Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
भारतीय
सैन्य देशाच्या सीमेवर एकतर्फी स्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार
नाही, हा आमचा स्पष्ट संदेश असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे.
७४व्या भारतीय लष्कर दिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. सीमेवर
गेल्यावर्षीच्या तुलनेत परिस्थिती चांगली आहे, मात्र पाकिस्तान अजुनही सीमेवर दहशतवाद्यांना
आश्रय देत असल्याचं, नरवणे म्हणाले. जवळपास ३०० ते ४०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या
प्रयत्नात आहेत, भारतीय लष्करानं केलेल्या विविध कारवायांमध्ये १४४ दहशतवादी मारले
गेले असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्व लडाखच्या परिस्थितीवर बोलताना नरवणे यांनी,
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नुकतीच भारत आणि चीन यांच्यात १४व्या फेरीतील लष्करी
पातळीवरील चर्चा झाल्याचं सांगितलं.
लष्कर
दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे,
हवाई दल प्रमुख व्ही.आर.चौधरी आणि नौदल प्रमुख अडमिरल आर. हरिकुमार यांनी शहिदांना
पुष्पांजली अर्पण केली.
****
प्रजासत्ताक
दिन सोहळ यावर्षीपासून २३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. हा सोहळा पूर्वी २४ जानेवारी
पासून सुरु होत असतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात
समाविष्ट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
२०२२
मध्ये देशात स्टार्ट अप इकोसिस्टमसाठी अनेक शक्यता निर्माण झाल्या असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्टार्ट अप उद्योजकांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून ते आज संवाद साधत होते. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे,
जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील, तेव्हा देशाच्या प्रगतीमध्ये
स्टार्ट अपची भूमिका महत्वपूर्ण असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्टार्ट अपची
ही संस्कृती देशाच्या प्रत्येक भागात रुजावी, यासाठी १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय
स्टार्ट अप दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५८
लाख दोन हजार ९७६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५६ कोटी दोन
लाख ५१ हजार ११७ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३८ लाख चार हजार ३७६ पात्र नागरिकांनी
बुस्टर डोस घेतला आहे.
दरम्यान,
देशात काल नव्या दोन लाख ६८ हजार ८३३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
४०२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन
कोटी ६८ लाख ५० हजार ९६२ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ८५ हजार ७५२ नागरिकांचा
मृत्यू झाला आहे. काल एक लाख २२ हजार ६८४ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी
४९ लाख ४७ हजार ३९० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, १४ लाख १७ हजार ८२० रुग्णांवर
सध्या उपचार सुरु आहेत.
****
सशस्त्र
दल दिनानिमित्त संरक्षण मंत्रालयातर्फे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी
तीन नव्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी माजी सैनिक कल्याण निधीकरता ३२०
कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जाहीर केलं.
माजी सैनिकांच्या सुमारे एक लाख ६६ हजारांहून अधिक कुटुंबियांना याचा लाभ मिळणार आहे.
माजी सैनिक कल्याण विभागातर्फे यावेळी रक्षा पेन्शन, शिकायत निवारण पोर्टल सुरु करण्यात
आलं.
****
देशाला
पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणारे, महाराष्ट्राचे पैलवान खाशाबा जाधव यांच्या
जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी
त्यांना अभिवादन केलं आहे. जाधव यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी भावी पिढीला कायम प्रेरणा
देत राहील, असं ते म्हणाले.
****
येत्या
मंगळवारी १८ जानेवारीला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी मतदारांना
मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघांमधे राज्य शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली
आहे. राज्यातल्या ९५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, दोन जिल्हा परिषद आणि पंचायत
समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका, तसंच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी
हे मतदान होणार आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालयं, निम शासकीय कार्यालयं, सार्वजनिक
उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या ईसाद सज्जाचा तलाठी शंकर गोरे यास पाच हजार रुपयांची
लाच घेतांना काल पकडण्यात आलं. तक्रारदाराच्या नावे असलेल्या शेतामध्ये लागवड केलेल्या
विविध फळ झाडांचा सातबारा उतारा करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment