Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
११ जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
देशाच्या अनेक भागात पुन्हा एकदा कोविडचा वेगानं प्रसार होत
आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८
वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस
घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप
चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क
वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा.
कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ -
२३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
· राज्यात कोविडची तिसरी लाट, जानेवारीच्या अखेरीस सर्वोच्च रुग्णसंख्या समोर
येण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त
· आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या कोविड योद्ध्यांना तसंच सहव्याधी
असणाऱ्या ६० वर्षांच्या पुढील नागरिकांना, कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस देण्यास प्रारंभ
· राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ३१ रुग्णांची नोंद, कोविड
संसर्ग झालेले ३३ हजार ४७० रुग्ण. मराठवाड्यातही ८७३ बाधित
· प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी
तातडीनं कामावर रूजू होण्याचं
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं आवाहन
· सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पुरव आणि साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार
· राज्यात आणखी चार - पाच महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
आणि
· भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून
तिसरा आणि अखेरचा कसोटी क्रिकेट सामना
****
राज्यात कोविडची तिसरी लाट आलेली असून, दररोज ४० हजारावर नवे रुग्ण आढळत आहेत.
जानेवारीच्या अखेरीस या लाटेत सर्वोच्च रुग्णसंख्या समोर येईल,
अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. कोविड रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री
मनसुख मांडविया यांनी काल
महाराष्ट्रासह सहा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सार्वजनिक आरोग्य
यंत्रणेची तयारी, आणि राष्ट्रीय लसीकरण मोहिमेतल्या प्रगतीचा
आढावा घेतला, या बैठकीसंदर्भात टोपे यांनी वार्ताहरांना माहिती दिली. रुग्ण संख्या वाढत असली तरीही, आरोग्य यंत्रणेवर कोणताही
ताण आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात मोठ्या
प्रमाणावर लोक गृहविलगीकरणात असून, अशा लोकांना घरपोहोच उपचाराचं कीट दिलं जाईल, अशी
माहिती त्यांनी दिली. राज्यात कोविड प्रतिबंधासाठी नव्यानं लावलेल्या
निर्बंधांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं, आणि या निर्बंधांचं
पालन करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांनी या बैठकीत,
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा
नियमित आढावा घ्यावा, प्रत्येक जिल्ह्यात टेली कन्सलटेशन
सुरु करावं, आणि आरोग्यविषयक सेवांबाबत व्यापक जनजागृतीवर भर
द्यावा, असा सल्ला दिला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात,
गोवा, दादरा-नगर हवेली आणि दिवदमण इथल्या
कोविड परिस्थितीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचं प्रमाण अत्यंत कमी असल्याबद्दल
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
****
देशातले आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या कोविड योद्ध्यांना तसंच
सहव्याधी असणाऱ्या ६० वर्षांच्या पुढील नागरिकांना, कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर
डोस देण्यास, कालपासून सुरवात झाली. मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात काल सकाळी वैद्यकीय
शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत, या प्रतिबंधात्मक मात्रा लसीकरण मोहिमेचा
प्रारंभ झाला. कोविड प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा घेतल्यापासून नऊ महिने, किंवा
३९ आठवडे पूर्ण झाल्यानंतर, बूस्टर डोस दिला जाणार आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
यांनी काल वांद्रे कुर्ला संकुलातल्या जंबो कोविड केंद्रात प्रतिबंधात्मक तिसरी मात्रा
घेतली. काल सायंकाळपर्यंत देशभरात साडे नऊ लाख जणांनी तर राज्यातल्या ४८ हजार जणांनी
बूस्टर डोस घेतला आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ३१ रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण
पुणे जिल्ह्यातले आहेत. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण
संख्या आता एक हजार २४७ झाली असून, त्यापैकी
४६७ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३३ हजार ४७० रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६९ लाख ५३ हजार ५१४ झाली आहे.
काल आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
६४७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. काल २९
हजार ६७१ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६६ लाख २ हजार १०३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २ लाख सहा हजार ४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ८७३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद
जिल्ह्यात ३१७ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या २७६ तर
ग्रामीण भागातल्या ४१ रुग्णांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात १६४, लातूर १५५, उस्मानाबाद १०४,
परभणी ६८, जालना ३७, बीड
१६, तर हिंगोली जिल्ह्यात काल १२ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी
तातडीने कामावर रूजू व्हावं, असं आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांनी केलं आहे. पवार यांनी काल परिवहन मंत्री तथा एसटी
महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्यासोबत, एसटी कामगार संघटनांच्या
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत
होते. आतापर्यंत ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली
नाही, असे सुमारे ५० हजार कर्मचारी कामावर रूजू झाल्यास,
त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर
बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या
बाबतीतही, एसटी वाहतुक सुरळीत झाल्यानंतर सकारात्मक विचार करू,
असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मगणीसाठी संपावर
ठाम असल्याचं कामगार संघटनेचे सतीश मेटकरी यांनी सांगितलं.
