Tuesday, 11 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ९२ लाख सात हजार ७०० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५२ कोटी ८९ लाख ७० हजार २९४ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत नऊ लाख ८४ हजार ६७६ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे. 

दरम्यान, देशात काल नव्या एक लाख ६८ हजार ६३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ५८ लाख ७५ हजार ७९० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४८ हजार २१३ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. काल ६९ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४५ लाख ७० हजार १३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, आठ लाख २१ हजार ४४६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

****

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातल्या इतर काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रत्यक्ष उपस्थितीत शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. इयत्ता दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

****

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. शास्त्रीजींचं असामान्य व्यक्तिमत्त्व युवा पिढीला प्रेरणा देणारं असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

****

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल कांद्याची विक्रमी आवक झाली. सुमारे एक हजार ५४ ट्रक कांदा आल्यामुळे तो ठेवायलाही जागा नसल्यानं बाजार समितीच्या बाहेर कांदा उतरावा लागला. बाजार समितीच्या इतिहासातील ही उच्चांकी आवक असल्याचं सांगण्यात आलं. कांद्याच्या या लिलावातून एकाच दिवसात १६ कोटी ८६ लाख ४१ हजार ६०० रुपयांची उलाढाल झाली. कांद्याची विक्रमी आवक झाली असली तरी दरात किंचितशी घट नोंदवण्यात आली. सोलापूरसह बीड, नांदेड, पुणे, उस्मानाबाद, लातूर, सांगली, अहमदनगर आणि कर्नाटकातल्या विजयपूर आणि कलबुर्गी आदी ठिकाणाहून कांद्याची आवक झाली.

****

कोल्हापूर विमानतळावरुन कार्गो वाहतूक सेवेसाठी भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरो - बीसीएएस नं मान्यता दिली आहे. कोल्हापूर विमानतळाहून कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी मिळाल्यामुळे जिल्ह्यातले उद्योजक आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर स्थानिक उद्योगांना, शेती आणि शेतीपूरक उत्पादनाला उत्तेजन मिळेल असा विश्वास पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

****

अमरावती जिल्ह्यातल्या ग्रमीण भागात रात्रपाळीत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अधिक सजगपणे आपलं कर्तव्य पार पाडावं म्हणून पोलिसांना रात्रीच्या वेळी गस्तीवर गेल्यानंतर आता महत्वाच्या चौकात आणि ठिकाणी लागलेला ‘क्यूआर कोड’ आपआपल्या मोबाइलमध्ये स्कॅन करावा लागणार आहे. अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे पोलिसांचा वावर वाढण्यासाठी मदत होईल तसंच पोलिस नेमके कोणत्या ठिकाणी किती वाजता कर्तव्य बजावत होते, हे सुद्धा तंतोतंत माहीत होणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतला लोकसेवक रामदास लोहकरे याला दहा हजार रुपये लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. तक्रारदार आणि त्यांच्या मुलाचा पैठण इथल्या सरकारी दवाखान्यातील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा कंत्राटी कामाचा पगार काढण्यासाठी त्यानं २३ हजार रुपये लाच मागितली होती, त्यापैकी दहा हजार रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आलं.

****

इगतपुरी-भुसावळ मेमू एक्स्प्रेसला कालपासून प्रारंभ झाला. मनमाड जंक्शन तसंच नाशिकरोड रेल्वे स्थानकांत या रेल्वे गाडीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ही गाडी सुरू झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून प्रवास करणारे चाकरमानी आणि प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

****

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आजपासून केपटाऊन इथं खेळला जाणार आहे. दोन्ही संघ प्रत्येकी एका विजयासह मालिकेत सध्या बरोबरीत आहेत. कर्णधार विराट कोहली दुखापतीतून बरा झाल्यानं, या सामन्यात खेळू शकणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...