Thursday, 13 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

देशभरात कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. लसीकरण मोहिम आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ७६ लाख ३२ हजार २४ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५४ कोटी ६१ लाख ३९ हजार ४६५ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २६ लाख ७३ हजार ३८३ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे. 

दरम्यान, देशात काल नव्या दोन लाख ४७ हजार ४१७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ६३ लाख १७ हजार ९२७ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ८५ हजार ३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काल ८४ हजार ८२५ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४७ लाख १५ हजार ३६१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ११ लाख १७ हजार ५३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात परिवान भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद चा एक दहशतवादी ठार झाला. या चकमकीत एक पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले. या चकमकीत लष्कराचे तीन सैनिक आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाला असल्याचं पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं. घटनास्थळावरुन एक ए के ४७, एक पिस्तुल आणि हातगोळे जप्त करण्यात आले.

****

नामवंत अग्नीबाण वैज्ञानिक एस. सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोचे नवे अध्यक्ष तसंच अंतरिक्ष सचिव म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्तमान अध्यक्ष के. सिवन यांचा कार्यकाळ उद्या संपत असून या पदांवर शक्यतो एकाच व्यक्तिची नियुक्ती केली जाते. एस सोमनाथ हे दहावे इस्रो प्रमुख असतील.

दरम्यान, इस्रोनं काल गगनयान मानव अंतराळ कार्यक्रमासाठी क्रायोजेनिक इंजिनाची पात्रता चाचणी यशस्वीरित्या पार केली. इस्रोद्वारे निर्मित या इंजिनाचं नाव ‘विकास’ असं ठेवण्यात आलं असून, अंतराळात मानवासह मोहिम पाठवण्याच्या दृष्टीनं त्याचं यश विशेष महत्वाचं आहे.

****

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातली अंगठ्याच्या ठशाद्वारे उपस्थिती प्रणाली सतत स्थगित करण्यात येत आहे. यासाठी चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा वापर केल्यास कर्मचाऱ्यांचा वेळही वाचणार असून, प्रायोगिक तत्वावर अशा काही यंत्रांचा वापर करण्याबाबत कार्यवाही करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

भूजल पातळीतली घट थांबवण्यासाठी बंदिस्त जलवाहिनीद्वारे शेतीला पाणीपुरवठा आवश्यक असून, यासाठी पाणी पुरवठा आणि कृषी विभागामार्फत जनजागृती होण्याची गरज, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. मंत्रालयात काल झालेल्या अटल भूजल योजनेच्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या दुसऱ्या बैठकीत ते बोलत होते. ठिबक सिंचन योजनेचं काम सुरू करण्यापूर्वी अनुदान निधी उपलब्ध करून दिला, तर लाभार्थींची संख्या वाढेल, यामुळे पाणी उपसा कमी होण्यास मदत होईल, असं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सावधानता बाळगावी, असं आवाहन औरंगाबाद महावितरणने केलं आहे. पतंग तसंच पतंगाचा मांजा हा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे मोकळ्या मैदानात पतंग उडवावा, विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेला पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा, धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा असं आवाहन महावितरण विभागानं केलं आहे.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान केपटाऊन इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारत दुसऱ्या डावात दोनबाद ५७ धावांपासून पुढे खेळणार आहे. चेतेश्वर पुजारा ९ आणि कर्णधार विराट कोहली १४ धावांवर खेळत आहे. काल दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर संपुष्टात आला. भारताकडे सध्या ७० धावांची आघाडी आहे.

****

येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...