Wednesday, 12 January 2022

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशाच्या अनेक भागात पुन्हा एकदा कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

·      लोकप्रतिनिधींचं ६० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबन करणं योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयामत

·      माजी पोलिस आयुक्ताचा पोलिस दलावर तर राज्य सरकारचा सीबीआयवर विश्वास नसल्याची, स्थिती अत्यंत चिंताजनक - सर्वोच्च न्यायाल

·      आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीत १५ मार्चपर्यंत वाढ

·      कुठलीही लक्षणं नसलेल्या व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करणं आवश्यक नाही- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

·      राज्यात ३४ ओमायक्रॉनचे तर ३४ हजार ४२४वे कोविडचे रुग्ण. मराठवाड्यातही ९८७ बाधित

·      औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात येणार- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

आणि

·      तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात, दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद १७ धावा

****

लोकप्रतिनिधींचं निलंबन हा सर्वस्वी विधीमंडळाच्या सभागृहाचा निर्णय आणि अधिकार आहे, मात्र ६० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबन करणं योग्य नसल्याचं मत, सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र विधीमंडळातल्या १२ निलंबित आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. या निलंबनामुळे होणारा परिणाम निष्कासनापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचा असू शकतो, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. मुबंईत पार पडलेल्या राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन केलं आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी १८ जानेवारीला होणार आहे.

****

माजी पोलिस आयुक्ताला आपल्याच पोलिस दलावर विश्वास नाही, आणि राज्य सरकारला सीबीआयवर विश्वास नाही, हे पाहता महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना काल न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. राज्याचं पोलिस दल आपल्याला खातेनिहाय चौकशीच्या फेर्यात अडकवत असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यावर न्यायालयानं नाराजी व्यक्त करत, परमबीर सिंग यांना यापुढे अटकेपासून संरक्षण देण्यासही नकार दिला आहे. यावेळी केंद्र सरकारच्या वतीनं युक्तिवाद करताना महाधिवक्ता तुषार मेहता यांनी, परमबीर यांच्याविरुद्ध पोलिस खात्याने दाखल केलेल्या एका प्रकरणात तपास करण्याची सीबीआयची तयारी असल्याचं सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २५ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. स्वामी विवेकानंद यांची जयंती आज राष्ट्रीय युवा दिन म्हणू साजरी केली जात आहे. त्यानिमित्त पंतप्रधान आज पुद्दुचेरीतल्या कार्यक्रमाचं सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहे.

औरंगाबाद इथल्या क्रीडा भारतीच्या वतीनं क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा वीर जिजामाता पुरस्कार दे गौरव करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीनं, कोविड १९ दिशानिर्देश आणि लसीकरण जनजागृती चित्ररथाचं जिल्हाधिकारी कार्यालयात उदघाटन होणार आहे. शहरातल्या विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीनं आजपासून तीन दिवसीय विवेकानंद ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीने २०२१-२२ या आर्थिक वर्षाचं आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र कोविड निर्बंधांमुळे करदात्यांना होणारी अडचण लक्षात घेता, ही मुदत वाढवल्याचं सीबीडीटीने सांगितलं आहे.

****

कुठलीही लक्षणं नसलेल्या व्यक्तींची सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करणं आवश्यक नसल्याचं, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आय सी एम आर ने स्पष्ट केलं आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ज्या रुग्णांना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे, तसंच इतर व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांचीच कोरोना चाचणी करावी, असा सल्ला परिषदेनं दिला आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींना कोरोना चाचणीची गरज नसल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. आंतरराज्य प्रवास करणारे प्रवासी, रुग्णालयातून घरी सोडले जात असलेले कोरोना रुग्ण यांचीही कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, परदेशातून आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणीच्या नावाखाली डॉक्टरांनी कुठलीही अत्यावश्यक शस्त्रक्रिया पुढे ढकलू नये, तसंच लक्षणं नसलेल्या कुठल्याही व्यक्ती, गर्भवतींची कोरोना चाचणी करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ३४ रुग्णांची नोंद झाली. यापैकी ३१ रुग्ण पुणे जिल्ह्यातले असून, सोलापूर जिल्ह्यात दोन तर पनवेलमधला एक रुग्ण आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या आता एक हजार २८१ झाली असून, त्यापैकी ४९९ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३४ हजार ४२४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६ लाख ८७ हजार ९३८ झाली आहे. काल २२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ६६९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक शतांश टक्के झाला आहे. काल १८ हजार ९६७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६ लाख २१ हजार ७० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या लाख २१ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ९८७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ३४९ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या २८५ तर ग्रामीण भागातल्या ६४ रुग्णांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात २१६, नांदेड १७०, उस्मानाबाद ६५, जालना ६४, परभणी ६०, बीड ३९, तर हिंगोली जिल्ह्यात काल २४ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

बीड जिल्ह्यात आतापर्यंत १७ लाख नागरिकांनी कोविड लसीची पहिली, तर साडे नऊ लाख जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. लसीकरण मोहीम युध्दपातळीवर राबवण्यात येत असल्याचं, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी सांगितलं. तांडा वस्तीसह छोट्याछोट्या वाड्यावस्तीवर रात्री उशिरापर्यंत लसीकरण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले..

 

‘‘तिस्ऱ्या लाटेच्या अनुषंगाने मी सर्व जनतेस आवाहन करेल की, या तिसऱ्या लाटेपासून आपला स्वत:चा, कुटुंबाचा जर बचाव करायचा असेल, तर सर्वांनी समोर येऊन आणि आपल्या इतर नातेवाईकांनाही, मित्रपरिवाला सुद्धा आवाहन करुन आपलं लसीकरण करुन घेण अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हे करत असतानाच आपली जी कोविड अनुरुप वर्तवणूक आहे. याचे नियम आपण पाळले गेले पाहिजे.’’

****

औरंगाबाद शहरात जवळपास दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला असल्याचं, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं आहे. पांडेय यांच्यासह महापालिकेच्या ६० अधिकारी कर्मचाऱ्यांनी काल बूस्टर डोस घेतला, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी काल सांगितलं. औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यासाठी, आणि मेट्रो रेल्वे, उडाणपूलासाठी एकत्रित विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, महा मेट्रो आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांशी, डॉ. कराड यांनी काल चर्चा केली, त्यानंतर ते बोलत होते. वाळूज औद्योगिक वसाहत ते शेंद्रा, बिडकीन ते हर्सूल या मुख्य मार्गावर 'मेट्रो लाईन कॉम्प्रेहेनसिव्ह मोबिलिटी प्लॅन' तयार करण्यात येत असून, यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड महा मेट्रो ची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

****

राज्यातील पर्यटन स्थळे ५० टक्के निर्बंधासह सुरू करावीत अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी काल ठाकरे यांच्याकडे सादर केलं.

खेळाची मैदाने, जॉगिंग पार्क आणि उद्याने खुली करण्याची मागणी औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागीय क्रीडा उपसंचालिका उर्मिला मोराळे यांच्या मार्फत या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं.

****

शेतीसमवेत ग्रामीण भागात शिक्षणाच्या सेवा-सुविधांमध्ये कालसुसंगत बदल होणं आवश्यक असल्याचं, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेचे शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या यशोगाथा बळीराजाची या पुस्तिकेचं प्रकाशनही काल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

क्रिकेट

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या पहिल्य दिवशी भारताचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार विराट कोहलीनं ७९, तर चेतेश्वर पुजारानं ४३ धावा केल्या. कालचा खेळ थांबला, तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या डावात एक बाद १७ धावा झाल्या होत्या.

****

औरंगाबाद इथल्या खेलो इंडिया जिल्हा केंद्राचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. विभागीय क्रीडा संकुलातल्या नियोजित शूटिंग रेंजचं भूमिपूजनही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते काल करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे सर्व सोयी सुविधांसहित शूटींग रेंजचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं, एसनिधीमधून दहा मीटर शूटींग रेंजमध्ये आवश्यक दुरूस्ती करून ती सरावासाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

****

जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पिसादेवी गावाच्या पाणीपुरवठ्यातल्या अडचणींचं निराकरण करण्याच्या सूचना, पाणीपुरवठा तसचं स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या जलकुंभातून या गावाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातली गळती रोखावी, असे निर्देश पाटील यांनी दिले.

****

हवामान -

मराठवाड्यात आज नांदेडसह इतर जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान संशोधन प्रकल्पानं वर्तवलेल्या साप्ताहिक अंदाजात मराठवाड्यात या काळात तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 July 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...