Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१० जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
देशाच्या अनेक भागात पुन्हा एकदा कोविडचा वेगानं प्रसार होत
आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८
वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस
घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप
चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क
वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा.
कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ -
२३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
· कोविड-१९ चे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या
भागांमधे कडक प्रतिबंध आणि सर्तकता कायम ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश
· कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक वर्धक मात्रा देण्यास आजपासून प्रारंभ
· कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य
सरकारनं लागू केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू, व्यायामशाळा आणि, सौंदर्य प्रसाधनगृहं ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यास
परवानगी
· राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या २०७ रुग्णांची नोंद, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाच तर औरंगाबाद, जालना आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा
समावेश
· राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४४ हजार ३८८ रुग्ण, मराठवाड्यात एकाचा मृत्यू तर ६२९ बाधित
· परभणी आणि
नांदेड जिल्ह्याच्या २०२२-२३ यावर्षाच्या आर्थिक प्रारूप आराखड्यास मंजुरी
आणि
· अंबाजोगाईजवळ राज्य परीवहन महामंडळाची बस
आणि ट्रक दरम्यान झालेल्या अपघातात चार जण ठार
****
कोविड-१९ चे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या
भागांमधे कडक प्रतिबंध आणि सर्तकता कायम ठेवण्याचे, तसंच रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना आवश्यक तांत्रिक
पाठबळ पुरवण्याचे निर्देश, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. देशातल्या वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या
पार्श्वभूमीवर एकंदर कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल ऑनलाईन बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यनिहाय स्थितीचा आढावा घेण्यासाठी
मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी, त्यात चांगल्या उपाययोजना
आणि लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद याबद्दल चर्चा करता येईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
सध्या कोविड परिस्थिती हाताळतांना इतर आरोग्य सेवाही सुरळित राहतील, याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दुर्गम आणि ग्रामीण
भागातल्या लोकांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी, टेलीमेडिसिनचा उपयोग करुन घ्यावा, असं ते म्हणाले. जिल्हा
पातळीवर पुरेशा आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध असतील, याची
काळजी घेतली पाहिजे, याबाबतीत राज्यांशी समन्वय राखण्याचे
निर्देश पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना
दिले. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्य
मंत्री मनसुख मांडविय, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविय आज सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत
संवाद साधणार आहेत.
****
देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक
लसीकरणांतर्गत या विषाणूविरुद्ध प्रभावी ठरणाऱ्या वर्धक - बूस्टर मात्रा देण्यास आजपासून प्रारंभ होत
आहे. आरोग्य कर्मचारी, रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणारे कर्मचारी, आणि साठ वर्ष वयांवरच्या सह-व्याधी
असलेल्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं, आणि दोन्ही मात्रा घेऊन
नऊ महिने किंवा ३९ आठवडे झालेल्यांनाच, ही वर्धक मात्रा देता
येणार आहे. मात्रा घेण्यासाठी नव्या नोंदणीची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं
जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधे स्पष्ट केलं आहे. याआधी ज्या लसीच्या मात्रा
घेतल्या आहेत, तिच लस वर्धक मात्रा म्हणून
दिली जाईल. पात्र नागरिकांचं लसीकरण कोणत्याही केंद्रावर होऊ शकतं.
****
राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आजपासून लागू केलेल्या निर्बंधांमध्ये, अंशतः सुधारणा करत, व्यायामशाळा आणि, सौंदर्य प्रसाधनगृहं सुरू ठेवण्यास
परवानगी दिली आहे. ५० टक्के क्षमतेनं ती सुरू
ठेवता येणार आहेत. केशकर्तनालयं, मॉल्स,
बाजार संकुलं यांना ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यासाठी याआधी
दिलेली परवानगी कायम आहे. मात्र, त्यासाठी सरकारनं दिलेल्या
नियमांचं पालन करावं लागेल. जलतरण तलाव, मनोरंजन उद्यानं,
प्राणी संग्रहालय, वस्तु संग्रहालयं, किल्ले, स्थानिक पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद राहतील.
पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील.
या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. रात्री ११ ते
पहाटे पाच या वेळेत अत्यावशक सेवा वगळता कोणालाही बाहेर
फिरता येणार नाही. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींना, तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल. सामाजिक,
धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना
कमाल ५० जण उपस्थित राहू शकतील. शाळा, महाविद्यालयं १५
फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. यात केवळ राज्य मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या
१० वी १२ वीच्या परीक्षा, तसंच इतर सरकार किंवा शैक्षणिक विभागांकडून घेतल्या
जाणाऱ्या कार्यक्रमांना, नियोजित कृती कार्यक्रमांना
अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या
पार्श्र्वभूमीवर, केंद्र सरकारनं
दिव्यांग कर्मचारी आणि गर्भवतींना कार्यालयात येण्यापासून सवलत दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी
ही माहिती दिली. या संसर्गाविरुद्धच्या लढाईला यामुळे आणखी
बळ मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या २०७
रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मराठवाड्यातल्या
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पाच तर औरंगाबाद,
जालना आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा
समावेश आहे. याशिवाय या रुग्णांमध्ये सांगलीतले ५७, मुंबईतले ४०, पुणे महापालिका हद्दीतले
२२, नागपूर २१, पिंपरी चिंचवड
महापालिका १५, ठाणे १२, कोल्हापूर आठ,
अमरावती सहा, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातल्या
प्रत्येकी चार, गोंदिया तीन, नंदुरबार, सातारा आणि गडचिरोली
जिल्ह्यातले प्रत्येकी दोन तसंच मीरा भाईंदरमधल्या एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन
बाधित रुग्णांची एकूण संख्या आता एक हजार २१६ एवढी झाली असून, त्यापैकी ४५४ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
जालना जिल्ह्यात आढळलेला एक रुग्ण हा एक जानेवारीला दुबई इथून
आला होता. तर उस्मानाबाद इथं आढळलेल्या पाचही रुग्णांचा विलगीकरण कालावधी संपलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४४ हजार ३८८ रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६९ लाख २० हजार ४४ झाली आहे. काल
१२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
६३९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. काल १५
हजार ३५१ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६५ लाख ७२ हजार ४३२ रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ९८ शतांश
टक्के झाला आहे. राज्यात सध्या २ लाख दोन हजार २५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ६२९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर लातूर
जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल २३४ नवे रुग्ण आढळले. नांदेड १४७, लातूर
१०८, परभणी ४६, जालना ३५, बीड ३२, उस्मानाबाद २३, तर हिंगोली जिल्ह्यात काल चार नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात होणाऱ्या गर्दीवर
नियंत्रण ठेवण्याकरता, प्रत्येक तालुक्यात एक, या प्रमाणे नऊ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली आहे. या पथकांद्वारे गर्दीच्या
ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार असून, नियमांचं उल्लंघन
करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना लसीकरण
करुन घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रीया अर्थात- नीट पीजी २०२१ समुपदेशन, येत्या बुधवारपासून सुरु होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख
मांडविया यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातल्या एका संदेशाद्वारे ही माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या याबाबतच्या आदेशानंतर ही प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. या निर्णयामुळे निवासी डॉक्टरांवर
पडणारा अतिरिक्त ताण कमी होईल आणि रुग्णांवरच्या उपचाराला बळ मिळेल, असं डॉ. मांडविया यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारीला,
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. या महोत्सवात देशवासीयांनी हिरिरीनं सहभागी व्हावं,
असं आवाहन, केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरद्वारे केलं आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान भाषण करणार असून, त्याकरता देशभरातल्या युवकांनी आपापल्या सूचना
आणि अभिनव कल्पना मांडाव्यात, असं ठाकूर यांनी सुचवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं रेल्वेच्या उड्डाणपुलाचं
लोकार्पण काल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून मराठवाड्यातील कामांचा अनुशेष भरून काढण्यावर आपला भर असल्याचं चव्हाण यांनी
यावेळी सांगितलं. परभणी जिल्ह्यासाठी विशेष प्राधान्य देत
अंदाजे ४१ कोटी रुपयांची प्रगतीपथावर असलेली विविध ४५५ कामं लवकरच पूर्ण होणार
असल्याचं त्यांनी सांगितलं. पालम ते फळा, राव राजूर ते वझूर, गंगाखेड
तालुक्यातील कवडगाव, सायाळा- सुनेगाव या ठिकाणच्या विकास
कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं
पाठवावे, त्यास मंजुरी देऊन ते काम लवकरच सुरु करता येईल, अशा सूचना, चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
****
परभणी
जिल्ह्याच्या २०२२-२३ यावर्षाच्या आर्थिक योजनेतंर्गत, विविध
योजनासांठी जवळपास २४८ कोटी रुपये खर्चाच्या प्रारुप आराखड्यास काल मंजुरी देण्यात आली. दूरदृश्य प्रणालीद्वारे
पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या
बैठकीत, ही मंजुरी देण्यात आली. या बैठकीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्यांच्या परिसराचं सुशोभिकरण, महापालिका उद्यानातील
विकास कामं, शहरातील वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमण हटवणं
यासंदर्भात चर्चा झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वारंवार रोहित्र बंद
पडण्याबाबतच्या तक्रारी, तसंच वीज देयक भरणाअभावी वीज पुरवठा खंडित होणं, याबाबत, तसंच मुंबईच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयासारखं परभणी इथं रुग्णालय सुरु करणं,
यांवर चर्चा झाली.
