Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ सप्टेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· दहशतवाद्यांना आर्थिक मदत
केल्याप्रकरणी ‘एनआयए’, ‘इडी’ची औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेडसह विविध ठिकाणी
कारवाई, राज्यभरात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या २० सदस्यांना अटक.
· महाविकास आघाडी सरकारनं केंद्रीय
योजना लागू करण्यामध्ये उशीर केला - निर्मला सीतारामन यांचा आरोप.
· मुंबई महानगरपालिकेनं शिवसेनेच्या
दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली.
आणि
· नाथसागराच्या विसर्गात वाढ,
गोदावरी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा.
****
दहशतवाद्यांना
आर्थिक मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा - ‘एनआयए’ आणि अंमलबजावणी संचालनालय
- ‘ईडी’नं आज राज्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेडसह विविध ठिकाणी ‘पॉप्युलर
फ्रंट ऑफ इंडिया – पीएफआय’ या संघटनेच्या २० जणांना अटक केली. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष
मौलाना सैफुर रहमान याना मालेगाव शहरातून त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात
आलं. पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये कायम शेख आणि राजी अहमद खान या दोघांना ताब्यात
घेण्यात आलं. अटक करण्यात आलेल्यांविरुद्ध औरंगाबाद, नांदेड, मुंबई, नाशिक इथं गुन्हे
नोंदवण्यात आले आहेत. औरंगाबाद इथं दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक संदीप खाडे यांनी
यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले –
राज्याचे दहशतवाद विरोधी
पथकास जी गोपनीय माहिती मिळाली होती त्यामध्ये असं समजून आलं होतं की, पॉप्युलर फ्रंट
ऑफ इंडियाचे काही कार्यकर्ते हे राष्ट्र विरोधी कारवायामध्ये लिप्त आहेत. सदर गोपनीय
माहिती पडताळून पाहण्यात आली. अशी माहिती पडताळून पाहण्यात आल्यानंतर आणि तिची खात्री
झाल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांना पुढील
कारवाईसाठी ताब्यात घेतलेलं आहे. दहशतवादी विरोधी पथकाने औरंगाबाद, नांदेड, जळगाव त्याचप्रमाणे
पुणे, ठाणे इतरत्र ठिकाणी कारवाया केलेल्या आहेत. आतापर्यंत वीस अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना
ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई आणि पुढील तपास चालू आहे.
देशभरात
दहा राज्यांमधल्या ‘पीएफआय’च्या कार्यालयांवर छापे टाकून संघटनेच्या एकूण १०६ सदस्यांना
आज अटक केली असून ‘एनआयए’नं केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
****
देशव्यापी
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून दुपारपर्यंत ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं
लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१७
कोटी १९ लाखांच्या वर गेली आहे. त्यात १९ कोटी ८६ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी
वर्धक लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज दुपारपर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं
लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७
कोटी ६८ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ८९ लाख ५३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी वर्धक
लसमात्रा घेतली आहे. दरम्यान, देशात काल नव्या पाच हजार ४४३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर पाच हजार २९१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४६ हजार ३४२ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
भारतीय
जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आजपासून तीन
दिवस बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा करत आहेत. बारामती राज्यातल्या १६ लोकसभा मतदार
संघांमध्ये आहे जिथं पक्ष आपला जनाधार बनवण्याचा विशेष प्रयत्न करत आहे. आपल्या या
दौऱ्याला २०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून नव्हे तर संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न
मानावं, असं सितारामन यानिमित्त आज कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाल्या. बारामतीची लोकसभेची
जागा जिंकण्याचं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. पूर्वीच्या महाविकास आघाडी
सरकारनं केंद्रीय योजना लागू करण्यामध्ये उशीर केला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
सक्तवसुली संचालनालयासारख्या केंद्रीय संस्थांचा सरकार दुरुपयोग करत असल्याच्या राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या आरोपांचं त्यांनी यावेळी खंडन केलं. केंद्रीय
तपास संस्था कोणत्याही प्रकरणाच्या पहिल्या टप्प्यात हस्तक्षेप करत नसून पोलीस अथवा
अन्य संस्थांना एखाद्या प्रकरणात काळा पैसा अथवा त्यासारखे गैरव्यवहार आढळून आल्यावर
केंद्रीय तपास संस्थांची भूमिका सुरू होत असल्याचं सितारामन म्हणाल्या.
****
मुंबई
महानगरपालिकेनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर
दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत
ही परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारल्याचं
महापालिकेकडून जारी केलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
****
प्राध्यापकांच्या
समस्यांबाबत आणि सर्व मागण्यांबद्दल सकारात्मक विचार करून ‘इंडियन नेट-सेट असोसिएशन’-
‘इन्सा’ला लवकरच चर्चेसाठी बोलवू असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मंत्रालयात यासंबंधी झालेल्या बैठकीत बोलत होते. ‘नेट-
सेट’ धारक तसंच प्राध्यापकांच्या समस्यांबाबत विविध मागण्यांचं निवेदन ‘इन्सा’चे अध्यक्ष
डॉ.कमलाकर पायस यांनी आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं.
****
देशासह
राज्यातही परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पैठण इथल्या नाथसागराच्या विसर्गात
आज सकाळी वाढ करण्यात आली आहे. नाथसागर धरणाची अठरा दारं आता दोन फुट उंचीवर स्थिर
करुन ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
यामुळं पाटबंधारे विभागानं गोदावरी नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
****
ज्येष्ठ
दिग्दर्शक, पटकथाकार सतीश आळेकर यांना यंदाचा ‘विष्णूदास भावे पुरस्कार’ जाहीर करण्यात
आला आहे. येत्या पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या
हस्ते आळेकर यांना सांगली इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गौरवपदक, रोख रक्कम,
स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य
विद्यामंदिर समिती मार्फत गेली ५४ वर्ष हा पुरस्कार दिला जातो.
****
नांदेड
जिल्ह्यात साजरा होत असलेल्या सेवा पंधरवाड्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्येच विविध
प्रमाणपत्र मिळणार आहेत. या अनुशंगानं देगलूर आणि मुखेड तालुक्यातल्या सर्व शाळांमध्ये
विद्यार्थ्यांना महसुल विभागामार्फत देण्यात येणारी विविध प्रमाणपत्रं मिळणार असल्याचं
देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांनी कळवलं आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी
आवश्यक असणारी कागदपत्रं संबंधित शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी
संकलित करुन उद्यापासून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत शाळेजवळ असलेल्या सेतू सुविधा केंद्राकडे
द्यावीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेनेच्या
कार्यकर्त्यांनी हिंगोली जिल्ह्यातला औंढा तालुका अतिवृष्टी अनुदानात समाविष्ट करण्याच्या
मागणीसाठी आज औंढा इथं तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. पीक कर्ज माफ करा,
पीक विमा मंजूर करुन त्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, विम्याची
अग्रीम २५ टक्के रक्कम द्या, आदी मागण्याही यावेळी आंदोलकांनी केल्या. औंढा तालुका
अतिवृष्टी अनुदान यादीत समाविष्ट करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अन्यथा
आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.
****
औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागातर्फे राष्ट्रीय पोषणमाह अंतर्गत ‘पोषण
भी, पढाई भी’ हा उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत ‘ई आकार’ या उपक्रमाला चालना देण्यासाठी
औरंगाबाद ग्रामीण प्रकल्प एक मधील करमाड आणि सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव मधील ४५ अंगणवाडी
मदतनीसांना मोबाईल वाटप करण्यात येत आहे. त्यापैकी करमाड मधील २२ अंगणवाडी मदतनीसांना
आज मोबाईलचं वितरण करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment