Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
भारतातली
सर्वाधिक युवा लोकसंख्या हे भारताचं सर्वात महत्त्वाचं सामर्थ्य आहे, हे जगानंही मान्य
केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. २५ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं
दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. स्वामी विवेकानंद
यांची जयंती आज राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जात आहे. कंपीट ॲण्ड काँकर अर्थात
स्पर्धा करा आणि विजय मिळवा, हा नव भारताचा मंत्र असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जगभरात
भारतीय युवकांचं वर्चस्व असून, आज देशात ५० हजारांहून अधिक स्टार्ट अप्स सुरु असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
हवामान
बदल, परिसर विकास, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि उपक्रम, भारतीय संस्कृती आणि ज्ञान, राष्ट्रबांधणी
अशा विविध विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी युवकांना या युवा महोत्सवात मिळणार
आहे.
पुदुच्चेरी
इथल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी
झालं.
****
राजमाता
जिजाऊ यांचीही आज जयंती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
जिजाऊंना अभिवादन केलं आहे.
औरंगाबाद
इथं आज क्रीडा भारतीच्या वतीनं क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या
मातांचा, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गौरव करण्यात आला. विविध क्रीडा प्रकारात
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर औरंगाबादचे आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या १२ खेळाडूंच्या
मातांना यावेळी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
****
देशात
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर योग्य प्रमाणात ऑक्सिजनची
उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय
आरोग्य सचिवांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. देशातले सर्व
कृत्रिम ऑक्सिजन निर्माण करणारे प्रकल्प योग्य पद्धतीने काम करत आहेत, याची खात्री
करावी, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, सर्व जिल्ह्यांमध्ये
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर योग्य प्रकारे काम करत असल्याची खात्री करावी,
आदी सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.
****
केंद्र
शासनाचं धोरण हे इतर मागासवर्गीयांना न्याय देण्याचं असल्याचं, भाजप नेते चंद्रशेखर
बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात
जास्त ओबीसी मंत्री, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये ओबीसींना
आरक्षण तसंच क्रिमिलियर मधून सूट, अशा निर्णयामुळे केंद्र सरकार हे ओबीसीच्या बाजूने
भक्कम उभं असल्याचं दिसून येतं, असं ते म्हणाले. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे कपोलकल्पित
विधान करून लोकांमध्ये भ्रम पसरवत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला.
****
राज्याच्या
क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी, तसंच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राज्यातल्या
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र
राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावानं, मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही
घोषणा केली. तसा ठराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या
कार्यकारणी मंडळाच्या बैठकीत झाला. सर्व संघटनांनी ‘ऑलिम्पिक व्हिजन डॉक्यूमेंट’ लवकरात
लवकर तयार करुन सादर करावं, अशी सूचना पवार यांनी दिली. ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं
खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून ऑनलाइन साजरा करण्याचा निर्णयही या बैठकीत
घेण्यात आला.
****
औरंगाबाद
इथं काल बोगस भरती प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी
राजू सुरे यांनी अग्निशमन विभागात नोकरी लावण्याच्या अमिषाने केलेल्या फसवणूक प्रकरणात
१४ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या आरोपींनी उमेदवारांना महापालिका आयुक्त आस्तिककुमार
पांण्डेय यांच्या स्वाक्षरीसह बनावट नियुक्तीचं पत्र दिलं होतं. आरोपींच्या ताब्यातून
बनावट निययुक्तीपत्रे, बँक पासबूक, मनपाशी संबंधित विविध रबरी शिक्के, स्टॅम्पपॅड,
मोबाईल, पेनड्राईव्ह आदी साहित्य जप्त करण्यात आलं. दत्तात्रय चौबे, किरण वाडेकर आणि
बळीराम फुके अशी अटक केलेल्यांची नावं असून, त्यांना १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
सुनावण्यात आली आहे.
****
राज्य
परिवहन विभागाच्या परभणी आगारातल्या संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकारने दिलेल्या
सूचनांप्रमाणे कारवाई सुरु करण्यात आली आहे. परभणी विभागातल्या एकूण १४ कर्मचाऱ्यांची
प्रशासकीय बदली करण्यात आली, तर १३ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. ३७८ कर्मचाऱ्यांचं
निलंबन करण्यात आलं असून, ८७ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment