Friday, 23 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.09.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 September 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरुन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित १५ राज्यांमध्ये एनआयए आणि ईडीचे छापे, शंभराहून अधिक जणांना अटक, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, जालना, बीड आणि परभणीतील एकूण ११ कार्यकर्त्यांना अटक

·      ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात फाईव्ह जी सेवेचा शुभारंभ करणार

·      मुंबई महानगरपालिकेनं शिवसेनेच्या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी

·      महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सवात राज्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवणार

·      राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

·      बहुप्रतिक्षित अहमदनगर ते आष्टी मार्गावर आज पहिली प्रवासी रेल्वे धावणार

·      उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावर्षीपासून प्रवेश सुरू

·      औरंगाबादमधील प्रसिद्ध बिल्डर अनिल आग्रहारकर यांची गळफास घेऊन आत्महत्या

आणि

·      भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यान आज नागपूरमध्ये दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना

 

सविस्तर बातम्या

दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरुन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित १५ राज्यांमधल्या ९३ आस्थापनांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयए, सक्तवसुली संचालनालय - ईडीनं राज्य पोलिस दलाच्या सहकार्यानं छापेमारी केली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे नेते आणि सदस्यांविरोधात एनआयएनं पाच गुन्हे दाखल केले असून, याप्रकरणी महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ल्ली, आसाम, मध्यप्रदेश,  गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि मणिपूर या राज्यांमध्ये ही तपास  मोहीम राबवण्यात आली. दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांना पैसा पुरवणं, शास्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरं आयोजित करणं, समाजात धर्माच्या आधारावर तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं हिंसा आणि दहशतवादी कृत्य करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणं आणि बंदी घालण्यात आलेल्या संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी जनसमुदायाला एकत्र आणणं, असे आरोप एनआयएनं या संघटनेवर केले आहेत.

गेल्या काही वर्षांत, अनेक हिंसक कृत्यांमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे नेते आणि सदस्यांविरोधात विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. काल राबलेल्या मोहिमेत गुन्हेगारी स्वरूपाची कागदपत्र, रोकड, धारदार शस्त्र आणि मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. या प्रकरणी एनआयएनं शंभराहून अधिक जणांना अटक केली आहे.

राज्यात विविध ठिकाणी `पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या २० जणांना अटक केली. यामध्ये औरंगाबाद आणि परभणी शहरातून प्रत्येकी चार, तर नांदेड, बीड, जालना इथून प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्यांविरुद्ध औरंगाबाद, नांदेड, मुंबई, नाशिक इथं गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. औरंगाबाद इथं दहशतवाद विरोधी पथकाचे अधिक्षक संदीप खाडे यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले,

Byte…

राज्याचे दहशतवाद विरोधी पथकास जी गोपनीय माहिती मिळाली होती त्यामध्ये असं समजून आलं होतं की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे काही कार्यकर्ते हे राष्ट्र विरोधी कारवायामध्ये लिप्त आहेत. सदर गोपनीय माहिती पडताळून पाहण्यात आली. अशी माहिती पडताळून पाहण्यात आल्यानंतर आणि तिची खात्री झाल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलेलं आहे. दहशतवादी विरोधी पथकाने औरंगाबाद, नांदेड, जळगाव त्याचप्रमाणे पुणे, ठाणे इतरत्र ठिकाणी कारवाया केलेल्या आहेत. आतापर्यंत वीस अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई आणि पुढील तपास चालू आहे.

****

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात फाईव्ह जी सेवेचा शुभारंभ करणार आहे. काल मुंबईत `ग्लोबल फिनटेक` महोत्सवात केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. देशातल्या प्रत्येक गावात डिजिटल सेवा पोहचवण्यासाठी ३० अब्ज डॉलर रुपये खर्च केले जाणार आहेत, तसंच सरकार पुढील दोन वर्षात फाईव्ह जी सेवेत देशाला अग्रस्थानी नेण्यास सक्षम असेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सध्याची फोर जी सेवा आणि भविष्यातली फाईव्ह जी या सेवांमुळे युवापिढीला याचा फायदा होणार असून, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातल्या डिजिटल यात्रेत, त्यांना सहभागी होता येणार असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी, डिजिटल व्यवहार, आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सर्वसमावेशकता, याचं प्रमाण भारतात सर्वाधिक असून, अर्थ विषयक सेवा देण्यासाठी नव- तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं.

****

मुंबई महानगरपालिकेनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.

दरम्यान, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जावर आज सुनावणी होणार आहे. महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर या याचिकेत सुधारणा करण्यासाठी काल शिवसेनेनं न्यायालयाकडे वेळ मागितला होता. 

****

शिवसेनेनं मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यापाठोपाठ मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याची रणनिती ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं मुंबईत कालपासून दोन दिवसीय चिंतन शिबीर आयोजित केलं आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या शिबीरात सहभागी झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या शिबिराचा आज समारोप होणार आहे.

****

महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत राज्यातल्या अठरा वर्षावरील सुमारे तीन कोटी महिलांची, आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत राष्ट्रीय बाल आरोग्य योजनेच्या डॉक्टरांकडून, गावातल्या महिलांची तपासणी आणि समुपदेशन केलं जाईल. आरोग्य विभागाबरोबरच महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, महिला आणि बाल कल्याण विभाग, शालेय शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग यांचाही सहभाग घेतला जाईल अशी माहितीही सावंत यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, हे अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात सदर अभियान राबवण्यात येणार असून सर्व महिलांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके यांनी केलं आहे.

****

सांस्कृतिक कार्य विभागानं काल २०१९ आणि २०२० या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर केले. मराठी चित्रपटासाठी २०१९ वर्षाचा पुरस्कार मधु कांबीकर यांना, तर २०२० चा वसंत इंगळे यांना जाहीर झाला आहे. मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी २०१९ चा पुरस्कार कुमार सोहोनी यांना, तर २०२० चा गंगाराम गवाणकर यांना, आणि उपशास्त्रीय संगीतासाठी २०१९ चा पुरस्कार शौनक अभिषेकी यांना, तर २०२० चा देवकी पंडित यांना जाहीर झाला आहे.

२०२०-२१ साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना, तर २०२१-२२ साठीचा पुरस्कार दत्ता भगत यांना जाहीर झाला आहे. २०२०-२१ साठीचा, संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, दिप्ती भोगले यांना, तर २०२१-२२ साठीचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना देण्यात येणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचं स्वरुप पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असं आहे.

दरम्यान, सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचा यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार, सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. समितीचे अध्यक्ष शरद कराळे यांनी काल सांगलीत या पुरस्काराची घोषणा केली. येत्या पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी जेष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

****

बहुप्रतिक्षित अहमदनगर ते आष्टी या ६५ किलोमीटर अंतरावर आज पहिली प्रवासी रेल्वे धावणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत.

****

उस्मानाबाद इथलं वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी पासून सुरू होणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठा अंतर्गत उस्मानाबाद इथं वैद्यकीय महाविद्यालयाच्या शंभर विद्यार्थी प्रवेशास मान्यता दिली आहे. या महाविद्यालयासाठी राज्य शासनाने भौतिक सुविधा यापूर्वीच पूर्ण केल्या असून, पद भरती देखील झाली आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ५५० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १७ हजार ५७४ झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३२२ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ७४० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६५ हजार ३९५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या तीन हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १२, लातूर दहा, जालना चार, औरंगाबाद दोन तर नांदेड, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

७० लाखांची फसवणूक केल्याने तणावात असलेल्या औरंगाबाद इथले प्रसिद्ध बिल्डर अनिल आग्रहारकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी ही घटना उघडकीस आली. ३० कोटी रुपयांचं कर्ज मिळवून देण्याची थाप मारुन त्यांची फसवणूक करण्यात आली होती, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

हिंगोली जिल्ह्यातला औंढा तालुका अतिवृष्टी अनुदानात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी, काल औंढा इथं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. पीक कर्ज माफ करावं, पिक विमा मंजूर करुन त्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, विम्याची अग्रिम २५ टक्के रक्कम देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत `पोषण भी, पढाई भी` हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत `ई आकार` या उपक्रमाला चालना देण्यासाठी औरंगाबाद ग्रामीण प्रकल्प एक मधील करमाड आणि सिल्लोड तालुक्यातील उंडनगाव मधील ४५ अंगणवाडी मदतनीसांना मोबाईल वाटप करण्यात येत आहे. त्यापैकी करमाड मधील २२ अंगणवाडी मदनीसांना काल मोबाईलचं वितरण करण्यात आलं.

****

राजा राममोहन रॉय यांच्या जयंती निमित्त काल महिला अधिकारांबाबत जनजागृतीसाठी नांदेड इथं फेरी काढण्यात आली. यामध्ये विविध शाळांतले २५० विद्यार्थी सहभागी होते. विविध समाजोपयोगी संदेश या फेरीद्वारे प्रसारित करण्यात आले.

****

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि आमदार सतीश चव्हाण यांच्यातर्फे आज औरंगाबाद इथं ‘नरहर कुरुंदकर - एका विचारवंताची अपरिचित गोष्ट या साभिनय अभिवाचनाचा नाट्यप्रयोग होत आहे. अजय अंबेकर यांची ही संकल्पना आणि लेखन आहे. भानुदासराव चव्हाण सभागृहात संध्याकाळी सात वाजता हे सादरीकरण होणार असून प्रवेश खुला असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

****

येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...