Friday, 23 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.09.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 September 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी ते अहमदनगर या ६५ किलोमीटर रेल्वेमार्गाचा आज शुभारंभ होत आहे. या मार्गावरच्या पहिल्या प्रवासी रेल्वेला, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं जाणार आहे. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

ही रेल्वे लाईन २६१ किलो मीटरच्या अहमदनगर - बीड- परळी या नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा प्रत्येकी ५० टक्के खर्चाचा वाटा आहे.

****

वेगवान आर्थिक प्रगतीबरोबरच पर्यावरण बळकट करण्यावर भारताचा भर असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या एकता नगर इथं आयोजित राज्यांच्या पर्यावरण मंत्रालयाच्या राष्ट्रीय संमेलनात ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. देशातलं वन क्षेत्र वाढत असून, आर्द्रभूमीमध्ये देखील झपाट्याने वाढ होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राज्यांनी पर्यावरण रक्षणासाठी सर्वोत्तम कार्यप्रणाली आत्मसात करावी, आणि त्याला संपूर्ण देशात लागू करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी पर्यावरण मंत्र्यांना केलं आहे.

****

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जावर आज सुनावणी होत आहे. महापालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली, यावरुन या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

****

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट यापुढे सर्व निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. पक्षातर्फे येत्या काळात राबवण्यात येणार्या विविध कार्यक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. 

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कालपासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत आयोजित या दौऱ्यात काल सीतारामन यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख ९१ हजार १७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१७ कोटी २६ लाख २७ हजार ९५१ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या पाच हजार ३८३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सहा हजार ४२४ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४५ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोविड महामारीच्या काळात देशाच्या आरोग्य प्रणालीची ताकद बघायला मिळाल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते काल राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या भारतीय रेड क्रॉस सोसायटी लीडरशिप बैठकीचं उद्घाटन करताना बोलत होते. भारत केवळ कोविडचा सामना करण्यात यशस्वी ठरला नाही, तर लस मैत्री अंतर्गत भारतानं औषधं आणि लस मात्रा उपलब्ध करून अन्य देशांना मदत केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपत्कालीन परिस्थितीत लोकांची मदत करणं हे भारतीय रेड क्रॉस सोसायटीचं उद्दिष्ट असून सेवा आणि सहकार्य ही भावना भारतीय परंपरा असल्याचं मांडवीया यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी केलं आहे. गुजरात इथं सुरू झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देताना ते काल बोलत होते.

****

पंचायती राज मंत्रालयाच्या वतीने, “ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयाचं  स्थानीकीकरण” या अंतर्गत “स्वच्छ, हरित आणि जल समृद्ध गाव” या संकल्पनांवर आधारित सरपंचांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन काल चिंचवड इथं केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झालं. देशातल्या मोठ्या शहरांप्रमाणेच गावांचाही विकास व्हावा ही केंद्र सरकारची भूमिका असून ग्रामविकासाच्या कार्यात ग्रामपंचायत आणि सरपंचाची भूमिका मोलाची असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...