Saturday, 15 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

७४वा भारतीय लष्कर दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर तीनही सैन्य दलांचे प्रमुख लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, हवाई दल प्रमुख व्ही.आर.चौधरी आणि नौदल प्रमुख अडमिरल आर. हरिकुमार यांनी शहिदांना पुष्पांजली अर्पण केली.

देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी लष्कराची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण असून, सीमेवर शांतता राखण्यासाठी लष्करानं साहस, शौर्य आणि त्यागाचा परिचय दिल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनानिमित्त साहसी सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लष्कर दिनानिमित्त भारत पाक सीमेवर जैसलमेरमधल्या लोंगेवाला इथं खादी पासून तयार करण्यात आलेला जगातला सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज असलेला भारतीय ध्वज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

****

संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करणाऱ्या तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त चौकशी समितीनं काल प्राथमिक अहवाल सादर केला. हवामानात अचानक बदल झाल्यानं हेलिकॉप्टरनं मेघाच्छादित क्षेत्रात प्रवेश केला. त्यामुळे हेलिकॉप्टरवरचं नियंत्रण विचलित झाल्यानं हा अपघात झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यांत्रिक बिघाड, घातपात किंवा निष्काळजीपणातून हा अपघात घडलेला नाही, असं यात म्हटलं आहे.

****

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या सत्राला प्रारंभ होईल. दोन सत्रात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं सत्र ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान, तर दुसरं सत्र १४ मार्च ते आठ एप्रिलपर्यंत चालेल. १ फेब्रुवारीला २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

****

मराठवाड्यात काल दोन हजार १०९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल ५२० रुग्ण आढळले. त्यात महानगरपालिका क्षेत्रातले ४०१, तर ग्रामीण भागातले ११९ रुग्ण आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...