Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २८ वा `नामविस्तार दिन` आज विविध कार्यक्रमांनी
साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला नामविस्तार दिनाच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्ताराच्या
निर्णयाने राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुत्वाचा विचार अधिक भक्कम केला, असं
त्यांनी म्हटलं आहे.
विद्यापीठ
नामविस्तारासाठी शहिद झालेल्या भीमसैनिकांच्या स्मारकाचं भूमिपूजन कुलगुरु डॉ.प्रमोद
येवले यांच्या हस्ते आज झालं. विद्यापीठ प्रवेशद्वाराचं नूतनीकरणही करण्यात येणार असल्याचं
कुलगुरुंनी यावेळी सांगितलं.
दरम्यान,
नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकर अनुयायी विद्यापीठ प्रवेशद्वारावर अभिवादन करत आहेत.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १५५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ७३ लाख
आठ हजार ६६९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५५ कोटी ३९ लाख ८१
हजार ८१९ मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत ३३ लाख ६३ हजार ६३५ नागरीकांना
बुस्टर डोस देण्यात आला आहे.
****
परीक्षा
पे चर्चा २०२२ च्या पाचव्या आवृत्तीत चर्चेसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सहभागी
होण्याचं आवाहन, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मार्गदर्शन मिळण्याची ही उत्तम संधी असल्याचं
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही हा कार्यक्रम ऑनलाईन
होणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं.
****
वैद्यकीय
प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एनईईटी साठीचं समुपदेशन या महिन्याच्या
१९ तारखेपासून सुरू होईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी जाहीर केलं
आहे. वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीत संस्थांद्वारे जागांची पडताळणी १७ आणि १८ जानेवारीला
होईल, इतर फेऱ्या तसंच प्रक्रियांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
महा
डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या, शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा
फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणं, तसचं अर्जाचं नूतनीकरण करण्यास, ३१ जानेवारी
पर्यंत मुदतवाढ देण्यत आली आहे. काल मुंबई इथं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी
यासंबधीची घोषणा केली. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील सुमारे साडे चार लाख विद्यार्थी,
दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने राजमाता
जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती तसंच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पत्रकार विलास बडे
यांचं ‘आजादी का अमृत महोत्सव आणि युवक’ या विषयावर व्याख्यान झालं. भारतामधून वेगळे
झालेल्या पाकिस्तान, बांगलादेश सारख्या राष्ट्रात अराजकता दिसून येते, मात्र भारतीयांनी
लोकशाहीची मूल्ये जपली आहेत, त्यामुळेच भारतात शांतता आणि सुव्यवस्था असून, भारत जागतिक
महासत्तेकडे वाटचाल करत असल्याचं, बडे यावेळी म्हणाले. कुलगुरु डॉ.उद्धव भोसले कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी होते.
****
परभणी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद
देत, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुलाच्या लाभासाठी जिल्ह्यातल्या गरजू लाभार्थ्यांच्या
यादी निश्चितीसाठी, ग्रामसेवकांनी पुढाकार घेतला आहे. येत्या दोन दिवसात संबंधित ग्रामपंचायतींमधल्या
घरकुलामधील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून देणार असल्याचं ग्रामसेवकांनी सांगितलं
आहे.
****
यंदाचा
सवाई गंधर्व महोत्सव रद्द करण्याचा निर्णय आर्य संगीत प्रसारक मंडळानं घेतला आहे. दोन
ते सहा फेब्रुवारी दरम्यान त्याचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र कोरोना रुग्णांची
वाढती संख्या आणि स्थानिक प्रशासनाकडून लादण्यात आलेल्या नियमावलीमुळे हा निर्णय घेतल्याचं
मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं.
****
लातूर
जिल्ह्यातले सर्व कार्यालय, आस्थापना आणि इतर कामाच्या ठिकाणी, लैंगिक छळापासून महिलांचं
संरक्षण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती गठीत करावी, असं आवाहन, जिल्हा महिला आणि
बाल विकास अधिकारी वर्षा पवार यांनी केलं आहे.
जिल्ह्यातल्या बऱ्याच कार्यालयात आणि आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत
नसल्यामुळे, सदर कार्यालय आणि आस्थापना यांचं जानेवारी महिन्याचं वेतन देयक पारीत करण्यात
येणार नाहीत, असे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment