Thursday, 13 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशभरात कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. लसीकरण मोहिम आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.

****

आज भोगी आणि उद्याचा मकर सक्रांतीचा सण देशभरात विविध भागात वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा होतो. लोहरी, मकर सक्रांती, भोगली, बिहू, उत्तरायण, पौष पर्व अशा विविध भागातल्या सणांच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकांमध्ये बंधुभाव राहावा तसंच देशात समृद्धी आणि आनंद राहावा यासाठी प्रार्थना करत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

****

कोवॅक्सिनची वर्धक मात्रा घेतलेले नागरिक कोरोनाच्या ओमायक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही प्रकारच्या विषाणूंवर मात करत असल्याचं, संशोधनात सिद्ध झाल्याचा दावा, भारत बायोटेक या कंपनीनं केला आहे. वर्धक मात्रा दिलेल्या नागरिकांच्या रक्ताच्या तपासणीत १०० टक्के जणांनी डेल्टा विषाणूला तर ९० टक्के नागरिकांनी ओमायक्रॉनचा विषाणूंना निकामी केल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

****

पंजाबमधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटीच्या चौकशीसाठी काल सर्वोच्च न्यायालयानं समितीची स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या समितीच्या अध्यक्ष आहेत. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक, पंजाबचे सुरक्षा महासंचालक आणि पंजाब तसंच हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल या समितीचे इतर सदस्य आहेत.

****

औरंगाबाद शहराला मुबलक पाणी पुरवठ्यासाठीची नियोजित एक हजार ६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेतली कामं अधिक गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. या पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी चव्हाण यांनी काल केली, त्यावेळी ते बोलत होते.

****

परभणी शहरासह जिल्ह्यातल्या नागरिकांनी कोरोनाची तिसरी लाट सहजपणे घेवू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. सर्दी, खोकला, ताप वगैरे लक्षणे आढळल्याबरोबर तत्काळ उपचार घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...