****
अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचे २०२१ चे साहित्य
आणि समाजकार्य पुरस्कार काल जाहीर झाले. समाजकार्यासाठी प्रेमाताई पुरव यांना, तर साहित्यासाठी नरेंद्र चपळगावकर यांना
जीवनगौरव पुरस्कार, जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पर्यावरणविषयक
वाङमय पुरस्कार संतोष शिंत्रे यांना मिळाला आहे. १ लाख रुपये आणि स्मृतिचिन्हं असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे. ललित ग्रंथ पुरस्कार दगडी मक्ता या कांदबरीसाठी रमेश अंधारे यांना, सिसिलिया कार्व्हलो यांना ‘टिपंवणी’ या आत्मकथनासाठी, अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, तर मुक्ता बाम यांना,
‘रा. शं. दातार नाट्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि
स्मृतिचिन्हं असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती
लक्षात घेता गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही पुरस्कार वितरण समारंभ होणार नसल्याचं
महाराष्ट्र फाऊंडेशननं स्पष्टं केलं आहे.
****
राज्यात अजून चार ते पाच महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुका होणार नसल्याचं, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते काल
कोल्हापूर इथं बोलत होते. इतर मागासवर्गीय - ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने सांख्यिकी
अहवाल तयार करण्यासाठी मागास आयोगाला निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करुन दिलं असून, अहवाल
आल्यानंतरच ओबीसी आरक्षणावर निर्णय होईल, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
होणार नसल्याचं मुश्रीफ म्हणाले.
****
प्रत्येक शाळेसाठी ग्रंथालय निधी म्हणून २५ हजार रुपये देणार
असल्याचं, शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जाहीर केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा
तालुक्यात सुहागण इथल्या छत्रपती संभाजी विद्यालयाला भेट दिल्यानंतर ते काल बोलत होते.
शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण तत्परतेनं हजर असून, टप्पा अनुदान वाढीसाठी तसंच
अनुदानित कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं,
काळे यांनी सांगितलं.
****
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोविड
प्रतिबंधासाठी नवी नियमावली लागू केली आहे. या नव्या नियमावलीनुसार पर्यटनस्थळं पुढील
आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. या निर्देशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व ऐतिहासिक
वास्तू आणि लेण्या बंद करण्यात आल्या आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे औरंगाबाद
परिक्षेत्राचे अधिक्षक मिलनकुमार चौले यांनी ही माहिती दिली.
****
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल कोरोना विषाणू
प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेतला. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या कोविड
योद्ध्यांना तसंच सहव्याधी असणाऱ्या ६० वर्षांच्या पुढील नागरिकांना लसीचा तिसरा डोस
घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
आपलं कुटुंब सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करून घेण्याचं आवाहन,
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. नागरिकांनी गर्दी टाळावी,
मास्कचा वापर करावा, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सर्व आस्थापनांनी आपल्या आस्थापनेचे दर्शनी भागातले फलक
मराठी भाषेत लावावेत, तसंच १४ ते २८ जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
करावा, असं आवाहन, कामगार अधिकारी वि.नं.माणगांवकर यांनी केलं आहे. शहरातल्या सर्व
आस्थापनांनी शासन निर्णय आणि परिपत्रकाचं काटेकोरपणे पालन करण्यास त्यांनी सांगितलं
आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी
नवरात्र महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. सात दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर काल पहाटे
तुळजाभवानी देवी सिंहासनारूढ झाली. शाकंभरी देवीच्या प्रतिमांचं पूजन करून काल दुपारी
घटस्थापना करण्यात आली. यंदा १० ते १८ जानेवारी दरम्यान कोविड प्रतिबंधक निर्बंधांमुळे
शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव नगर पंचायतीच्या तीन जागांसाठी काल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं
आता १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माहूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या
राहिलेल्या चार प्रभागांसाठी २१, तर अर्धापूर नगरपंचायतीच्या चार जागांसाठी २५ उमेदवारांमध्ये
लढत होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या सोयीसाठी अंबाजोगाई
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं, माजलगाव, परळी आणि केज इथं शिबीर कार्यालय
सुरु करण्यात येत आहे. हे शिबीर कार्यालय, महिन्यातून दोन वेळा माजलगाव, केज आणि परळी
इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह आवारात भरवलं जाणार आहे. नागरिकांनी
वाहन चालक परवान्याच्या चाचणीसाठी पूर्वपरवानगी घेऊन कागदपत्रासह शिबीर कार्यालयात
उपस्थित राहण्याचं आवाहन, उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात महाआवास अभियानांतर्गत आवास योजनेची अंमलबजावणी
प्रभावीपणे करण्यासाठी, सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी
दिले आहेत. महाआवास अभियान-दोन कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. कमी
किंमतीतही घर बांधता येतं, हा विश्वास ग्रामीण भागातल्या नागरिकांना देण्यासाठी, प्रशासनाकडून
भोकर आणि मुखेड तहसील कार्यालय परिसरात घरांचा नमुना तयार करण्यात आला आहे. या दोन्ही
घरांचं उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते काल ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं.
****
जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २९१ कोटी ६१ लाख ७९ हजार
रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या
अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून काल जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.
जिल्ह्याच्या विकासासाठी वार्षिक योजनेंतर्गत अधिकचा निधी मंजूर करुन घेण्यासाठी आपण
प्रयत्नशील असल्याचं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट
मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आजपासून केपटाऊन इथं खेळला जाणार आहे. दोन्ही संघ प्रत्येकी एका विजयासह मालिकेत सध्या
बरोबरीत आहेत. कर्णधार विराट कोहली दुखापतीतून बरा झाल्यानं, या सामन्यात खेळू शकणार
आहे.
****
No comments:
Post a Comment