****
नांदेड जिल्ह्याच्या
२०२२-२३ वर्षासाठीच्या ५१२ कोटी रुपयांच्या
प्रारुप आराखड्यासही काल मान्यता देण्यात आली. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. जिल्ह्यात पशुंच्या संख्येचे निकष ठरवून पशुवैद्यकीय
दवाखाने उभारणी - अद्ययावत करण्यावर भर द्यावा, यासह जिल्ह्यातल्या जुन्या-मोडकळीस आलेल्या शाळांचं बांधकाम प्राध्यान्यानं करण्याचे निर्देश, पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा आजपासून सुरू होणारा शाकंभरी नवरात्र महोत्सव कोविड प्रतिबंधक निर्बंधांमुळे साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे, मंदिर समितीन कळवलं आहे. १८
जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर
फाट्याजवळ काल राज्य परीवहन महामंडळाची बस आणि ट्रक दरम्यान झालेल्या अपघातात चार जण जागीच मृत्यूमुखी पडले तर तेरा जण
गंभीर जखमी झाले. काल सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास दोन्ही वाहनं समोरासमोर
धडकून ही दुर्घटना झाली. अपघात येवढा भीषण होता, की धडकेमुळे
एकमेकात अडकलेली दोन्ही वाहनं क्रेनच्या सहाय्यानं वेगळी करून जखमींना बाहेर काढावं
लागलं. जखमींवर बर्दापूर इथं आणि अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात
उपचार करण्यात येत आहेत. अपघातग्रस्त बस लातूरहून औरंगाबादला येत होती. बसचे
वाहक चंद्रशेखर पाटील, आणि प्रवासी नलिनी देशमुख हे औरंगाबाद इथले तर
तिसरा मृत आदिल शेख हा अंबाजोगाईचा तर औथा मृत मोहमद सादिक नवाब पटेल हा लातूरचा रहिवाशी
आहे.
****
उस्मानाबाद इथल्या मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे दिले जाणारे पुरस्कार काल जाहीर झाले. १९ वर्षांखालील भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झालेला खेळाडू राजवर्धन हंगरगेकर, याला
मेहनतीसाठी प्रोत्साहीत करणाऱ्या, त्याची आई अनिता हंगरगेकर
यांची, राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ३० किलोमिटर समुद्री जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या श्रावणी
रणखांब हिला, स्वराज्य संकल्पक
शहाजीराजे क्रीडा भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, सामाजिक-
आर्थिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चाईल्ड लाइन संस्थेच्या संचालिका डॉक्टर वसुधा
दापके यांना, राजर्षी शाहू समाजभूषण पुरस्कार, सुवर्णा शिनगारे यांना शिक्षण क्षेत्रासाठीचा कर्मवीर मामासाहेब जगदाळे
शिक्षकरत्न पुरस्कार, तर डॉक्टर विशाल वडगावकर यांना, विशेष सेवा कार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा उद्योजक पुरस्कार प्रवीण
माळी आणि अजित भोरे यांना देण्यात येणार आहे.
****
शिख पंथाचे दहावे गुरू श्री गोविंदसिंघजी
यांच्या जयंती निमित्त काल नांदेड शहरातल्या सचखंड गुरूद्वारात कोविड नियमाचं
पालन करत विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शब्दकिर्तन, पाठपठण,
लंगर आदि कार्यक्रम यामध्ये पार पडले. गुरूद्वारा परिसरात रोषणाईही करण्यात आली होती.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही श्री गुरू गोबिंद सिंघजी अध्यासन
संकुलाच्या वतीनं श्री गोविंदसिंघजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment