा डोस दिला जाणार आहे.

आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कोविड योद्ध्यांना प्राधान्यानं अतिरिक्त सुरक्षा कवच देण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्री मांडविया आज चार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या आरोग्य मत्र्यांची बैठक घेणार आहेत. महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा आणि दादरा नगर हवेली तसंच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा यात समावेश आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात आढळलेल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीसंदर्भात, सर्वोच्च न्यायालय स्वत: एक तपास समिती स्थापन करणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, केंद्र आणि पंजाब सरकारने स्थापन केलेल्या समित्या कोणताही तपास करणार नाहीत, असं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत, चंदीगढचे पोलिस महासंचालक, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पोलिस महानिरीक्षक, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे महालेखापाल आणि पंजाबचे अतिरिक्त पोलिस महासंचालक असतील, असं न्यायालयानं सांगितलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २९ लाख ६० हजार ९७५ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५१ कोटी ९४ लाख पाच हजार ९५१ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या एक लाख ७९ हजार ७२३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ८३ हजार ९३६ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. काल ४६ हजार ५६९ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४५ लाख १७२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सात लाख २३ हजार ६१९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

डेल्टा आणि ओमायक्रॉन विषाणू एकत्र होऊन कोविड-19 चा एक नवा प्रकार सायप्रस देशात आढळून आला आहे. सायप्रस विद्यापीठातील जैविक विज्ञान प्राध्यापक लिओन डिओस कोस्ट्रि किस यांनी ओमायक्रॉन आणि डेल्टा प्रकाराचा सह-संसर्ग झाल्याचं सध्या आढळून आल्याचं म्हटलं आहे. या नव्या प्रकाराला “डेल्टाक्रॉन” असं नाव देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयं चालवणाऱ्या छोट्या धर्मादाय न्यासांसाठी अनुपालन भार कमी करण्यासाठी वित्त कायदा २०२१ द्वारे कर सवलत देऊन दिलासा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. याअंतर्गत अशा विश्वस्त मंडळांसाठी वार्षिक प्राप्तीची सध्याची एक कोटी रुपयांची मर्यादा पाच कोटी रुपये करण्यात आली आहे.

****

डिसेंबर २०२१ मध्ये जन धन बँक खात्यांमधील ठेवींनी एक लाख ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२१ अखेरीस ४४ कोटींहून अधिक प्रधानमंत्री जन धन खात्यांमध्ये, एकूण एक लाख ५० हजार ९३९ कोटी रुपये जमा झाले आहेत.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा आणि शेवटचा कसोटी क्रिकेट सामना उद्यापासून केपटाऊन इथं खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहे. भारतीय क्रिकेट संघानं या कसोटीसाठी तयारी सुरू केली आहे.

****

चेन्नई इथला चौदा वर्षीय भरत सुब्रमण्यम हा भारताचा ७३ वा ग्रँडमास्टर ठरला आहे. त्यामुळे आता इटलीमधल्या खुल्या व्हर्गानी चषक स्पर्धेसाठी आवश्यक असलेली दोन हजार ५०० ची मानांकन श्रेणी भरतनं पार केली असल्याचं, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघानं म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, जवळा पांचाळ, दांडेगावसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने हरभरा, गहू पिकांचं नुकसान झालं आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात काही ठिकाणी आणि कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...