Saturday, 15 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत १५० कोटी मात्रा देण्याचा विक्रम करत देश या मोहिमेत पुढे वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कोरोना रुग्णांनी फसवे आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित उपचार घेऊ नयेत - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना

·      कोरोना प्रतिबंधक लसीकरण कायदेशीर दृष्टीने बंधनकारक करण्याची राज्य सरकारची केंद्र सरकारकडे मागणी

·      राज्यात ओमायक्रॉनचे नवे २३८ तर कोविडचे नवे हजार २११ रुग्ण; मराठवाड्यात दोघांचा मृत्यू तर नवे दोन हजार १०९ रुग्ण

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

·      देवस्थान तसंच वक्फ बोर्ड बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरणी बीडचे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव निलंबित

·      तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय; मालिकाही जिंकली

·      उस्मानाबाद इथं ड्रोनच्या सहाय्यानं पिकावरील फवारणी तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी

णि

·      हिंगोली जिल्ह्यात पिस्तुलाचा धाक दाखवून बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक  

****

कोरोना रुग्णांनी फसवे आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित नसलेले उपचार घेऊ नयेत अशी सूचना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी काल आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना, विविध समाज माध्यमांवर कोविडच्या उपचारांविषयी सांगितले जाणारे उपाय आणि माहितीमुळे, नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण तयार होतं, अशा गोष्टींना कोणीही बळी पडू नये, असं आवाहन केलं. रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच रक्त तपासणी, एक्स-रे, एमआरआय आणि सीटी स्कॅन करावं, कोविड-१९ ची सौम्य लक्षणं असलेल्या तसंच लक्षणं नसलेल्या रुग्णांना स्टेरॉईड्स देऊ नयेत, उपचारांदरम्यान स्टेरॉइड्सचा वापर टाळला पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉइड्सचा वापर केल्यास म्युकर मायकोसिस सारखा संसर्ग होण्याची शक्यता असते, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

****

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कायदेशीर दृष्टीने बंधनकारक करण्याची मागणी, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. लसीकरण ऐच्छिक असल्याने अनेकजण लस घ्यायला टाळाटाळ करत असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.

राज्यात कोविड लसींच्या मात्रांचा तुटवडा जाणवत असून, ९८ लाख लोक लसीच्या पहिल्या मात्रेपासून वंचित आहे. लसीकरणाला गती मिळावी याकरता कोविशिल्ड लसीच्या ५० लाख आणि कोवॅक्सिन लसीच्या ४० लाख मात्रांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असं टोपे यांनी सांगितलं. राज्यात लहान मुलांचं ४० टक्के लसीकरण झालं असून, अशीच गती राहिल्यास १५ दिवसांत लसीकरण पूर्ण होईल असंही ते म्हणाले.

****

दरम्यान, महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्याचं वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात कोवॅक्सिनच्या न वापरलेल्या २४ लाख मात्रा शिल्लक आहेत, त्याशिवाय काल सहा लाख ३५ हजार अतिरिक्त मात्रा देण्यात आल्या आहेत, असं स्पष्टीकरण मंत्रालयानं दिलं आहे. १५ ते १८ वयोगटातल्या लाभार्थ्यांना देण्यासाठी तसंच बूस्टर डोस देण्यासाठी महाराष्ट्रात दैनंदिन सरासरी दोन लाख ९४ हजार मात्रांची आवश्यकता भासते असं कोवीन ऍप वरून लक्षात येतं. त्या दृष्टीने राज्याकडे पुढील दहा दिवस पुरतील इतक्या कोवॅक्सिनच्या लसीच्या मात्रा आहेत, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉनचे २३८ रुग्ण आढळले. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातले १९७, पिंपरी चिंचवड ३२, पुणे ग्रामिण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन, मुंबई दोन, तर अकोला जिल्ह्यातला एक रुग्ण आहे. राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या एक हजार ६०५ झाली असून, यापैकी ८५९ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४ हजार २११ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७ लाख २४ हजार २७८ झाली आहे. काल १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ७५६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. काल ३३ हजार ३५६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६ लाख १७ हजार १२५ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक २८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ६१ हजार ६५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल दोन हजार १०९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल ५२० रुग्ण आढळले. त्यात महानगरपालिका क्षेत्रातले ४०१, तर ग्रामीण भागातले ११९ रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात ५५३, लातूर ५०२, उस्मानाबाद १७३, जालना १६३, परभणी ९६, बीड ६४, तर हिंगोली जिल्ह्यात काल ३८ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

नांदेड जिल्ह्यात वाढती कोविड रुग्ण संख्या पाहता, जिल्हा प्रशासनाच्यावतीने महानगरपालिका कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना मार्गदर्शन आणि उपचाराबाबत आवश्यक माहिती मिळावी या उद्देशाने हा नियंत्रण कक्ष कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

****

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिभाषणं अधिवेशनाला सुरुवात होईल. दोन सत्रात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं सत्र ३१ जानेवारी ते ११ फे‍‍‍ब्रुवारी दरम्यान, तर दुसरं सत्र १४ मार्च ते आठ एप्रिलपर्यंत चालेल. १ फे‍‍‍ब्रुवारीला २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

****

केंद्र तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यात एकूण जमा निधीपैकी एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. मेडिकल क्लेम अंतर्गत कर्मचाऱ्यांना हे पैसे काढता येणार असून, यासाठीच्या नियमात लवकरच बदल करण्यात येणार आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं यासंदर्भात एक पत्रक जारी केलं. ईपीएफओ सदस्य कोणतीही कागदपत्रं सादर न करता त्यांच्या पीएफ खात्यातून एक लाख रुपये काढू शकणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.

****

शॉपिंग मॉलद्वारे ग्राहकांकडून वाहनतळासाठी शुल्क आकारणं अयोग्य असल्याचं मत केरळ उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. मॉलकडून वसूल केल्या जाणाऱ्या वाहनतळ शुल्काच्या विरोधात दाखल दोन याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं हे मत नोंदवलं. मॉलद्वारे वाहनतळ शुल्काची वसुली बेकायदेशीर असल्याचं घोषित करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २८ वा `नामविस्तार दिन` काल विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नामांतर आंदोलनात मराठवाड्यात अनेकांच्या घरा - दाराची राख झाली. मात्र, फिनिक्स पक्षाप्रमाणे नवीन समतावादी पक्षांची पिढी उभी राहिल्याचं, मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीचे प्राध्यापक मंगेश बनसोड यांनी म्हटलं आहे. नामविस्तार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानात  ‘नामविस्तार आणि सामाजिक न्यायाची अपेक्षा’ या विषयावर ते बोलत होते.

विद्यापीठ नामविस्तारासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा सैनिकांच्या स्मारकाचं भूमिपूजन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते काल करण्यात आलं. विद्यापीठ प्रवेशद्वाराचं नूतनीकरणही करण्यात येणार असल्याचं कुलगुरुंनी यावेळी सांगितलं.

****

मकर संक्रांतीचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. नागरिकांनी परस्परांना तिळगूळ देऊन शुभेच्छा दिल्या. पतंग उडवण्यात बालकांसह तरुणांचा उत्साह दिसून येत होता.

****

बीड जिल्ह्यातल्या देवस्थान तसचं वक्फ बोर्ड बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरणात राज्य शासनाने मोठी कारवाई करत उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचं निलंबन केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या अनेक जमिनी खालसा केल्याच्या आरोपावरून आष्टी आणि बीड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात मुख्य आरोपी म्हणून उपजिल्हाधिकारी आघाव यांचं नाव आहे. जमीन घोटाळा प्रकरणातली ही पहिलीच मोठी कारवाई झाली आहे.

****

केपटाऊन कसोटी क्रिकेट सामना दक्षिण आफ्रिकेनं सात गडी राखून जिंकला आहे. विजयासाठी भारतीय संघाने दिलेलं २१२ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने काल सामन्याच्या चौथ्या दिवशी तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासोबत दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघासोबत झालेली तीन कसोटी सामन्यांची ही मालिकाही जिंकली आहे. दरम्यान दोन्ही संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना येत्या बुधवारी १९ जानेवारीला होणार आहे.

****

१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला कालपासून वेस्ट इंडीजमध्ये सुरवात झाली, या स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.

****

दिल्ली इथं सुरु असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेपीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं अस्मिता चालिहा हिचा २१-सात, २१-१८ असा पराभव केला, तर लक्ष्य सेननं एच एस प्रणॉयचा १४-२१, २१-नऊ, २१-१४ असा पराभव केला.  

****

उस्मानाबाद इथं ड्रोनच्या सहाय्यानं पिकावरील फवारणी तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या ड्रोन प्रात्यक्षिकाचा उस्मानाबाद जव पळसवाडी शिवारात प्रयोग करण्यात आला. फक्त १२ लिटर पाणी आणि २०० मिलीलिटर औषधामध्ये १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत अर्धा एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर फवारणी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, पाणी याची बचत होणार आहे, कीड अथवा रोगांचा प्रार्दुभाव निदर्शनास येताच, लगेच फवारणी करणंही शक्य होणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात पिस्तुलाचा धाक दाखवून बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. वसमत तालुक्यात आंबा चोंडी इथल्या मराठवाडा ग्रामीण बँकेच्या शाखेत काल दुपारनंतर तीन दरोडेखोरांनी, व्यवस्थापकाला पिस्तुलाची भीती दाखवून पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर, बँकेत गोळीबार करून दरोडेखोर पसार झाले. या गोळीबारात व्यवस्थापकाच्या केबीनची काच फुटून काही कर्मचारी जखमी झाले. आखाडा बाळापूर पोलिसांनी बोथी शिवारातून चोरट्यांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या नियोजित मोसंबी रोपवाटिका "सिट्रस इस्टेट" या योजनेसाठी, ३६ कोटी ४४ लाख ९९१ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी ही माहिती दिली. ही तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पैठण केंद्रबिंदू मानून १०० किलोमीटर परिघात या रोपवाटिकेचं कार्यक्षेत्र राहणार आहे.

****

औरंगाबाद महावितरणच्या ग्रामीण मंडळानं, नोव्हेंबर आणि डिसेंबर-२०२१ या दोन महिन्यांत राबवलेल्या विशेष मोहिमेत, ११० प्रकरणांत ३८ लाखांहून अधिक रकमेची वीज चोरी उघड केली आहे. यात वीजचोरीची ३४ लाखांहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली. वीजचोरी तसंच तडजोड शुल्क न भरणाऱ्या २१ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

महाज्योती उपक्रमाच्या उद्देशिकेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी उपक्रम राबण्याचा समावेश असल्याचं राज्याचे पुनर्वसन मत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुरात बोलत होते. राज्यातील सात जिल्ह्यांमधील कोरडवाहू शेती असलेल्या सा हजार ९४९ शेतकऱ्यांना, करडई तेलबियाचं मोफत बियाणं देण्यात आलं. १६ हजार १६२ एकरवर या करडईची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोरडवाहू शेतकरी संपन्न व्हावा, हा महाज्योतीचा उद्देश असल्याचं, वडेट्टीवार यांनी सांगितलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...