Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१३ जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत १५० कोटी मात्रा देण्याचा
विक्रम करत देश या मोहिमेत पुढे वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचं
ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही
आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८
वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस
घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या
उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात
तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
· राज्यातले कोविड निर्बंध फेब्रुवारी महिन्यापर्यंत शिथील होण्याची
शक्यता नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे
· वाढत्या कोविड साथीच्या
पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांसह नागरिकांनी बेसावध न राहण्याचं मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांचं आवाहन
· राज्यात ८६ ओमायक्रॉनचे तर ४६ हजार ७२३ नवे कोविडचे रुग्ण. मराठवाड्यातही एक हजार ७०३ बाधित
· राज्यात आता सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत असणं बंधनकारक
· शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे पगार
बंद करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश
· राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती सर्वत्र उत्साहात
साजरी
आणि
· दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या
डावात भारताच्या दोन बाद ५७ धावा
****
देशभरात कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या
पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद
साधणार आहेत. लसीकरण मोहिम आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा या बैठकीत आढावा
घेण्यात येणार आहे.
****
कोविडग्रस्तांना रुग्णालयातून सुटी देण्यासंदर्भात नवे निकष
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केले आहेत. कोविडची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना
सात दिवसांच्या उपचारादरम्यान सलग तीन दिवस ताप नसेल, तर कोविड चाचणी न करता रुग्णालयातून
सुटी देता येईल. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. मध्यम स्वरुपाची लक्षणं असलेल्या रुग्णांना सलग तीन दिवस जर कृत्रीम
प्राणवायू न देता, शरीरातली प्राणवायूची पातळी समाधानकारक असेल, आणि अन्य व्याधी जर
नियंत्रणात असतील, तर कोविड चाचणी न करता, रुग्णालयातून सुटी देता येईल. गंभीर रुग्णांना
मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुटी देता येईल, असं अग्रवाल यांनी
सांगितलं.
****
राज्यातले कोविड निर्बंध फेब्रुवारी महिन्यापर्यंत शिथील होण्याची
शक्यता नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल प्रसारमाध्यमांशी
बोलत होते. घरी चाचणी करणाऱ्या रुग्णांनी अहवाल बाधित आल्यास, महापालिकेकडे माहिती
द्यावी, असं त्यांनी सांगितलं. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी लस घेणं आणि प्रतिबंधात्मक
नियमांचं पालन करणं, आवश्यक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. मास्क न लावण्याचा
सल्ला देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही टोपे यांनी दिला आहे.
****
कोविडची रुग्णसंख्या वाढत असून, शासकीय यंत्रणांसह नागरिकांनी
बेसावध राहू नये, असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल राज्य
मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत होते. सार्वजनिक आरोग्य विभागाने या बैठकीत केलेल्या सादरीकरणात,
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये
रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात
वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर सध्या दररोज सुमारे ४०० मेट्रिक टन झाला आहे, हे प्रमाण दरदिवशी
७०० मेट्रिक पर्यंत गेल्यास, राज्यात अधिक कडक निर्बंध लावावे लागतील, हे लक्षात घेऊन,
जिल्हा प्रशासनांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवावा, तसंच इतर नियोजन तयार ठेवण्याची
सूचना, मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या नव्या ८६ रुग्णांची नोंद झाली. यापैकी ६० रुग्ण
पुणे जिल्ह्यातले असून, मुंबईत २१, सातारा तीन, तर नाशिक जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले.
राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या आता एक हजार ३६७
झाली असून, त्यापैकी ७३४
रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४६ हजार ७२३ रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७० लाख ३४ हजार ६६१ झाली आहे.
काल ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या
संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
७०१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक एक
दशांश टक्के झाला आहे. काल २८ हजार ४१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६६ लाख ४९ हजार १११ रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५२ शतांश
टक्के झाला आहे. राज्यात सध्या २ लाख ४० हजार १२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल एक
हजार ७०३ विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद
जिल्ह्यात काल ४८४ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या ४१० तर ग्रामीण भागातल्या ७४ रुग्णांचा
समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात ४७४, लातूर ४३४, जालना ९७, उस्मानाबाद ८१, परभणी
७३, बीड ३८, तर हिंगोली जिल्ह्यात काल २२ नव्या रुग्णांची नोंद
झाली.
****
राज्यात आता मोठ्या दुकानांप्रमाणेच छोट्या दुकानांचे
नामफलकही मराठीत असणं बंधनकारक करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी
'महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७’ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. दहापेक्षा कमी कामगार
असलेल्या आस्थापना आणि दुकानं, या नियमातून पळवाट काढत असल्याच्या
तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. या दुकानदारांनीही आता
हा नियम बंधनकारक असेल. नामफलकावर मराठी लिपीतली अक्षरं,
अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती करण्यात आली आहे.
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक ठप्प झालेल्या
वाहतुकदारांना १०० टक्के करमाफी देण्याचा निर्णयही, काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एक एप्रिल
२०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी, ही करमाफी असेल.
ज्यांनी या कालावधीसाठीचा कर भरला असेल,
त्यांना कर परत न देता, आगामी काळात या रकमेचं
समायोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक सर्वसाधारण योजनेत, महिला आणि बाल सशक्तीकरण या योजनेसाठी,
कायमस्वरूपी तीन टक्के म्हणजेच दरवर्षी सुमारे साडे चारशे कोटी रुपये
निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
****
कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे परवा १५ जानेवारी पासून सुरु
होणारी राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. विषाणू
संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाच्या नियमांस अनुसरून नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात
येईल, असं सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
शिक्षक पात्रता परिक्षा - टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे
पगार बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागानं जारी केले आहेत. शाळांना वेळोवेळी सूचना
देऊनही टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांबाबत कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्यानं हा
निर्णय घेण्यात आला. एखाद्या शाळेने अशा शिक्षकांचं पगार काढल्यास तेवढी रक्कम मुख्याध्यापकांच्या
पगारातून वसूल करण्यात येईल, असंही शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे.
****
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती काल सर्वत्र
उत्साहात साजरी झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजमाता
जिजाऊ तसंच स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यात राजमाता
जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा इथंही अनेकांनी जिजाऊंच्या स्मृतींना आदरांजली
वाहिली.
क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय
कामगिरी करणाऱ्या १२ खेळाडूंच्या मातांचा, औरंगाबाद इथं क्रीडा भारतीच्या वतीनं, राजमाता
जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त काल गौरव करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात, कोविड - 19 मार्गदर्शक सूचना आणि लसीकरण चित्ररथाचं,
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालं. औरंगाबाद शहरात राजमाता जिजाऊंचा
पुतळा बसवण्याची मागणी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीनं काल करण्यात आली.
उस्मानाबाद इथं स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या
जयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवजयंती समारोह समितीच्या वतीने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
मोहीम राबवण्यात आली.
जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीनं नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर
यांच्या हस्ते जिजाऊ चौक इथं राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.
रक्तदान शिबिर, मुला-मुलींनी स्वसंरक्षणासाठी लाठ्या काठ्यांच्या प्रात्यक्षिकाचं सादरीकरणही
करण्यात आलं.
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या आष्टूर ग्राम पंचायत
कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पण करून
आदरांजली वाहण्यात आली.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी,
राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं.
हिंगोली जिल्ह्यात वसमत इथल्या लिटल किंग इंग्लिश शाळेत तीन
जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान जिजाऊ-सावित्री महोत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान
झालेल्या क्रीडा प्रकारांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा काल गौरव
करण्यात आला.
****
मेळघाटात परिस्थिती सुधारत आहे, आरोग्याच्या सेवा वाढत आहेत,
अंधश्रद्धेचं प्रमाण कमी होत असून, स्त्री शिक्षणाचं प्रमाणही वाढत असल्याचं, महात्मा
गांधी ट्रायबल हॉस्पिटल 'महान'चे संस्थापक, डॉ. आशिष सातव यांनी सांगितलं आहे. स्वामी
विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त, औरंगाबाद इथल्या विवेकानंद महाविद्यालयाच्या
तीन दिवसीय विवेकानंद ऑनलाईन व्याख्यानमालेत, ते काल बोलत होते. मेळघाटात अजुनही कुपोषणाचं
प्रमाण आहे, त्यामुळे तरुण आणि लहान मुलांचे मृत्यू होत असल्याकडेही डॉ सातव यांनी
लक्ष वेधलं.
****
क्रिकेट
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट
सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने ७० धावांची आघाडी घेतली आहे. त्यापूर्वी दक्षिण
आफ्रिकेचा पहिला डाव काल २१० धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक पाच
बळी घेतले.
भारताचा दुसरा डावही अडखळत सुरू झाला. के एल राहुल १० धावावर तर मयंक अग्रवाल सात धावांवर बाद झाला.
कालच्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताच्या दोन बाद ५७ धावा झाल्या होत्या. चेतेश्वर
पुजारा ९ आणि कर्णधार विराट कोहली १४ धावांवर खेळत आहे.
****
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत सात जागांवरची
निवडणूक बिनविरोध झाली, तर सात जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज मागे
घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. उर्वरित सात जागांसाठी १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
आहेत. २२ जानेवारीला मतदान, तर २३ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
****
राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत, डमी
उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या औरंगाबाद इथल्या उमेदवाराला पुणे पोलिसांनी
अटक केली आहे. विक्रम सोनवणे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव असून, त्याने बसवलेल्या
डमी उमेदवाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ डिसेंबर रोजी पुण्यात ही परीक्षा
झाली होती.
****
परभणी इथं एम.के.वर्कशॉप या आस्थापनेत काम करणाऱ्या दोन बालकामगारांना
सोडवून पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत यांच्या आदेशाने,
आणि कामगार अधिकारी व्ही.एन.मांणगावकर यांच्या मार्गदर्शनात, ही मोहीम राबवण्यात आली.
संबंधित दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या बालकांना पुन्हा कामावर पाठवणार
नाही, अशी लेखी हमी, बालकल्याण समितीनं मुलांच्या आई वडिलांकडून घेतली आहे.
****
हिंगोली शहरात वारंवार सुचना देऊनही विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांचा
नगर पालिकेच्या पथकानं काल गुलाबपुष्प देऊन सत्कार केला, तसंच त्यांच्यावर दंडात्मक
कारवाई करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment